पडद्यामागचा हिरा हरपला

    दिनांक  28-Sep-2018   
 
 

आपल्या कलात्मक नजरेने सिनेसृष्टीला ‘नवरंग’, ‘दो आँखे बारा हात’, ‘श्री ४२०’ यांसारखे दर्जेदार चित्रपट देणारे छायालेखक त्यागराज पेंढारकर... भारतीय सिनेसृष्टीची वैभवशाली परंपरा आणि या रंगभूमीला गेल्या १०० वर्षांत मिळालेले रसिकांचे प्रेम हे सर्वज्ञात आहे. मात्र, याच पडद्यामागे वावरणारे कलाकार हे प्रेक्षकांसाठी अज्ञात असतात. सिनेमाचा विचार केला, तर पडद्यावर दिसणारे कलाकार आपल्या माहीत असतात, पण त्यांच्या कलेला अधिक रेखीव करतात ते पडद्यामागचे कलाकार. तरीही दिग्दर्शक, लेखक, संगीतकार वगळता छायाचित्रकार, संकलक यांसारखे हजारो तंत्रज्ञ आजही प्रसिद्धीच्या झोतापासून लांबच असतात. असाच एक पडद्यामागचा अवलिया कलाकार म्हणजे ’त्यागराज बाबूराव पेंढारकर.’ आज जरी ते आपल्यात नसले तरी, त्यांच्या कलेतून साकारलेल्या चित्रपटातून मात्र ते अमरच आहेत.

 
 
 
आजवर त्यागराज यांच्या छायांकनांतून त्यांनी सिनेसृष्टीला बरेच कलात्मक चित्रपट दिले. ‘नवरंग’, ‘दो आँखे बारा हात’ हे चित्रपट आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहेत. यांसारख्या बर्‍याच चित्रपटांचे छायालेखक होते, त्यागराज पेंढारकर. गेल्या १०० वर्षांत कोल्हापूरने सिनेसृष्टीला अनेक हिरे दिले आहेत. त्यापैकी एक म्हणजे पेंढारकर कुटुंबीय. त्यागराज पेंढारकर यांचा प्रवास हा एखाद्या चित्रपटासारखाच होता. ज्येष्ठ अभिनेते बाबूराव पेंढारकर यांचे ते चिरंजीव आणि व्ही. शांताराम यांते पुतणे. त्यामुळे स्वाभाविकपणे त्यांच्याकडून चित्रपटातच काम करावे, अशी सगळ्यांची इच्छा होती. परंतु, त्यागराज यांना सुरुवातीला अभियंता व्हायचे होते. पण, त्यांची पाऊले शेवटी वळली, ती चित्रपटाकडेच; पण पडद्यावर नाही तर पडद्यामागे! बाबा अभिनेते आणि काका दिग्दर्शक असताना आपण काहीतरी वेगळे केले पाहिजे, या विचाराने त्यागराज पेंढारकर यांनी १९४८ मध्ये ज्येष्ठ दिग्दर्शक भालजी पेंढारकर यांच्याकडे दिग्दर्शन विभागाचे काम करण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी व्ही. शांताराम यांच्या ‘राजकमल कलामंदिरा’मध्ये आधी दिग्दर्शन विभागात छोटे-मोठे काम करण्यास सुरुवात केली. व्ही. शांताराम यांनी त्यांना आधी साहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम कर, असा सल्ला दिला. मात्र, त्याची नजर होती ती कॅमेर्‍याकडे. कॅमेर्‍यातून चित्र टिपणारे बरेच असतात. मात्र, त्यागराज यांचा कॅमेराच त्यांच्या डोळ्यांनी चित्र टिपायचा. त्यागराज यांचा छायालेखनातील उत्साह पाहता व्ही. शांताराम यांनी त्यांना छायालेखक विभागात काम करण्यास सांगितले. लेखनगुण अंगी उपजत, परंतु कागदाऐवजी त्यांनी चित्राची भाषा वापरून ते छायाप्रकाश लिहीत गेले आणि त्यांनी नंतर मामा जी. बाळकृष्ण यांच्याकडे साहाय्यक छायालेखक म्हणूनही काम केले.
 
 
 
 
त्यागराज यांनी साहाय्यक छायालेखक म्हणून ‘सुरंग’, ‘तीन बत्ती चार रस्ता’, ‘परछाई’, ‘अमर भूपाळी’, ‘सुबह का तारा’, ‘झनक झनक पायल बाजे’ या चित्रपटांसाठी छायालेखन केले. नंतर त्यांनी प्रभात कुमार दिग्दर्शित ‘मौसी’ या चित्रपटापासून स्वतंत्र छायालेखनाला सुरुवात केली आणि त्यांच्या वेगळेपणाचे व्ही. शांताराम यांनी कौतुक केले. यानंतर त्यागराज यांनी मागे वळून पाहिले नाही. त्यांच्या ‘राजकमल’च्या ‘नवरंग’, ‘स्त्री’ यासह ‘दिवाना’, ‘बागी’, ‘पैसा या प्यार’, ‘मेरे सरताज’, जेमिनीच्या ‘समाज को बदल डाला’, या हिंदी तसेच गुजराती, पंजाबी, कोकणी या भाषांतील असंख्य चित्रपटांचेही छायालेखन केले. तसेच ‘यशोदा’, ‘आंधळा मारतो डोळा’, ‘राजा शिवछत्रपती’, ‘चव्हाटा’, ‘बालशिवाजी’, ‘स्त्री जन्मा तुझी कहाणी’, ‘पूर्ण सत्य’, ‘आघात’, ‘शपथ तुला बाळाची’, ‘महिमा ज्योतिबाचा’, ‘अभिलाषा’ अशा अनेक मराठी चित्रपटांचे त्यांनी छायालेखन केले. त्यागराज यांच्याकडे शब्दांशिवाय व्यक्त होणारी, शब्दांच्या पलीकडची भाषा टिपण्याची कला होती. असा हा पडद्यामागचा हिरा आज आपल्यात नाही, यावर विश्वास बसत नाही, कारण, आजही ‘श्री ४२०’ मधील त्यांच्या ‘फ्रेम’ आजही तेवढ्याच जीवंत वाटतात. काल्पनिक सिनेमा त्यागराज यांनी आपल्या छायांकनाद्वारे अजरामर केला. त्यागराज यांच्या या कलेला अनेक पुरस्कारांनी सन्मानितही करण्यात आले. त्यांना अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचा चित्रकर्मी पुरस्कार, एस. एन. फिल्म सोसायटीतर्फे दिला जाणारा जीवनगौरव पुरस्कार, व्ही. शांताराम व दादासाहेब फाळके तांत्रिक क्षेत्रातील पुरस्कारानांही त्यांचा गौरव करण्यात आला होता. आपल्या आयुष्यातील अनेक पैलू त्यागराज यांनी आपल्या ’पडद्यामागचा माणूस’ या आत्मचरित्रात लिहिले आहे. छायालेखनाबरोबरच त्याच्या शब्दांतही वेगळीच जादू आहे. त्यांनी अगदी सोप्या शब्दात आपला प्रवास या पुस्तकाच्या रुपात मांडला. गेली ४० वर्षे केवळ आपल्या कामावर प्रेम करणार्या अशा या अवलियाला नवीन छायालेखक आपल्या उत्तमोत्तम कलेनेच श्रद्धांजली वाहू शकतात...
 
 

        माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/