मुंबई : कोविड-१९ च्या जेएन.१ (JN.1) या व्हेरिएंटमुळे जगभरात पुन्हा चिंतेचे वातावरण तयार झालेय. कारण या पूर्वी आलेल्या कोरोनाच्या लाटेमुळे जगभरात लॉकडाऊन लागू करण्यात आले होते. अनेकण यात मृत्यूमूखी पडले होते. थायलंडमध्ये सध्या नवीन व्हेरिएंटचे ३३ हजारपेक्षा अधिक प्रकरणे नोंदवली गेली आहेत, तर ब्रिटनमध्ये मृत्यूंची संख्या सर्वाधिक आहे. भारतातही या व्हेरिएंटच्या रुग्णांची नोंद झाल्याची माहिती आहे.
जेएन.१ हा ओमिक्रॉनचा उपप्रकार असून, त्याचा संसर्ग दर अधिक आहे. या व्हेरिएंटमुळे ताप, खोकला, थकवा यांसारखी लक्षणे दिसतात. भारतात २५७ सक्रिय प्रकरणे नोंदवली गेली असून, केरळमध्ये सर्वाधिक ६९ प्रकरणे आहेत. महाराष्ट्रात ५७ आणि तामिळनाडूमध्ये ३४ प्रकरणे आहेत. आरोग्य तज्ञांनी नागरिकांना सावधगिरी बाळगण्यासह पुरेपूर काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. विशेषतः ज्येष्ठ नागरिक, गरोदर महिला आणि लहान मुलांनी सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरणे, हात स्वच्छ ठेवणे आणि गर्दीपासून दूर राहणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
सिंगापूर, हाँगकाँग आणि थायलंडमध्येही या व्हेरिएंटच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. भारतातही परदेशातून परतणाऱ्या प्रवाशांची आरोग्य विभागाकडून तपासणी करण्यास सुरवात झाली आहे . नागरिकांनी लक्षणे आढळल्यास त्वरित चाचणी करत आरोग्य विभागाने दिलेल्या सूचनांचे पालन करणे अत्यंत आवश्यक आहे.