चंदीगड : (Jyoti Malhotra Court Hearing) पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या हरियाणाच्या युट्यूबर ज्योती मल्होत्रा हिला हिसार जिल्हा न्यायालयाने ४ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, बुधवारी पोलिसांनी मध्यवर्ती कारागृहात ज्योती मल्होत्राची कसून चौकशी केली. पाच दिवसांच्या पोलिस कोठडीत असताना आपल्या आयएसआयशी असलेल्या संबंधांची कबुली दिली आहे.
ज्योतीची ५ दिवसांची कोठडी संपल्यामुळे तिला गुरुवारी दि.२२ मे रोजी सकाळी ९.३० वाजता हिसार पोलिसांनी न्यायालयात हजर केलं होतं. तिच्या पोलीस कोठडीत वाढ करण्यता यावी, या मागणीसाठी सुमारे दीड तास युक्तीवाद झाला. यानंतर ज्योतीच्या पोलीस कोठीडत आणखी ४ दिवसांची वाढ करण्याचा निर्णय न्यायालयाने घेतला. सुनावणीनंतर, पोलिसांनी ज्योतीला मीडियाच्या नजरेपासून दूर ठेवण्यासाठी फिल्मी शैलीत बाहेर काढले. पोलिसांनी प्रथम काळी काच असलेली स्कॉर्पिओ कार मागवली. मग मुख्य गेट बंद करण्यात आले. यानंतर, ज्योतीला त्यात बसवल्यानंतर, पोलिस तेथून निघून गेले. यावेळी कोणताही अधिकारी माध्यमांशी बोलला नाही. सुनावणीच्या वेळीही ज्योतीचे वडील हरीश मल्होत्रा यांना तिला भेटण्याची परवानगी नव्हती.
ज्योतीला १६ मे रोजी अटक करण्यात आली होती. त्यानंतर, ५ दिवसांच्या पोलिस कोठडीत असताना, हिसार पोलिसांव्यतिरिक्त, राष्ट्रीय तपास संस्था (एनआयए), गुप्तचर विभाग (आयबी) आणि लष्करी गुप्तचर विभागाने ज्योती मल्होत्राची कसून चौकशी केली आहे. यामध्ये सर्व यंत्रणानी चौकशी आणि तपासादरम्यान मिळालेल्या माहिती, पुरावे गोळा करून त्यांचे अहवाल तयार केले आहेत.बुधवारी कोणतीही केंद्रीय तपास संस्था चौकशीसाठी आली नाही. यावर सिव्हिल पोलिस स्टेशन पोलिसांनी मध्यवर्ती कारागृहात ज्योतीची चौकशी केली. तपास अधिकारी निरीक्षक निर्मला यांनी ज्योतीकडून युट्यूबवर व्हिडिओ बनवण्याबद्दल आणि तिच्या तीन पाकिस्तान भेटींबद्दल माहिती घेतली होती. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर बनवलेल्या व्हिडिओबद्दलही ज्योती यांना प्रश्न विचारण्यात आले होते. याचा अहवाल पोलिसांनी सुनावणीदरम्यान न्यायालयात सादर केला आहे.
ज्योतीसाठी अद्याप वकिलाची नियुक्ती नाही
ज्योतीच्या वतीने खटला लढण्यासाठी अद्याप कोणत्याही वकिलाची नियुक्ती करण्यात आलेली नाही. ज्योतीचे वडील हरीश मल्होत्रा म्हणाले की, माझ्याकडे वकीलांना देण्यासाठी पैसे नाहीत. मला वकील कसा घ्यावा हे माहित नाही. गेल्या पाच दिवसांपासून मीडिया आणि पोलिसांशिवाय कोणीही माझ्या घरी येत नाही."
मुंबईतील पाटकर-वर्दे महाविद्यालयातून अर्थशास्त्र विषयातत पदवी. सध्या दै. मुंबई तरुण भारत मध्ये वेब उपसंपादक पदावर कार्यरत. लिखाण, वाचन आणि निवेदनाची विशेष आवड. मराठी साहित्य, इतिहास, राजकारण, आणि मनोरंजन विषयांत रस. महाविद्यालयीन काळात वक्तृत्व, कथाकथन, काव्यवाचन स्पर्धांमध्ये सहभाग आणि पारितोषिके.\