मुंबई (प्रतिनिधी) : सावंतवाडीतील कुणकेरी येथील राखीव वनक्षेत्रात भेडलेमाडाची तोड करणाऱ्या तिघांना वन विभागाने अटक केली. मंगळवारी सावंतवाडी वन विभागाच्या फिरतेपथक टीमने ही कारवाई केली. आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची वन कोठडी सुनावली.
कुणकेरी वन सर्वे क्र. 81 मध्ये फिरतेपथक सावंतवाडीचे वनक्षेत्रपाल मदन क्षीरसागर त्यांच्या टीमसह जंगलतपासणी करत होते. त्यावेळी जंगलामध्ये जागोजागी भेडलेमाडाची तोड करून पाने गोळा केल्याचे दिसून आले. या तोडीचा कानोसा घेत आरोपींचा तपास केला असता काही अज्ञात इसम जंगलामध्ये विळ्याच्या सहाय्याने भेडलेमाडाची तोड करुन, पानांचे ढीग बांधत असल्याचे दिसून आले. फिरते पथक वनपाल मधुकर काशिद, पोलीस हवालदार गौरेश राणे, वनरक्षक प्रमोद जगताप, दत्तात्रय शिंदे, धनंजय यादव यांनी मोठ्या शिताफीने सदर आरोपींवर झडप घालून ताब्यात घेतले. पकडण्यात आलेल्या तीन आरोपींची चौकशी केली असता तिन्ही आरोपी हे परप्रांतीय असल्याचे व त्यांची नावे ही नईम सलमानी-27 वर्षे, अनिल भार्गव-21 वर्षे व रिजवान सलमानी-25 वर्षे, सर्व राहणार उत्तर प्रदेश चे असल्याचे निष्पन्न झाले.
आरोपींच्या सोबतच दोन मोटारसायकली देखील ताब्यात घेण्यात आल्या. सदर आरोपींना सावंतवाडी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने तिन्ही आरोपींना दोन दिवसांची वन कोठडी सुनावली. आरोपींच्या वतीने श्री.वैभव चव्हाण यांनी तर वन विभागाच्या वतीने वनक्षेत्रपाल फिरते पथक मदन क्षीरसागर यांनी युक्तिवाद केला. वन विभागाच्या वतीने सर्व सिंधुदुर्गवासीयांना आवाहन करण्यात येते की, भेडलेमाड (Fishtail Palm) हा आपल्या जैवविविधतेतील महत्वाचा घटक असून त्याचे संवर्धन होणे गरजेचे आहे. या झाडावर हॉर्नबिल, कटींदर, शेकरू, हत्ती असे असंख्य वन्यजीव खाद्य म्हणून अवलंबून असतात. त्यामुळे आपल्या मालकी क्षेत्रांमध्ये असलेल्या भेडल्यामाडाची तोड होऊ न देणे हे आपल्या सर्वांची नैतिक जबाबदारी आहे. त्यामुळे निसर्ग संवर्धनासोबतच मानव-वन्यजीव संघर्ष कमी करणे व आपल्या नारळ-पोफळी बागांचे संरक्षण देखील साध्य होईल. सदरची कारवाई ही उपवनसंरक्षक सावंतवाडी श्री.नवकिशोर रेड्डी तसेच सहाय्यक वनसंरक्षक डॉ. सुनिल लाड यांचे मार्गदर्शनाखाली फिरतेपथक सावंतवाडी टीमने यशस्वीरित्या पार पाडली.