आत्मकथेसारखं काहीतरी...

    दिनांक  13-Nov-2018


 


आधी वाणिज्य शाखेत प्रवेश, त्यानंतर पत्रकारिता आणि मग नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा... आज लेखक, दिग्दर्शक, कलाकार म्हणून सुप्रसिद्ध असलेल्या अभिराम भडकमकर यांच्या जीवनातील हे तीन टप्पे खरं तर खूप काही सांगून जातात. त्यांच्या जीवनप्रवासाला गती देणारे, मार्गदर्शक ठरणारे आणि अंतीम ध्येयापर्यंत पोहोचविणारे हे तीन निर्णय... नाट्यक्षेत्राशी जुळलेले ऋणानुबंध, त्यानंतर चित्रपटांपर्यंतचा प्रवास आणि या लेखनप्रवासात दिग्गजांचे लाभलेले साहचर्य यांचे अभिराम भडकमकर यांनीच शब्दबद्ध केलेले हे आत्मकथन...

 

मला आयुष्यातले तीन प्रवास खूप महत्त्वाचे वाटतात. अकरावी-बारावीच्या सुमारास कॉमर्स करतोय, पण त्यात मन रमत नाहीय, अशी सतत टोचणी लागली होती. कारण, माझ्या सभोवताली जे होतं त्यात कॉमर्स कुठेच नव्हतं. असंच होतं. सगळेजण एकाच जगात जगत असतात, पण आपल्याही नकळत आपल्याभोवती आपलं म्हणून एक विश्व उभं राहातं. माझ्या आजूबाजूला कॉमर्स हे पोटापाण्यासाठी, करिअर म्हणून किंवा आवड म्हणून घेतलेले लोक होते, पण ते माझं जग नव्हतं. काही मित्र ऑलरेडी घरचे उद्योगधंदे सांभाळू लागले होते, पण ते माझं जग नव्हतं. कुणी विद्यार्थी चळवळीत होतं, कुणी क्रीडा, शेती अगदी ज्योतिष किंवा राजकारणातही शिरत होतं. त्यांना त्यांचं जग सापडलं होतं, सापडत होतं किंवा काही जण आपल्या जगाच्या शोधात धक्के खात होते, काहींनी जगापासून पळ काढत व्यसनं जवळ केली होती... मी माझ्या जगाच्या आसपास घुटमळत होतो. मला माझं जग दिसलं होतं, पण अजून शिरकाव नव्हता. माझं जग होतं ग्रंथालयातल्या पुस्तकात आणि नाटक सिनेमांच्या प्रकाशात.

 

कोल्हापूरला ‘जयप्रभा’, ‘शांताकिरण’ असे दोन स्टुडिओे तेव्हा जोरात होते. शाळा बुडवून भालजी, सुधीर फडकेंसारखी ऋषितुल्य माणसं काम करताना दिसत होती. अरुण सरनाईक, दादा कोंडके, अनंत मानेंसारख्या माणसांना जवळून पाहिलं होतं. एक-दोन शब्द बोलायचीही संधी मिळाली होती. पण, या जगाच्या बंदिस्त दारातून चोरून डोकवायची संधी मिळाली म्हणजे ते जग लाभलं, असं नव्हतं ना! माझं जग मला समोर दिसत होतं, पण मी त्याचा रहिवासी झालो नव्हतो. याची तगमग अस्वस्थ करत होती. त्यातच ना आपली शेती ना उद्योगधंदा. चांगले मार्क्स मिळाले, तरच पोट भरायला नोकरी मिळेल, हा धोशा असल्याने नाईलाजाने का होईना, त्या जगापासून पाय माघारी वळवत कॉलेजच्या दुनियेत यावं लागत होतं. तसं कॉलेजचं वातावरण गॅदरिंग वगळता नाटकाशी कुठेच संबंध येणारं नव्हतं. ना एकांकिका स्पर्धा ना काही इतर. शाळेत असताना मात्र याची चैन होती. शिक्षकच उत्साही. दरवर्षी नाटक बसवणे स्पर्धेत भाग घेणं हमखास होतं. त्यामुळे शाळेची पर्यायाने अभ्यासाची ओढही लागायची. पु. लं. चं ‘पुढारी पाहिजे’ हे वगनाट्य लाटकर सरांनी बसवून घेतलेलं. शाळेत बरेच साहित्यिक कलावंत ये-जा करत. शाळेचे अध्यक्षच मुळात वि. स. खांडेकर होते. निळू फुले, यदुनाथ थत्ते, प्रमिलाताई असे पाहुणे आले की, हुकूम सुटायचा, वेगवेगळ्या वर्गातली ‘पुढारी पाहिजे’ मधली मुलं सोडायचा. मग काय आम्ही सायन्स, गणित जे काय चाललं असेल ते सोडून यायचो. बरं, सर्वांना सगळ्या भूमिका पाठ. त्यामुळे एखादा गैरहजर असेल तर त्याची भूमिका दुसरा करायला तयारच. त्यातला रोंग्या, गावकरी, कवी, धर्ममार्तंड, कम्युनिस्ट सर्वोदयी सगळ्या भूमिका करताना मजा यायची. नकळत हे असलं ‘इझम्स’ नावाचं काहीतरी असतं, हे जाणवून मग वाचनालयात त्याचं वाचन व्हायचं.

 

 
 

पुलंचं हे नाटक तर आजही जसंच्या तसं बसवावं, इतकं आजच्या काळाशी रेलेव्हंट आहे. या नाटकामुळे नाटकातली मजा अनुभवली आणि आपण हेच करत राहायचं, हे मनाशी पक्कं होऊ लागलं. पण, हे सगळं स्वप्नं, इच्छा या पातळीवरच होतं. त्या वयाच्या बालिशपणाला साजेसा प्रयत्नही करत होतो. स्टुडिओत जायचं, तिथल्या वॉचमनला पटवून ठेवलं होतं. तो सोडायचा आत. तसंही तेव्हा सिक्युुरिटी वगैरे फारसं काही नव्हतंच. मग आत जाऊन एकेका निर्मात्या-दिग्दर्शकाला काही काम आहे का, असं विचारायचं. तेव्हा माहीत नव्हतं, एनएसडी करून मुंबईत आल्यावर सगळे हेच करतात. मग अनंत मान्यांनी एका सिनेमात उभं राहायची संधी दिली. तेव्हा त्याचं महत्त्व कळलं नाही. पण, तो शॉट होता नटवर्य अरुण सरनाईकांसोबतचा. तेव्हा काय कल्पना की, हा किती मोठा नट आहे? नंतर टीव्हीवर ब्लॅक अॅण्ड व्हाईट सिनेमांमध्ये त्यांना पाहिल्यावर, ‘सिंहासन’ पाहिल्यावर त्यांच्यातल्या उत्तुंगतेची जाणीव झाली. मी माझ्या जगाच्या आसपास वावरत होतो. कळत नव्हतं, पुढे काय होणार आहे? काहीजणांना अनिच्छेने आपलं जग सोडून भलत्याच जगात वावरावं लागतं. नको त्या जगात आयुष्य काढावं लागतं. कुणी इच्छा नसताना कला-साहित्य-संशोधन-चित्रं-शिल्प सोडून घरसंसार, नोकरी करत बसतो, कुणी छान संसार मांडायचं स्वप्न बाजूला ठेवून जबाबदार्‍यांच्या ओझ्याखाली जगत राहातो. आपलंही असंच होईल का? पण मग संधी आली. कोल्हापूरहून पुण्याला जायची. भावाला तिथे जॉब मिळाला आणि घरातलं सुरक्षित उबदार वातावरण सोडून पुण्याला जायचं का, हा प्रश्न आला. पुण्यासारखं शहर, तिथलं वातावरण... माणसं... त्यात नाही जमलं तर??? पण, मनाचा हिय्या केला अन् निघालो... सकाळची बस होती. कोल्हापूर सोडलं ते मनासारखं जगण्यासाठी. मनातलं जग प्रत्यक्षात उतरविण्यासाठी... प्रवास सुरू झाला. सहा तासांचा प्रवास... तो पुढल्या प्रवासाची नांदीच होता...

 

पुण्याचं वातावरण धमालच होतं. त्यातच राजाभाई नातूंनी ‘पुरुषोत्तम करंडक’ नामक प्रयोगशाळा उघडून ठेवलेली. त्यात बागडू लागलो... आणि जाणवलं, नाटक काय असतं! कोल्हापूरला मेले शाळेतली नाटकं यापलीकडे नाटकाचं जग माहीत नव्हतं. पण, इथे नाटकाचं जग दिसलं. विजयाबाई, डॉ. लागू, सत्यदेव दुबे, दळवी, तेंडुलकर, कर्नाड, सरकार... कितीतरी नावं आणि त्यांची कामं पाहायला मिळू लागली. सुहास कुलकर्णींसारख्या दिग्दर्शकाच्या हाताखाली नाटक शिकायला मिळू लागलं. ‘ड्रॉपर्स’ नाट्यसंस्थेत तर नाटकात मजा असते, पण नाटक हा एक गंभीर कलाप्रकार आहे, याची जाणीव दिली आणि नाटकात काम करायचं तर खूप वाचलं पाहिजे, अशी तंबीच. तिथल्या वातावरणाने ओव्हरऑल जाणिवा समृद्ध व्हायला मदत झाली. सुधीर मुंगी, संजय गर्गे, मिलिंद गाडगीळ ही सिनियर मंडळी, पण ‘अरे तुरे’तली आणि खूप जवळची झाली. त्यातच सत्यदेव दुबे ‘तुघलक’ करायला आले. त्यांनी अवकाश वाढवलं. हळूहळू वाटायला लागलं, हेच आपलं जग. आपल्याला दुबेजींसारखं फक्त नाटक एके नाटकच करायचं. पण, तसं करायचे ते दिवस नव्हते. मालिका यायच्या होत्या. त्यामुळे या हौसेसाठी रोजगार मिळायला हवा. तो कसा मिळणार? काहीतरी नोकरी वगैरे करून नाटक करायचं का, हा विचार बळावू लागला. पण, नाटकच हे मात्र स्पष्ट होऊ लागलं. त्या काळात व्यावसायिक नाटकात जाण्यात दोन अडथळे होते. एक संधी. मुळात त्यासाठी मुंबईला जायचं. काम मिळवायचं. स्थिर व्हायचं. तर या मधल्या काळातल्या ‘सर्व्हायवल’चं काय? जेवायचं काय? राहायचं कुठे? बरं, नाटकात मिळून मिळून किती पैसे मिळणार? त्यामुळे बरेच जण नाटक हौसेपुरतं ठेवायचे. म्हणजे राज्यनाट्यस्पर्धेपुरतं किंवा हौशी अॅक्टिव्हिटी म्हणून. हे सोपं होतं. पण, मनातला किडा तर पूर्णवेळ नाटक असंच म्हणत होता. मग दुसरी अडचण. ही जरा तात्त्विक होती. व्यावसायिक नाटक म्हणजे तडजोडी, बेशिस्त आणि ग्लॉसी, जॅझी, वरवरचं उथळ... असा समज होता. त्यामुळे हौशी नाटक करणारे वरच्या दर्जाचे मानले जायचे. मग व्यावसायिक नाटक करायचं का? हा प्रश्न पडे आणि आपणही उथळपणाकडे(?) वळायचं का असाही. पण दुसरा प्रश्न मनात यायचा. ‘बॅरिस्टर’ व्यावसायिक, ‘सखाराम बाईंडर’ व्यावसायिक, ‘नटसम्राट’, ‘संध्याछाया’ अगदी ‘वाडा चिरेबंदी’सुद्धा. हे सगळं होऊ शकतं व्यावसायिकवर तरी त्याला उथळ का म्हणायचं? पण, हा डिलेमा मोठा होता त्या पिढीच्या मनात. ‘व्यावसायिक करणं’ म्हणजे चळवळीशी प्रतारणा वगैरे वाटायचं. परत नेमकं काय करायचं, हा प्रश्न आला.

 

 
 

पुरुषोत्तम करंडकात चांगलं काम करायला मिळालं. मजा आली. पण आता भीती होती, मेडीकलवाले, इंजिनिअरिंगवाले, लॉ वाले, असे वेगवेगळ्या वाटा आधीच सापडलेले मित्र कॉलेज संपलं की, आपापल्या वाटेने निघून जाणार होते. आपण काय करायचं? आपण कुठे जाणार? मग काहीतरी करायचं म्हणून एम.कॉम.ला अॅडमिशन घेतली... पण दोन वर्षांनी परत प्रश्न येणारच होता... जायचे कुठे? दरम्यान वेळ घालवायला, काहीतरी करतोय हे सांगायला पत्रकारितेचाही एक कोर्स करून घेतला रानडे इन्स्टिट्यूटमध्ये. पण तेव्हाही जाणवायचं हे आपलं जग नव्हे... इथे नाही रमणार आपण... असेच दिवस जायचे, रात्री जायच्या. तगमग थांबायची नाही. घरच्यांच्या समाधानासाठी बँकेच्या परीक्षाही दिल्या. पण, सगळं जग आपापल्या दिशेने चाललंय आणि आपण आहोत तिथेच तसेच आहोत, याचा त्रास होत राहायचा. मात्र एक होतं. ‘ड्रॉपर्स’नं नाटकाचा चोख अभ्यास करून घेतला होता. कित्येक नाटकं वाचली, पाहिली. त्या अनुषंगाने वाचन केलं. चार लोकांत बसून आपल्याला नेमकं काय वाटतं, हे मांडायला जमू लागलं. मुळात ‘माझं’ म्हणून एक मत तयार होऊ लागलं होतं. माझ्या चांगल्या-वाईटाच्या कल्पना होत्या. उत्तमाचे निकष होते. तेंडुलकर, दळवी, कानेटकर या त्रयींव्यतिरिक्त एलकुंचवार, दत्ता भगत हेही महत्त्वाचे नाटककार वाचनात आले. संगीत नाटके वाचनात, पाहण्यात आली. आता या दुनियेची भूल पडू लागली होती आणि वाचनात एनएसडीची जाहिरात आली. काय करायचं? जायचं? पण तीन वर्षे घालवावी लागणार. कसलीही हमी नाही. ना कामाची ना नोकरीची. नाही बस्तान बसलं तर अधांतरी लटकावं लागेल. नोकरीचं वय निघून जाईल. खूप गोंधळ झाला. तेव्हा आत्ताच्यासारखं टीव्ही मालिकांचं एक्स्पोजर नव्हतं. फॉर्म भरला, पण डोक्याचा भुगा झाला विचार करून करून. त्यातच दुबेंजींसकट सगळे तिकडे जाऊन काही होत नाही, हे सांगत होते. (पण, दुबे शिकवायला मात्र आले एनएसडीत, हा भाग वेगळा) खरंतर या निर्णयामागे इथे निर्माण झालेली कोंडी फोडायची होती. वाटलं, कोल्हापूरहून निघताना अशीच तर अवस्था होती. तिथल्या साचलेपणाचा त्रास होऊ लागला म्हणून पुणं. आता इथल्या साचलेपणातून बाहेर पडायला दिल्ली ???? पण, बऱ्याचदा सारासार विचार, नीट चहूबाजूंचा विचार वगैरे सगळं फोल ठरतं. बुद्धी चहूबाजूंनी विचार करून एक निर्णय देऊ शकत नाही किंवा तिने दिलेला निर्णय मन स्वीकारत नाही. अशावेळी बुद्धी ‘मी हरले’ म्हणत सगळं मनावर सोपवून मोकळी होते. तस्सच झालं. मनानं निर्णय घेतला... दिल्ली... इंटरव्ह्यू झाला. पहिल्याच प्रयत्नात पास झालो. त्या रात्री घरचे आणि ‘ड्रॉपर्स’चे सगळे सोडायला आले होते स्टेशनवर. गाडी हलली. मी माझ्या सीटवर येऊन पहुडलो... प्रवास सुरू झाला. खिडकीतून चंद्र दिसत होता... अस्वस्थ होतो. झोप नव्हती. का मागे टाकून चाललोय आपण? कुठलं तरी वर्तमानपत्रं, बँक घेईलच आपल्याला सामावून... काय गरज या सगळ्याची? नाटक करून ना जमेल तसं...

 

मी दारात आलो. उभा राहिलो. थंड हवा लागत होती. चंद्रही माझ्यासोबत सरकत होता. मनावरचं हे नाऊमेदीचं, होमसिकनेसचं... अस्वस्थतेचं मळभ हळूहळू विरून जाऊ लागलं. मग छाती भरून श्वास घेत म्हटलं, “आय डोन्ट नो, व्हेअर आय एम गोईंग? बट आय एम ऑन माय वे...” एनएसडीचे दिवस. आभाळाकडे बघायला लावणारी एक मोठीच खिडकी उघडून दिल्यासारखं झालं. कोण कोण नव्हतं भेटत तिथे? चेकॉव्ह, स्टीनबर्ग, भास, शूद्रक कालिदास, मोहन राकेश, धर्मवीर भारती... व्यक्ततेेच्या अमर्याद शक्यता दिसू लागल्या. इथे भेटले दोन अवलिये. एक बी. वी. कारंथ. कन्नड दिग्दर्शक-संगीतकार. त्याच्यासोबत राहून काम करून नाटकाचंच नव्हे, तर जगण्याचं प्रयोजन सापडत गेलं. जो काही सहवास लाभला त्यात कलात्मकता, सामाजिकता या सगळ्याबद्दलच्या विचारांना एक दिशा मिळत गेली. त्यांनी दिली नाही तर शोधायला लावलं. स्वत:चा शोध हा रंगभूमीच्या शोधाचाच एक भाग असतो, हे मनावर बिंबविण्याचा हा काळ. कारंथजींच्या शिकवण्यात हेच असायचं. तुमचं तुम्ही शोधा. त्यांनी सिनेमा केला, नाटक केलं, लिहिलं, संगीत दिलं आणि मनातले ‘हे प्रायोगिक’, ‘हे व्यावसायिक’ हे निरर्थक भेदभावच संपून गेले. तुमच्या स्वभावात प्रयोगशीलता हवी. मग कुठे काम करता याला महत्त्व नाही. मात्र, मनातल्या या प्रयोगशीलतेला कसं जपायचं, कसं खतपाणी घालायचं हे सांगणारी दुसरी व्यक्ती भेटली... फ्रिटझ बेनेवीटझ. जर्मन दिग्दर्शक. सर शिकवायला आले नि हे लख्ख झालं. स्वत:ची मोडतोड महत्त्वाची. स्वतःला वेगवेगळ्या चौकटीत बांधून घेतो आपण आणि या साखळ्या दिसतही नाहीत. त्या तोडायला हव्यात. त्याच दरम्यान बर्लिनची भिंत पडली आणि दोन्ही देश एक झाले. देशादेशातल्या भिंती पडू शकतात, तर मनावरची ही कुंपणं निघायला का उशीर? नटाने, लेखकाने स्वतःला कसं मोडायचं, हे सांगताना ते रंगून जायचे. तो काळच मोडतोडीचा होता. बाहेर गेल्यावर काय करायचं? काम मिळेल का? वगैरे बाबी अधूनमधून छळायच्या. पण, त्याहीपेक्षा तिथली मौज अधिक होती. कथकल्लीपासून नोह थिएटरपर्यंतचं सगळं करायला मिळत होतं. नाटक म्हणजे मुक्त अवकाशापासून ते बॉक्स सेटपर्यंत सगळंच करता यायचं. नाटकाचं गारूड तिथे कळलं. अमुकच करायचं असं न ठरवता मास्क मेकिंग, सुतारकाम, मेकअप सगळं सगळं करायला लागायचं. त्यात मजाही होती. त्याचसोबत अख्खा भारत मला कळू लागला. काश्मीर ते कन्याकुमारी असा पसरलेला विशाल देश. काय बोलतो, काय खातो, परिधान करतो आणि त्याचसोबत विचार काय करतो...

 

 
 

सगळं दिसू, जाणवू लागलं. भारताच्या मानसिकतेचा एक सूक्ष्म का होईना, धागा दिसू लागला. हळूहळू बाहेरच्या देशातली माणसंही भेटू बोलू लागली. त्यांच्यासोबत काम करायला मिळू लागलं. मग जाणवलं, माणूस सर्वत्र सारखाही असतो आणि वैशिष्ट्यपूर्णही... वाचलेले लेखक, माणसं आणि तत्त्वज्ञान... या सगळ्यातून जगाकडे पाहायला शिकता आलं. वाटू लागलं, आपलं जग आता आपल्याजवळ आलंय. या जगात हे आहे. जाणून घेणं, समजून घेणं, प्रगल्भ होत जाणं. समजूतदारपणे जगाकडे पाहाणं. कुतूहलाने पाहाणं... आयुष्यभर हा शोध संपायला नको. तोच तर आपल्या जगातला सगळ्यात सुंदर भाग आहे... तीन वर्ष भर्रकन गेली. पण खूप काही देऊन गेली. एनएसडीचा शेवटचा दिवस. फेअरवेल पार्टीनंतर मी कीर्ती जैन मॅडमना भेटायला गेलो. उद्या परत जातोय. त्या म्हणाल्या, “अभिराम, मराठी नाटकापासून नाळ तुटू देऊ नकोस. तुमचं थिएटर लोकाश्रयावर चालतं. पण, त्याचा गंड बाळगणारी माणसं त्यापासून लांब राहातात. तसं करू नकोस. लक्षात ठेव, त्या त्या ठिकाणचं थिएटर त्या त्या मातीतूनच जन्माला येतं.” मी परतीच्या गाडीत बसून पुण्याला आलो. आता मुंबईच्या दिशेने जायचं होतं... हा प्रवास खरा महत्त्वाचा होता. आत्तापर्यंत एक जग समोर होतं. त्या जगात शिरकाव करायचा होता. आता आपलंच एक जग निर्माण करायचं होतं. मला माहीत नव्हतं, पण त्या जगात ‘ज्याचा-त्याचा प्रश्न’ होतं. ‘देहभान’ ‘पाहुणा’ असणार होतं. ‘सुखांशी भांडतो आम्ही’ मधला सदा असणार होता. साक्षात ‘बालगंधर्व’ सुद्धा होते. गाडी बोगद्यात शिरली. अंधार दाटला. मला माहीत नव्हतं, पण पुढे ‘पछाडलेला’ तला समीर, ‘सैलाब’ मधला मनोज... ‘चाणक्य’ मधला अग्नीवेष मी त्यांची वस्त्रं परिधान करावी म्हणून उभे राहिले होते. ‘अॅट अॅनी कॉस्ट’ मधला विकास, संयुक्ता धना.. हे सगळेच माझी वाट पाहात होते. मला माहीत नव्हतं, माझ्या हातून निर्माण होतील ही सगळी माणसं, त्यांचं विश्व... त्यांच्यातले आपसातले नातेसंबंध... सगळं माझं जगच समोर होतं... पण मला एकाच वेळी न दिसणारं. त्यांच्या त्यांच्या वेळेत... त्यांचा त्यांचा वेळ घेऊन कागदावर, पडद्यावर रंगमंचावर उतरणार होती. गाडी अज्ञात भविष्याकडे धावत होती. माझा आणखी एक प्रवास सुरू झाला होता...

 
- अभिराम भडकमकर 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/