भारतासाठी ‘भूषण’

    14-May-2025
Total Views |



भारतासाठी ‘भूषण’


सध्या संविधानाचे अमृतमहोत्सवी वर्ष सुरू आहे. याच काळात न्यायमूर्ती भूषण गवई यांनी दि. 14 मे रोजी भारताचे 52वे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहले. समता, बंधुता आणि स्वातंत्र्य यांचा जयघोष केला. या जयघोषाला भारतीयत्व आणि देशनिष्ठेचे कोंदण दिले. या सगळ्या पार्श्वभूमीवर गुणवान, कर्तृत्ववान व्यक्तीला देशाच्या सरन्यायाधीशपदी कार्य करण्याची संधी लाभणे, हीच संविधानाची महत्ता आहे. अर्थात, त्यांनी सरन्यायाधीशपदाची शपथ घेणे, यात त्यांचे कर्तृत्व आणि न्यायिक क्षेत्रातील योगदान यांची भूमिका मोठी आहे. या त्यांच्या धवल यशाचे परिमाण शब्दात मांडणे अशक्य आहे. ‘सब समाज को साथ लिए’चे सूत्र त्याचबरोबर पं. दीनदयाळ उपाध्याय यांची ‘अंत्योदया’ची संकल्पना प्रत्यक्षात साकार होण्याचा सध्याचा काळ आहे. ‘अंत्योदय’ संकल्पनेचा संदर्भ यासाठी की, आज समाजविघात शक्ती देशामध्ये आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या मागास समाजबांधवांना भडकवत असतात की, ‘हा देश तुमचा नाही. या देशात तुमचा हिस्सा काय आहे?’ या सगळ्या समाजविघातक व्यक्तींनी गवई यांचे कर्तृत्व पाहायलाच हवे. खरे तर आमच्या देशाच्या राष्ट्रपती अनुसूचित जमातीतील एक महिला आहेत, आमच्या देशाचे पंतप्रधान इतर मागासवर्गीय समाजाचे आहेत आणि हो, देशाचे सरन्यायाधीश हेसुद्धा बौद्ध समाजाचे आहेत. अर्थात, राष्ट्रपती, पंतप्रधान किंवा नुकतेच सरन्यायाधीश झालेले गवई यांनी कधीही स्वतःच्या जातीचे कार्ड खेळले नाही. ‘मी अमुक अमुक जातीतून येतो, म्हणून मलाच पद द्या, संधी द्या’ असे यांनी कधीही म्हटले नाही. या तिघांसाठीही त्यांचे काम, त्यांचा देश हेच महत्त्वाचे होते आणि आहे. याच अनुषंगाने आपल्या देशाचे मोलाचे सांस्कृतिक एकीकरण सांगणारी आणखीन एक घटना. नुकतेच भारत-पाकिस्तान युद्ध झाले. या युद्धामध्ये महत्त्वाची भूमिका निभावणार्‍या दोन महिला होत्या. जात-धर्माचे राजकारण खेळून भारताला खिळखिळे करणार्‍यांनी लक्ष द्यावे की, या दोन महिलांपैकी एक होत्या कर्नल सोफिया कुरेशी आणि दुसर्‍या होत्या कमांडर व्योमिका सिंह. आमचा देश संविधानावर चालतो. त्यामुळेच देशात जात, धर्म, लिंग यांच्यापलीकडे जाऊन गुणवत्तेनुसार माणसांची भूमिका ठरते. त्यामुळेच संविधानाची मूल्यता सिद्ध करत न्या. भूषण गवई यांचे सरन्यायाधीश होणे, हे अवघ्या भारतासाठी भूषणावह!

राहुल गांधींचा हिंदूद्वेष

प्रभू श्रीराम काल्पनिक होते,” असे विधान राहुल गांधी यांनी न्यूयॉर्कमध्ये मागे केले. न्यायालयाने प्रभू श्रीरामाचे अस्तित्व मान्य केले असतानाही राहुल गांधींनी परेदशात जाऊन प्रभू रामाबद्दल खोटे आणि प्रतिमा हनन केले. हिंदूंच्या श्रद्धांचा अपमान करण्याचे काम केले, म्हणून उत्तर प्रदेशमध्ये राहुल गांधी यांच्याविरोधात न्यायालयामध्ये याचिका दाखल झाली आहे. ‘भगवा दहशतवाद’, ‘हिंदू मुलींना छेडण्यासाठी मुले मंदिरात जातात’ वगैरे विधान करून राहुल गांधींनी त्यांच्या हिंदूद्वेषाचा पुरावा दिला होताच. रामसेतूविरोधात वकिलांची फौज उभी करूनही त्यांचे हिंदूद्वेष्टेपण उघड झाले होते. आता पुन्हा त्यांनी प्रभू श्रीरामांना काल्पनिक म्हटले आहे. राहुल गांधी यांच्या बालिशपणाच्या मुखवट्याआड जे काही आहे, ते काय आहे? हिंदूंविरोधी किंवा हिंदूंमध्ये जातीय तणाव निर्माण होत असतानाच्या परिस्थितीमध्ये राहुल गांधी कुणाचे समर्थन करतात? परदेशात जाऊन तिथे देशाबद्दल काय बोलतात? यावर असंख्यवेळा वाद झाले. कारण, परदेशात गेले की ते भारताच्याविरोधातच मत मांडतात. हे भारतीय जनतेला कधीच सहन होत नाही. त्यामुळेच राहुल गांधी सत्तेपासूनच नव्हे, तर भारतीय जनतेच्या मनापासून कोसो दूर आहेत. नुकतेच बिहारमध्ये काँग्रेसच्या कन्हैयाकुमारने ‘पलायन रोको, नोकरी दो’ अभियान राबविले. बिहारी जनतेने या अभियानाकडे पाठ फिरवली. जनतेेने कन्हैयाकुमारच्या अभियानाला गांभीर्याने घेतले नाही. मात्र, बिहार काँग्रेसच्या नेत्यांनी हे अभियान गंभीरपणे घेतले. काँग्रेसच्या नेत्यांनी पलायन केले. “मी बिहारमध्ये शिक्षा न्याय संवाद यात्रा करणार, त्याआधीच बिहारमध्ये काँग्रेसचे 17 नेते भाजपमध्ये गेले. ‘भारत तेरे तुकडे होंगे हजार इन्शाअल्ला इन्शाअल्ला” असे म्हणत, भारत देशाला तोडण्याची इच्छा असल्याचा आरोप झालेला कन्हैयाकुमार हा तिथे काँग्रेसचा मुख्य नेता. काँग्रेसचा ‘हात’ आणि साथ कुणासोबत असते, हे अशाप्रकारे वेळोवेळी सिद्ध झाले आहे. पण, अर्थातच ही राहुल गांधींची काँग्रेस आहे. जिथे प्रभू रामाच्या अस्तित्वावर शंका घेतली जाते, जिथे स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या देशभक्तीची टिंगल केली जाते, निंदा केली जाते, ते हे काँग्रेस आहे आणि त्याचे मुख्य आहेत राहुल गांधी. राहुल गांधी यांचा हिंदूद्वेष जनतेने ओळखला आहे.