योग आणि संगीत : अंतर्मनाची एकत्रित साधना

    20-Jun-2025
Total Views |

योग म्हणजे शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक एकरूपतेची प्रक्रिया, तर संगीत म्हणजे आत्म्याशी संवाद साधण्याचे माध्यम. ही दोन्ही साधने मानवी आयुष्य अधिक समृद्ध, शांत आणि संतुलित करणारे आहेत. या दोन सृजनशील प्रवाहांची सांगड म्हणजेच मन, शरीर आणि आत्म्याचे समन्वय साधणारी एक अद्भुत साधना होय.

योग आणि संगीत : सुरांचे आणि श्वासांचे नाते


योगातील प्राणायाम आणि ध्यान यांच्या प्रक्रियेत श्वास हा केंद्रबिंदू असतो. श्वासांची लय, त्याचा प्रवाह हेच तर संगीताचे मूळ आहे. संगीतही लय, सूर, ताल या त्रयीतूनच जन्म घेतो. योगसाधना करताना सौम्य संगीत विशेषतः शास्त्रीय संगीत, भूप, यमन, हंसध्वनी यांसारख्या रागांचा स्पर्श मनात शांतता निर्माण करतो. संगीताचा प्रभाव मनावर जितका सखोल तितकाच तो योगसाधनेत साहाय्यभूत ठरतो.

ध्यानात संगीत आणि संगीतात ध्यान


ध्यान करताना जर पार्श्वभूमीला नादयोगाचे मंत्र, ओंकाराचे उच्चार किंवा शांत करणारे संगीत असेल, तर मन अधिक स्थिर होते. नाद म्हणजे ध्वनी आणि नादयोग हा योगाचा एक प्रकार आहे; ज्यात ध्वनीच्या कंपनांद्वारे आत्मशुद्धी साधली जाते. हेच संगीताचे खरे स्वरूप आहे, जे मनाची अराजकता दूर करून स्थैर्य आणते.

आधुनिक काळातील महत्त्व


आजच्या धकाधकीच्या जीवनात तणाव, चिंता, अस्वस्थता वाढली आहे. अशा वेळी योग आणि संगीत दोघेही नैसर्गिक, कोणत्याही औषधांशिवाय उपचार करणारी शक्ती ठरतात. विद्यार्थ्यांपासून ज्येष्ठांपर्यंत प्रत्येकासाठी ही दोन साधने अत्यंत उपयुक्त आहेत.

दि. २१ जून रोजीचा संदेश: समरसतेची साधना

दि. २१ जून रोजी एकाच वेळी ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ आणि ‘संगीत दिन’ साजरा होतो. हा योगायोग नव्हे, तर एक संदेश आहे. शरीर आणि आत्मा यांच्यातील ताळमेळ साधण्यासाठी योग आणि संगीत यांची सांगड घालणे, ही काळाची गरज आहे. आज आपण सर्वांनी हा संकल्प करायला हवा की, दररोज काही वेळ स्वतःसाठी, मनशांतीसाठी देऊया.

आपण योग आणि संगीत या दोघांचे एकत्रित रूप विशेषतः आपल्या गरजेनुसार (जसे की तणाव कमी करणे, झोप सुधारणे, एकाग्रता वाढवणे इत्यादी) कसे वापरू शकतो ते बघू.

१) तणाव कमी करण्यासाठी योग + संगीत

योग्य योगप्रकार:

- श्वसन नियंत्रण (प्राणायाम) : अनुलोम-विलोम, भ्रामरी

- शांत आसने : बालासन, शवासन, सुखासन

- ध्यान  : मनावर लक्ष केंद्रित करणे

- योग्य संगीत : राग भूपाली, यमन, हंसध्वनी

- साधने : बासरी, तंबोरा, सिंगिंग बाऊल्स

मंत्र : ॐ शांती शांती, शिव मंत्र कसा वापरायचा?


- प्राणायाम करताना Backgroundला मंद तंबोरा किंवा भूपाली ऐका.

- ध्यान करताना ओंकार जप ऐकवा 

- संध्याकाळी दिवे मंद करून शवासनात शांत संगीत ऐका.

२) झोपेची गुणवत्ता सुधारण्यासाठी योग + संगीत


योग्य योगप्रकार :

- योगनिद्रा  - वज्रासन, पवनमुक्तासन, शवासन

- योग्य संगीत : राग शंकरा, मालकंस, अहिर भैरव

- नादयोग संगीत : सिंगिंग बाऊल्स

मंत्र : ॐ नमः शिवाय -

कसा वापरायचा?

- झोपण्यापूर्वी १५ मिनिटांची योगनिद्रा करा.

- हलके Instrumental संगीत Backgroundला ठेवा.

- झोपताना फक्त  Breathing Music लावून डोळे मिटा

३) एकाग्रता वाढवण्यासाठी योग + संगीत

योग्य योगप्रकार :

त्राटक (नजरेने एक बिंदू पाहणे)

वज्रासन, सिद्धासन, पद्मासन, नाडी शोधन प्राणायाम

योग्य संगीत : राग दरबारी, तोडी, बिलावल

साधने : सरोद, सतार, वीणा

मंत्र : गायत्री मंत्र, ॐ उच्चार (दीर्घ)


कसा वापरायचा?

- अभ्यास करताना कमी आवाजामध्ये बिलावल राग

- त्राटक करताना एकच नाद  ऐका

- ध्यानाची मंत्रजपाच्या ५ मिनिटांनी सुरुवात करा

काही टिप्स

- संगीतविना शब्दांचे (Instrumental Chanting) असणे जास्त उपयुक्त. ते फार मोठ्या आवाजात नको. मनात शांतता टिकवणे महत्त्वाचे.

- नियमितता ठेवा : दररोज ठराविक वेळी योग आणि संगीत वापरल्यास प्रभाव जास्त पडतो.

अशाप्रकारे दैनंदिन जीवनात योग आणि संगीत यांची सांगड घालून आपण आनंदी आणि निरामय जीवन जगू शकतो.

स्वाती मुळे
(लेखक योग प्राध्यापक, योग व निसर्गोपचार तज्ज्ञ
संगीत विशारद आहेत.)