देवाचे अवतार

    03-Jan-2024   
Total Views |
Articel on Devache Avatar

संतसज्जनांच्या रक्षणासाठी भगवंतानी नीच योनीतील होणे पत्करले. पण, पृथ्वीचा, तीवरील सज्जन लोकांचा नाश होऊ दिला नाही, सर्वांना सांभाळले. हे अवतार भगवंतांनी लोकांना वाचवण्यासाठी घेतले आहेत. यासाठी लोकांनी मोठ्या भक्तिभावाने भगवंताची कृतज्ञतेने आठवण ठेवावी. त्या कृपाळू भगवंताला विसरू नये. सदैव त्याचा भक्त होऊन राहावे.

मागील काही श्लोकांतून देव कृपाळू आहे, तो अनाथांचा कैवारी आहे, संकटसमयी भक्तांसाठी धावून येणारा व भक्ताला जीवदान देणारा आहे, हे सांगून झाले. आता या पुढील श्लोकांत समर्थ मूळ देवाच्या अंगचे गुणविशेष व त्याचे वैश्विक पराक्रम याची माहिती सांगणार आहेत. तत्पूर्वी मूळ विचारात देव किंवा परमेश्वर याचे स्वरूप कसे आहे, हे समजल्याशिवाय देवाचे माहात्म्य कळणार नाही. त्यासाठी दासबोधातील देवविषयक विचार पाहिले पाहिजेत.

मनाचे श्लोक हे दासबोधाचा काही भाग लिहून झाल्यानंतर सांगितले आहेत. त्यामुळे मनाच्या श्लोकांतून ‘देव’ शब्दाचा वापर करताना शिष्यांना दासबोधातील देवासंबंधीची माहिती अवगत आहे, असे स्वामींनी गृहीत धरले असावे.

समाजात अनेक प्रकारांची माणसे आहेत. त्यांचे आचारविचार, सवयी भिन्न असतात. त्यामुळे लोकांनी आपापल्या कल्पनांनुसार देवांची निर्मिती केली आहे. प्रत्येकाला आपल्या देवकल्पनेचा विलक्षण अभिमान असतो, असे उदंड देव जनमानसातप्रचलित आहेत. या संदर्भात दासबोधात वर्णन केलेली, लोकांची स्थिती पुढीलप्रमाणे आहे.

मुख्य देव तो कळेना। काशास कांहींच मिळेना।
येकास येक वळेना। अनावर ११ (दा. ११.२.२१)
दासबोधात प्रतिपादन केल्याप्रमाणे सर्वसाधारणपणे ‘देव’ कल्पनेत चार प्रकारचे देव आहेत (१) नाना प्रतिमा कल्पून केलेले देव ते प्रतिमादेव, (२) अवताराचा महिमा ऐकून तयार झालेले अवतारी देव (३) सर्वांचा अंतरात्मा असा विश्वात्मा हा देव आणि (४) निर्मळ, निश्चळ शाश्वत परब्रह्म हा देव यांपैकी देव कोणाला मानावे, हे समर्थांनीसोप्या भाषेत पुढीलप्रमाणे सांगितले आहे-

च्यारी खाणी प्यारी वाणी।
चौर्‍यांसि लक्षा जीवयोनी।
जेणे निर्मिती हे तिनी।
तया नांव देव॥ ब्रह्मा विष्णू आणी हर।
हे ज्याचे अवतार। तोचि देव हा निर्धार। निश्चयेंसी॥ (दासबोध)
पुढे, आपल्या विवेचनात समर्थांनी त्याला ’थोरला देव’ असे म्हटले आहे तोच शाश्वत देव आहे, असे मत समर्थांनी व्यक्त केले आहे आणि त्याला ओळखणे हे आध्यात्माचे सार आहे. या शाश्वत देवाने विविध अवतार घेऊन हे विश्व नाशापासून वाचवले आहे. अवतार घेताना देवाने प्राणिमात्रातील क्षमता पाहिल्या आहेत. तथापि, प्राणिमात्रातील भेद देवाने विचारात घेतले नाहीत. देवाने नीच समजल्या जाणार्‍या योनीतही अवतार घेऊन या जगाचे, ज्ञानसाधनांचे, पृथ्वीचे रक्षण केले आहे, अशी साक्ष पुराणातून मिळते. देवाला जाणताना त्याने घेतलेले मत्स्य, कूर्म, वराह (डुक्कर) हे अवतार व त्यामागील कथा समजून घ्याव्या लागतात. स्वामींनी पुढील श्लोकात ते अवतार स्पष्ट करून कुठल्याही योनीत अवतार घेण्यात भगवंताला कमीपणा वाटत नाही, असे म्हटले आहे, तो श्लोक असा आहे.

विधीकारणें, जाहला मछ वेशीं ।
धरी कूर्मरूपें धरा पुष्टी भागी ।
जना रक्षणाकारण नीच योनी ।
नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी ॥१२०॥
देव निर्गुण निश्चळ शाश्वत परब्रह्म रूपात असला तरी या जगाची काळजी त्याच्या ठिकाणी असते. त्याने जगाला नष्ट होण्यापासून वाचवले आहे. पुराणकथांच्या आधारे, परमेश्वर मानवी नव्हे, तर प्राण्यांच्या रुपात येऊन प्रसंगी नीच समजल्या जाणार्‍या योनीत प्रवेश करून जगासाठी आपले सामर्थ्य उपयोगात आणतो, हे स्वामी या श्लोकात सांगत आहेत- त्यापैकी पहिला अवतार हा मत्स्यावतार आहे. ब्रह्मदेवाने हे विश्व निर्माण केले. विश्वाच्या प्रलयकाळाला सुरुवात होताना ब्रह्मदेवाची रात्र सुरू होते. बलदेव झोपी गेले तरी त्यांच्या मुखातून वेद निघत होते, दानवांच्या कामाचीसुरुवात रात्री होते. त्यामुळे हयग्रीव नावाचा दैत्य तेथे वेद चोरण्याच्या उद्देशाने आला. या वेदज्ञानावर आपण वेगळी दैत्य सृष्टी निर्माण करू, असे त्याच्या मनात होते.

वेद चोरून तो पाण्यात लपून बसला. देवाच्या हे लक्षात येताच, भगवंताने प्रचंड माशाचे रूप धारण करून हयग्रीवाचा नाश केला व त्याने चोरून नेलेले वेद ब्रह्मदेवाला परत आणून दिले, अन्यथा त्या हयग्रीव दैत्याने, असुरांची प्रतिसृष्टी निर्माण करून सर्वांचा छळ केला असता. देवाने माशाच्या अंगचा पाण्यात संचार करण्याचा गुण विचारात घेऊन माशाचे रूप धारण करण्यात कमीपणा मानला नाही. माशाला पाण्यात हयग्रीवाशी लढाई करणे शक्य झाले व वेद परत मिळवता आले. पुराणानुसार हा भगवंताचा पहिला अवतार मानतात. भगवंताचा दुसरा अवतार कुर्मावतारआहे. त्याची पुराणकथा अशी आहे. देव आणि दानव यांनी समुद्रमंथन करायचे ठरवून मंदार पर्वताच्या साहाय्याने समुद्र घुसळणे चालू केले. मंदार पर्वताचा वापर त्यांनी ताक घुसणार्‍या रवी सारखा केला. सर्परुपी दोरीने हे मंथन चालू असता, मंदार पर्वत पाण्यात बुडू लागला. कारण, खालून त्याला आधार नव्हता. तेव्हा भगवंतांनी टणक पाठीच्या कासवाच्या रूपात अवतार घेऊन पर्वताला खालून आधार दिला. त्यामुळे समुद्रमंथन शक्य झाले.

स्वामींनी या श्लोकातील पहिल्या दोन ओळीत भगवतांच्या मत्स्य आणि कूर्म अवतारांचा स्पष्टपणे उल्लेख केला आहे. तथापि तिसर्‍या ओळीत ’जना रक्षणाकारणे नीच योनी’ एवढाच उल्लेख केला आहे. कूर्म अवतारानंतर वराह अवतार हे त्याकाळी सर्वांना माहीत होते. हिरण्याक्ष आणि इतर दैत्य विश्वंसकवृत्तीने पृथ्वीला बुडवून टाकण्यासाठी ओढून नेऊ लागले. पृथ्वीवरील लोकांना वाचवण्यासाठी ब्रह्मदेवाच्या नाकातून सुळे असलेला प्रचंड वराह (डुक्कर) उत्पन्न झाला. त्याने हिरण्याक्षाचा वध करून विराट रूप घेऊन बुडणार्‍या पृथ्वीला बाहेर काढले व लोकांना वाचवले. संतसज्जनांच्या रक्षणासाठी भगवंतानी नीच योनीतील होणे पत्करले. पण, पृथ्वीचा, तीवरीलसज्जन लोकांचा नाश होऊ दिला नाही, सर्वांना सांभाळले. हे अवतार भगवंतांनी लोकांना वाचवण्यासाठी घेतले आहेत. यासाठी लोकांनी मोठ्या भक्तिभावाने भगवंताची कृतज्ञतेने आठवण ठेवावी. त्या कृपाळू भगवंताला विसरू नये. सदैव त्याचा भक्त होऊन राहावे. भगवंताला त्याच्या भक्ती अभिमान असतो, भगवंत कधीही भक्ताची उपेक्षा करीत नाही.

७७३८७७८३२२
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

सुरेश जाखडी

दै. 'मुंबई तरुण भारत'मध्ये 'समर्थांच्या पाऊलखुणा' या सदराचे लेखक, 'एम.ए'पर्यंत शिक्षण, समर्थ वाङ्मयाचे अभ्यासक, रिझर्व्ह बँकेतून निवृत्त अधिकारी..