"अशी नालायक माणसं माझ्या पक्षात..."; वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणी अजितदादांचा संताप

    22-May-2025
Total Views |
 
Ajit Pawar
 
मुंबई : अशी नालायक माणसं माझ्या पक्षात नकोत, अशा तीव्र शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणावर संताप व्यक्त केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे पुण्यातील नेते राजेंद्र हगवणे यांची वैष्णवी हगवणे हिने सासरच्या छळाला कंटाळून आत्महत्या केली असून या घटनेने राज्यभरात एकच खळबळ उडाली आहे.
 
यावर एका कार्यक्रमात बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, "राजेंद्र हगवणे माझा पदाधिकारी नाही. पण तो जर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा सभासद असेल तर आजपासून मी त्याची हकालपट्टी करतो. अशी नालायक माणसं माझ्या पक्षात नकोत. मी गरीबांच्या दारात जाईल पण अशा लोकांच्या दारात जाणार नाही," असे ते म्हणाले.
 
हे वाचलंत का? -  अखेर राजेंद्र हगवणेंची पक्षातून हकालपट्टी! वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणी अजितदादांची मोठी कारवाई
 
ते पुढे म्हणाले की, "१७ मे रोजी बावधन पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणात शशांक राजेंद्र हगवणे, लता राजेंद्र हगवणे, करीश्मा राजेंद्र हगवणे या तीन जणांना अटक करण्यात आली आहे. तर राजेंद्र तुकाराम हगवणे आणि सुशील राजेंद्र हगवणे हे फरार असून त्यांचा शोध घेणे सुरु आहे. त्यांचा शोध घेण्यासाठी तीन टीम पाठवण्यात आल्या असून त्या अजून वाढवण्यास सांगितले आहे. मृत महिलेचे ९ महिन्यांचे बाळ काळजी आणि संगोपणासाठी त्या महिलेचे वडील आनंद कस्पटे यांच्या ताब्यात देण्यात आले आहे," अशी माहितीही अजित पवारांनी दिली आहे.