आज दि. २१ जून. हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ आणि ‘जागतिक संगीत दिन’ म्हणून जगभरात साजरा केला जातो. त्यानिमित्ताने आसनांच्या पलीकडील योगाची आध्यात्मिक अनुभूती उलगडणारा आणि योग आणि संगीताच्या स्वरानुबंधाची प्रचिती देणारे हे दोन लेख...
आंतरराष्ट्रीय योग दिवस’ हा दरवर्षी दि. २१ जून रोजी जगभरात साजरा केला जातो. संयुक्त राष्ट्रांनी याला मान्यता दिली आहे. या विशाल विश्वात योगाचे अनेक प्रकार प्रचलित आहेत. या योगाच्या अनेक प्रकारांची चर्चा ऐकून लोकांच्या मनात एक प्रश्न निर्माण होतो की, यापैकी खरा योग कोणता? त्यांना हे जाणून घ्यायचे आहे की, ज्या योगाने मनुष्याला मनःशांती मिळते, तो भगवंताशी एकरूप होऊन उत्सव साजरा करतो. अपार आनंद मिळतो आणि त्याची अवस्था अव्यक्त आणि स्थिर असते, तो योग कोणता? ते विचारतात की, ज्या योगामुळे पापे जळून जातात आणि मनुष्याला भविष्यात मोक्ष किंवा जीवनमुक्ती (देव-पद) मिळू शकते आणि अपार पवित्रता, दिव्यत्व आणि आध्यात्मिक आनंद मिळू शकतो, त्या योगाची ओळख काय? या सर्व प्रश्नांची अचूक उत्तरे मिळवण्यासाठी प्रथम ‘योग’ या शब्दाचा खरा अर्थ जाणून घेणे आवश्यक आहे.
योग म्हणजे काय?
भारत ही अध्यात्माची भूमी आहे. इथे अनेक प्रकारचे योग प्रचलित आहेत. हठयोग, राजयोग, ध्यानयोग, भक्तियोग इत्यादी. पण, खरा योग कोणता? असा योग जो आत्म्याला शांतता देतो, देवाशी जोडतो, पापांपासून मुक्त करतो आणि परमसुखाची अनुभूती देतो? ‘योग’ म्हणजे आत्म्याचे परमात्म्याशी जोडणे. केवळ श्वासावर नियंत्रण ठेवणे, डोळे मिटून बसणे किंवा काही विशिष्ट आसने करणे म्हणजे योग नव्हे. योगाचा खरा अर्थ आहे, आपल्या मनाला देवाच्या स्मरणात, त्याच्या प्रेमात, त्याच्या मार्गदर्शनात एकाग्र करणे. योग म्हणजे आत्मा आणि परमात्म्याचे मिलन. आपण म्हणतो, तोच माझा बाप, तोच माझी आई आहे. पण, आज हे नाते केवळ बोलण्यापुरते उरले आहे. प्रत्यक्ष जगण्यात देवाशी संबंध नाही, म्हणूनच सुख आणि शांती दूर गेली आहे.
योग म्हणजे ईश्वरीय स्मृतीत राहणे. योग ही केवळ एक तांत्रिक प्रक्रिया नाही. जसे आपण आपल्या वडिलांना ओळखतो, त्यांचे कर्तृत्व, स्वभाव, घर, मूल्य जाणतो, तसेच परमपित्याचे ओळखणे, हेच खरे ज्ञान आणि त्या ज्ञानातून येणारा विश्वास आणि स्मृती हीच खरी योगसाधना.
जसे एखादा प्रिय व्यक्ती मनात सतत असतो आणि त्याच्या आठवणीने प्रेरणा मिळते, तसेच जर देवाची आठवण आपल्या मनात असेल, तर आपण आपोआप त्याच्याशी जोडले जातो. मन आणि बुद्धी दोन्ही परमात्म्याच्या स्मरणात मग्न झाल्या की, तोच खरा ‘बुद्धियोग’ आहे. ही स्मृती केवळ भावनिक नसून, ज्ञानावर आधारलेली असते. म्हणूनच ब्रह्माकुमारीजमध्ये योग शिकवताना ज्ञानयोग, राजयोग, बुद्धियोग असे विविध प्रकार एकत्रित केले जातात.
देवाच्या श्रेष्ठ मतावर चालणे म्हणजे योग. आपला खरा संबंध त्या व्यक्तीशी असतो, ज्याच्या सल्ल्यानुसार आपण चालतो. जर मुलगा वडिलांच्या मतावर चालत नसेल, तर केवळ नातं आहे म्हणणे व्यर्थ ठरते. तसेच, जर आपण देवाच्या मताऐवजी आपल्या इच्छेप्रमाणे किंवा मायेच्या प्रभावाने वागत असू, तर आपला योग खोटा ठरतो.
देव म्हणतो, माझ्या स्मरणात राहा, माझ्याशी अपार प्रेम जोडा आणि माझ्या मतावर चालत राहा. मी तुम्हाला उत्तम मार्ग दाखवीन, ज्यामुळे तुम्ही दुःख सागर पार कराल. अर्थात, योग म्हणजे एकेकाळी शिकवलेले; पण नंतर विसरलेले खूप गूढ आणि श्रेष्ठ ज्ञान पुन्हा शिकवण्याची ईश्वरी योजना आहे. ही योजना यशस्वी होते, तेव्हाच आत्मा आणि परमात्मा यांचा खरा योग होतो.
सहज, सर्वश्रेष्ठ आणि व्यवहार्य योग
आजच्या काळात जेव्हा देव स्वतः अवतरतो आणि आपले नाव, रूप, निवासस्थान, कार्य आणि मत स्पष्ट करतो, तेव्हाच खरा योग शय होतो. ब्रह्माकुमारीजच्या शिक्षणानुसार परमपिता, परमात्मा, परमधामातून पृथ्वीवर येतो आणि आपल्या ज्ञानाने आत्म्यांना जागृत करतो. या योगासाठी ना आसन, ना प्राणायाम, ना घर सोडावे लागते. आपण आपले कर्तव्य करत करत, मनाने देवाशी जोडले जाऊ शकतो. म्हणूनच याला ‘सहज राजयोग’ म्हणतात. हे योग सर्व योगांमध्ये श्रेष्ठ आहे. याने आत्मा पवित्र होतो, विकारांवर विजय मिळवतो आणि भविष्यात स्वर्गासारखे जीवन प्राप्त करतो.
या योगांना विविध नावांनी ओळखले जाते - १) ज्ञान योग-ज्ञानावर आधारित योग, २) कर्म योग-कर्म करत करत स्मरणात राहणे, ३) संन्यास योग-वासनांचा त्याग, ४) समत्व योग-सुख-दुखः, मान-अपमानात एकसमान राहणे, ५)राजयोग-सर्व योगांचा राजा, ६)सहज योग-सहजतेने साधला जाणारा योग.
आंतरराष्ट्रीय योग दिन हा दिवस खूप महत्त्वाचा आहे. कारण, तो आपल्याला निरोगी आणि शांत राहण्याची आठवण करून देतो. सर्वांना आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
ओम शांती!
राजयोगिनी ब्रह्माकुमारी वासंती दीदी
(लेखक मुख्य संचालिका, प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय, नाशिक आहेत.)