नफेखोरी ग्राहकांच्या जीवाशी

    24-Sep-2023
Total Views | 24
Article On Food and Drug Administration Action Against Sweet Shops

सध्या सर्वत्र सणासुदीचे दिवस आहेत. गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, दसरा, दिवाळी, कोजागरी पौर्णिमा, ईद-ए-मिलाद, नववर्ष स्वागत अशा अनेक सणांमध्ये गोडधोड पदार्थ बनवले जातात. पण, आपण हे गोडधोड पदार्थ म्हणून भेसळयुक्त पदार्थ तर सेवन करीत नाही ना? याकडे जरा गांभीर्याने बघण्याची गरज आहे. गेल्या काही दिवसांपासून नाशिक शहरात भेसळयुक्त खवा, मावा, मिठाई, दूध संकलन केंद्र अशा दुकानांमधून भेसळयुक्त खाद्यपदार्थ बाजारात विक्रीसाठी येत असल्याचे अनेक प्रकरणे उघडकीस आले आहे. यात अनेक नामांकित आणि विश्वासू दुकानांचाही समावेश आहे. त्यामुळे अन्न व औषध प्रशासनाने गांभीर्याने दखल घेत कारवाया सुरू केल्या आहेत. परंतु, आपणदेखील दूध आणि दुग्धजन्य पदार्थांची खरेदी करताना खबरदारी घेण्याची गरज आहे. आपण व आपले कुटुंबीय या जीवघेण्या खाद्यपदार्थांपासून सुरक्षित राहणे गरजेचे आहे. नाशिकमध्ये अन्न व औषध प्रशासनाने गेल्या दोन महिन्यांच्या कालावधीत धाडसत्र सुरू करून भेसळ करणार्‍यांच्या उरात धडकी भरवली आहे. प्रशासनाकडे तक्रार आल्यास त्यांची कारवायांची मोहीम सुरू होते. मुळातच नाशिकच्या काही भागांत उदा. भद्रकाली, पंचवटी, सातपूर मार्केट, जुने नाशिक, द्वारका, त्रिमूर्ती चौक, पवननगर अशा काही भागांमध्ये प्रशासनाने फक्त चक्कर मारून जरी आले, तरी त्यांना अनेक ठिकाणांच्या दुकानांमध्ये अस्वच्छता तर दिसेलच. परंतु, भेसळयुक्त खाद्यपदार्थदेखील नजरेस पडतील. त्यामुळे सणासुदीच्या दिवसांत फक्त पाच-दहा कारवाया न करिता सरसकट विविध भागांमध्ये आपले अधिकारी पाठवून कारवायांची मोहीम राबविल्यास मोठ्या प्रमाणावर भेसळीचे प्रमाण आटोक्यात येईल. नागरिकांनीही स्वच्छ दुकानांमधूनच मावा, मिठाई विकत घ्यावी. जेणेकरून आरोग्यास घातक ठरणार नाही. सणासुदीत खाण्यापिण्याची चंगळ असते. दिवाळीत मिठाईचे महत्त्व खूप असते. बहुतांश मिठाईंमध्ये खवा हा असतोच. भेसळयुक्त खव्याने तुम्हाला सणसुदी ’महागात’ पड़ू शकते. एक लीटर दुधापासून साधारण २०० ग्रॅम खवा तयार होतो. त्यामुळे खवा व्यापार्‍यांना जास्त नफा मिळवता येत नाही. नफेखोरीसाठी काही व्यापारी ग्राहकांच्या जीवाशी, असा खेळ करतात. यापासून आपण स्वतःला नक्कीच वाचवण्याची गरज आहे.

गुन्हेगारांचा बदलता ट्रेंड

नाशिकमधील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक हेमंत पारख यांचे खंडणीसाठी अपहरण आणि सुटका प्रकरणात अपहरणकर्ते राजस्थानातील आणि विशेषतः गुन्हेगारी पार्श्वभूमीचे असल्याचे समोर आले. राजस्थानातून शहरामध्ये येत गंभीर गुन्ह्याचा कट रचून तो तडीस नेणारे, हे संशयित निष्पन्न झाले असले, तरी त्यांच्यावर कोणत्याच यंत्रणेची नजर नसल्याचे वास्तव समोर आले. अपहरणकर्ते राजस्थानातील कुख्यात असताना त्यांनी नाशिक शहरात बस्तान बसविले. त्यामुळे भविष्यात असे वा यांसारखे गंभीर गुन्हे घडू नयेत, यासाठी स्वतंत्र मॉनिटरिंग युनिट पोलिसांकडे कार्यरत असणे गरजेचे आहे. सध्या शहर पोलीस सराईत गुंडांची विविध जिल्ह्यांत तडीपारी करीत आहेत. मात्र, काही दिवस व महिने उलटत नाही तोच, हे तडीपार उजळमाथ्याने शहरात फिरताना दिसतात. तडीपार व्यक्तीची माहिती मिळताच पोलीस कारवाई करून, त्यांना पकडून हद्दपारी आदेशाचे उल्लंघन केले. म्हणून स्वतंत्र गुन्हा नोंदवितात. त्यामुळे तडीपारीचा ’डोस’ त्यांच्यावर लागू होत नसल्याचेही दिसते. दि. २ सप्टेंबरला पारख यांचे त्यांच्या घराजवळूनच सात जणांनी अतिशय नियोजनबद्धरित्या अपहरण केले. त्यासाठी संशयितांनी थेट राजस्थान पासिंगची पिक-अप, कट्टा व ‘व्हीओआयपी कॉलिंग’चा वापर केला. पारख यांच्यावर सहा महिने वॉच ठेवून शेवटच्या सहा दिवसांत रेकी करून अपहरणकर्त्याांनी प्लॅन पूर्ण केला. पोलिसांना माहिती होत असतानाच त्याच ’किडनॅपिंग अव्हर’मध्ये अपहरणकर्त्यांनी पारखांकडून खंडणी उकळत त्यांना सहीसलामत सोडून दिले. मात्र, शहर गुन्हेशाखेने दहा दिवसांत या अपहरणकांडाचा तपास करून राजस्थानातील सराईत जेरबंद केले. लॉरेन्स बिष्णोई गँगच्या नावाखाली या अपहरणकर्त्याने दोन कोटी रुपयांची खंडणी उकळल्याचे तपासात निष्पन्न झाले. बिष्णोईसारखे अनेक संशयित नाशिकमध्ये जम बसवून आहेत. खून, दरोडा, चोरी, घरफोडी, हाणामारी करण्यात परप्रांतीय गुंड मागे-पुढे पाहत नसून, दहशत प्रस्थापित करण्यासाठी त्यांनी गुन्ह्याच्या अनेक ’स्कीम’ लाँच केल्या आहेत. त्यामुळे आता उत्तर प्रदेश, बिहार अन् हरियाणासह राजस्थानातील संशयितांचा भरणा वाढत असून त्यावर नियंत्रण प्रस्थापित करण्याची गरज आहे.

गौरव परदेशी 
अग्रलेख
जरुर वाचा
ऊर्जासंपन्न महाराष्ट्रासाठी : पर्यावरणपूरक वीजनिर्मितीचे व्हिजन!

ऊर्जासंपन्न महाराष्ट्रासाठी : पर्यावरणपूरक वीजनिर्मितीचे व्हिजन!

महाराष्ट्र हे वीजनिर्मितीत भारतातील सर्वांत आघाडीचे राज्य. देशात निर्माण होणार्या एकूण विजेच्या १५ टक्के विद्युतनिर्मिती ही एकट्या महाराष्ट्रात होते. परंतु, तरीही मागणीचे प्रमाण हे वीजनिर्मितीपेक्षा जास्त असल्याने आज राज्य सरकार नवीकरणीय ऊर्जानिर्मितीवर भर देत आहे. अशातच नुकतीच राज्य सरकारने मोठी वीजदरकपात जाहीर केली. ज्यामुळे आता पुढील पाच वर्षे वीजबिल वाढणार नाही, तर कमी होणार आहे. तेव्हा राज्यातील वीज ग्राहकांना नेमका हा लाभ कसा मिळणार, यासंबंधी महाराष्ट्र राज्य वीज सूत्रधार कंपनीचे स्वतंत्र संचालक ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121