बीड : (Beed Crime) बीडच्या केज तालुक्यात एक संतापजनक घटना घडली आहे. नानासाहेब चौरे या नराधमाने एका गतिमंद तरुणीवर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी नानासाहेब चौरे या आरोपीला पोलिसांनी अटक केली असून त्याच्यावर केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमकं काय घडलं?
ही घटना २ जून रोजी घडली. २५ वर्षांची पीडित तरुणी तिच्या नातेवाईक महिलेसोबत आरोग्य उपकेंद्रात जात होती. उपकेंद्राजवळ असलेल्या एका ठिकाणी त्या थांबल्या. तिच्या सोबत असलेली महिला मुलाला डोस देण्यासाठी उपकेंद्रात गेली. त्यावेळी चौरेने संधी साधून तरुणीवर अत्याचार केला. नातेवाईक महिला परतल्यावर तिला हा प्रकार दिसला. तिने आरडाओरड केली. महिलेचा आवाज ऐकून गावकऱ्यांनी त्या ठिकाणी धाव घेतली आणि आरोपीला पकडले. या बाबतची माहिती उपस्थितांनी पोलिसांना दिली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि आरोपीला ताब्यात घेतले.
आरोपी नानासाहेब चौरे याच्यावर यापूर्वीही अनेक गुन्हे दाखल आहेत. त्याच्यावर लैंगिक अत्याचार, बालकांचे शोषण, ॲट्रॉसिटीसह, अवैध दारू विक्रीचे गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले. तो एका लैंगिक गुन्ह्यात शिक्षा भोगत आहे. त्याच्याविरुद्ध आणखी एक प्रकरण न्यायालयात प्रलंबित आहे. या घटनेतील आरोपी नानासाहेब चौरेचे नाव काही महिन्यांपूर्वीही चर्चेत आले होते. त्याने मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी तुरुंगात असलेल्या वाल्मिक कराडवरील सर्व गुन्हे मागे घ्यावेत म्हणून गावातील पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केले होते.
पीडित तरुणीला वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवले आहे. या प्रकरणी केज पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
या घटनेनंतर सामाजिक कार्यकर्ते, महिला संघटना, स्थानिक राजकीय नेते आणि नागरिक या घटनेचा तीव्र निषेध करत आहेत. या प्रकरणामुळे महिला सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.
मुंबईतील पाटकर-वर्दे महाविद्यालयातून अर्थशास्त्र विषयातत पदवी. सध्या दै. मुंबई तरुण भारत मध्ये वेब उपसंपादक पदावर कार्यरत. लिखाण, वाचन आणि निवेदनाची विशेष आवड. मराठी साहित्य, इतिहास, राजकारण, आणि मनोरंजन विषयांत रस. महाविद्यालयीन काळात वक्तृत्व, कथाकथन, काव्यवाचन स्पर्धांमध्ये सहभाग आणि पारितोषिके.\