अनाथांचा अनाथ नाथ

    02-Jul-2023   
Total Views |
Article On Vishal Parulekar

४ वर्षांचा असल्यापासून अनाथ असलेला विशाल परुळेकर आज ४० अनाथ मुलांचे कुटुंब तुटपुंज्या मिळकतीत अभिमानाने चालवतो आहे.. त्याविषयी..

गोष्ट आहे विरारमधली. पालघर जिल्ह्यातील विरार हा तसा गावांचा शहराकडे येण्याचा दरवाजा. पश्चिम रेल्वेच्या लोकल आता डहाणूपर्यंत जातात; पण पूर्वी त्या विरारपर्यंतच होत्या. मुंबई आपले हातपाय पसरत होती तशी तिला पोसण्यासाठी ही खेडोपाड्यातली माणसं लोकलमधूनच तिच्याकडे धाव घेत. विरारपर्यंतची गावं सुफळ झाली तरी खानिवडे, वाडा, मोखाडा असा पालघर जिल्हा कोरडाच होता. नव्याने सुबत्ता आलेल्या विरारमध्ये ही मंडळी मग अर्थार्जनासाठी येऊ लागली आणि रेल्वेस्थानकाजवळची वर्दळ वाढू लागली. त्याच स्थानकाबाहेर एक साईबाबांचे मंदिर होते. तिथे एक पोरसवदा मुलगा भीक मागायचा. त्याचीच ही गोष्ट.
 
विशाल सव्वा महिन्याचा होता तेव्हा त्याची आई देवाघरी गेली. वडिलांचाही मृत्यू झाला. विशाल सर्वार्थाने अनाथ झाला. मिळेल तसे आयुष्य जगताना त्याने भीक मागायला सुरुवात केली. विरारचे तत्कालीन आमदार हितेंद्र ठाकूर यांनी नोकरी दिली आणि विशालचं भीक मागणं थांबलं, तरीही समृद्धी काही आली नाही. अपुरं शिक्षण आणि जेमतेम पोटाशी गाठ अशावेळी अनाथांविषयी त्याला कणव वाटली तरीही तो काही करू शकायचा नाही. लहानपणापासून अनाथ असल्याने अनाथांसाठी खूप काही करावं असं त्याला वाटायचं. विशाल तेव्हा २१-२२ वर्षांचा होता. आपल्याला झालेला त्रास इतरांना भोगावा लागू नये; म्हणून विशालने त्यावेळीपासूनच अनाथांना मदत करण्यास सुरुवात केली. सुरुवातीला स्टेशनरीचे सामान घेऊन देणे किंवा शाळेचे किंवा परीक्षांचे शुल्क भरण्यास मदत केली.
 
एके दिवशी एका कुष्ठरोगी आजींना दवाख्यान्यात नेताना त्यांच्या नातवाचा गणेशचा प्रश्न होता. गणेश लहान असल्याने तो एकटा रस्त्यावर जगू शकणार नव्हता. विशाल गणेशला आपल्या घरी घेऊन आला आणि त्याच्या अनाथालयाचा श्रीगणेशा झाला. साईबाबांची कृपा म्हणून या परिवाराचे नाव साई परिवार. एका निराधार मुलाला आधार दिल्यापासून आज १३ वर्षांमध्ये ८०हून अधिक अनाथ मुले साई परिवाराचा भाग झाली. आजच्या घडीला ३६ मुले व मुली विशाल व अंकिता यांच्यासोबत राहतात. येथे कोणी कर्मचारी नाही, त्यामुळे परिवारातील सदस्यच सारी कामे वाटून करतात. विशाल साधे वाहन चालक आहेत. त्यातून होणार्‍या कमाईवर हे कुटुंब आजवर तग धरून आहे.

नुकतीच विशी पार केलेला तरुण आपल्या उज्ज्वल भविष्याची स्वप्ने पाहण्यात दंग असतो. आयुष्यात आर्थिक स्थैर्य कसे येईल, या प्रयत्नात तो गढून गेलेला असतो. परंतु, विशालच्या महत्त्वाकांक्षा त्याहूनही मोठ्या होत्या त्याजोडीला त्याचं मनही तेवढंच विशाल होतं. शून्यातून उभारी घेऊन ऐन तारुण्यात ४० जणांच कुटुंब चालवणं सोपं काम नसतं. त्यासाठी दुर्दम्य इच्छाशक्ती हवी. एखादी जबाबदारी घ्यायची म्हणजे तेवढीच कडवी वचनबद्धता हवी. मात्र, स्वतःच्या लहानशा संसारात घर हरवलेल्याचं कुटुंब सांधायचा प्रयत्न विशाल करत आहेत. त्यांची पत्नीही त्यांच्यासारखीच, आपला मोडका संसार पाहून तिला भविष्याची चिंता जाळत नाही, तर पतीच्या दृष्टिकोनातूनच ती जग पाहते.

विशाल म्हणतो, कधी थकून भागून घरी यावं, गाडी बाहेर लावावी आणि घरात शिरावं तर दोन इवलेसे कुतूहल भरले डोळे भिंतीला टेकून आपल्याकडे पाहत असतात! हे अंकिताचंच काम. आपल्याला नवं बाळ झालेलं असतं! या परिवारात मुलांना बारावीपर्यंत शिक्षण देऊन नंतर शिलाई काम, बांधकाम, नर्सिंग, मोबाईल दुरुस्ती कोर्स करायला देऊन तसेच गरजेपुरते साहित्य विकत घेऊन दिले जाते. त्यानंतर मुले आपली आपली वाट शोधण्यास परिवारातून बाहेर पडतात. या सुरुवातीच्या वर्षांत त्यांना जगाशी दोन हात करण्याची चांगलीच सवय झालेली असते. मग ते आपापले मार्ग जोखण्यासाठी बाहेर पडतात. परंतु मुलींना मात्र लग्न होईपर्यंत साई परिवारात आश्रय मिळतो. अशा चार मुलींची लग्ने विशालने लावली आहेत. आजही त्यांच्या परिवारात सात मुली आहेत. अंकिता मुलींना शिवणकामाचे धडे देतात. तसेच, त्यांचा ब्युटीपार्लरचा व्यवसाय आहे. त्यातही त्या मुलींना प्रशिक्षित करून घेतात. जेणेकरून पुढील आयुष्यात त्यांना कुणावर अवलंबून राहण्याची वेळ येणार नाही.

विशाल यांचा स्वतःचा टेम्पो होता. त्यावरून त्यांच्या संपूर्ण परिवाराचा चरितार्थ चालत होता. परंतु कोविडच्या पहिल्या लाटेत त्यांना आपला टेम्पो विकावा लागला. आता ते गाडी भाड्यावर घेऊन आपले व कुटुंबाचे पालनपोषण करत आहेत. त्याचबरोबर मुली व अंकिता आपले शिवणाचे काम व ब्युटीपार्लर चालवून संसाराला हातभार लावत असतात. त्यांना किरणामालासाठी महिन्याला साधारण २० ते २२ हजार रुपये इतका खर्च येतो. त्याव्यतिरिक्त वेगळे खर्च आहेतच. मुले वाढत्या वयाची आहेत, दूर गावात राहणे, पायी शाळेत जाण्याने मुलांना भूक लागते. एकंदरीतच गरजा जास्त असल्यामुळे जुने, वापरलेले किंवा फाटलेले असतील, तरीही असे कपडे द्यावे, असे ते आवाहन करतात. आताशा समाजातील काही लोकांनी विशाल यांचे काम पाहून त्यांना मदतीचे हात पुढे केले आहेत. परंतु ही मदत पुरेशी नाही. लोकांनी पाठवलेले कपडे इतक्या वाईट अवस्थेत असतात की त्यांची पायपुसणीसुद्धा शिवता येत नाहीत. परुळेकर दाम्पत्य तेही फुकट घालवत नाहीत. मग त्या कपड्यांच्या पिशव्या शिवून विकल्या जातात. परिस्थितीशी संघर्ष करत एवढं मोठं कुटुंब पोसणार्‍या विशाल यांस दै. ‘मुंबई तरुण भारत’तर्फे अनेकानेक शुभेच्छा!

(या उपक्रमास मदतीसाठी विशाल परुळेकर - ७७४१८०६२२३ यांच्याशी संपर्क साधावा.)

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

मृगा वर्तक

मुंबई विदयापीठातून पत्रकारिता व संज्ञापण विषयात पदव्युत्तर शिक्षण. इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठातून मानसशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण. वसईतील विविध समाज व खाद्यसंस्कृतीचा अभ्यास. ललित व पर्यटन विषयावर लेखन करण्याची आवड. तसेच स्त्रीवादी विषयांवर लेखन करण्याची आवड.