अखेर राजेंद्र हगवणेंची पक्षातून हकालपट्टी! वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणी अजितदादांची मोठी कारवाई
22-May-2025
Total Views | 52
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे पुण्यातील नेते राजेंद्र हगवणे यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. त्यांची सून वैष्णवी हगवणे हिने मानसिक छळातून आत्महत्या केल्याने राज्यभरात त्यांच्यावर संताप व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याप्रकरणी मोठी कारवाई केली आहे.
राष्ट्रवादीचे नेते सूरज चव्हाण यांनी याबद्दलची माहिती दिली. ते म्हणाले की, "पुणे येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते राजेंद्र हगवणे यांची पक्षातील सर्व पदांवरून हकालपट्टी करण्यात आली आहे. त्यांच्या घरात घडलेली घटना ही मानवतेला काळीमा फासणारी असून या घटनेचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष निषेध करते. वैष्णवी हगवणेला न्याय मिळावा आणि तिला त्रास देणाऱ्यांवर कडक कारवाई व्हावी, हीच पक्षाची मागणी आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अशा कुठल्याही घटनेला पाठीशी घालण्याचे काम करत नाही. कौटुंबिक वादाला पक्षाशी जोडून पक्षाची बदनामी करू नये," अशी विनंतीही त्यांनी माध्यमांना केली.
पुण्यातील मुळशी तालुक्यातील राजेंद्र हगवणे यांची सून वैष्णवी हगवणे हिच्या आत्महत्येमुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे. सासरच्या लोकांकडून हुंड्यासाठी वैष्णवी हगवणे हिचा शारीरिक आणि मानसिक छळ केला. या छळाला कंटाळून तिने आत्महत्या केल्याचा आरोप करण्यात येत आहे. याप्रकरणात आतापर्यंत तीन जणांना अटक करण्यात आली असून दोन जण अद्याप फरार आहेत.