शिवकन्या कृष्णाई

Total Views |

शिवकन्या कृष्णाई

अवघ्या नवव्या वर्षी छत्रपती शिवरायांचा रोमांचक इतिहास, ‘पोवाडा’ सादरीकरणातून महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यां पोहोचविणार्‍या शिवकन्या कृष्णाई फोंडकेविषयी...


वर्ष 2023 मध्ये किल्ले रायगडची पवित्र भूमी छत्रपती शिवरायांच्या 350व्या राज्याभिषेक सोहळ्यासाठी सज्ज झाली होती. अशा ऐतिहासिक क्षणी पहिलीत शिकणार्‍या कृष्णाईने आपल्या पोवाड्यातून सर्व उपस्थित शिवप्रेमींचे लक्ष वेधले. त्यावेळी रायगडावर जमलेल्या शिवप्रेमींनी दिलेली दाद आणि प्रतिसादामुळे एका चिमुरडीला आपल्यातील कलाकार उमगला. इतकेच नाही, तर छोट्या कृष्णाईला ‘शिवकन्या कृष्णाई’ ही ओळखही याच किल्ले रायगडानेच दिली.


ठाण्यतील अवघ्या नऊ वर्षांच्या कृष्णाई सुहास फोंडके हिला गायनाचे बाळकडू पिढीजातच मिळाले. कृष्णाईचे आजोबा सहदेव फोंडके हे निस्सीम विठ्ठलभक्त. त्यामुळे विठ्ठलभक्तीत रममाण असणार्‍या आजोबांच्या मुखी सातत्याने पांडुरंगाची भजने असत. यानंतर हा वारसा कृष्णाईचे वडील सुहास यांनीदेखील भजन गायनातून जोपासला. हेच पाहत कृष्णाईनेदेखील हा वारसा आत्मसात केला. कोरोना काळात बराच काळ घरी असणार्‍या आपल्या वडिलांना कृष्णाईने गाणे गुणगुणताना ऐकले. आपल्या लहान मुलांनी शिवरायांचा इतिहास ऐकावा, त्यातून प्रेरणा घ्यावी, या उद्देशाने सुहास यांनी कृष्णाईला ‘प्रतापगडच्या पायथ्याशी खान’ हा पोवाडा ऐकवला. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, कृष्णाई काही दिवसांतच हा पोवाडा अगदी न चुकता गाऊ लागली. अवघ्या साडेतीन वर्षांच्या कृष्णाईचे अशारितीने पोवाडा गायन सुरू झाले.


ठाण्यातील जांभळी नाक्यातील छत्रपती शिवाजी महाराज मैदानातील एका कार्यक्रमात, कृष्णाईला पहिले व्यासपीठ मिळाले. तब्बल 700 ते 800 ठाणेकरांसमोर कृष्णाईने अत्यंत आत्मविश्वासाने पोवाड्याचे सादरीकरण केले. त्यामुळे कृष्णाईच्या वडिलांनी तिला नवीन पोवाडा शिकविण्याचे ठरविले. यासाठी प्रसिद्ध शाहीर पिराजीराव सरनाईक यांच्या पोवाड्यांची सुहास यांनी निवड केली. सुरुवातीपासूनच आवडीने पोवाडे आणि भक्तिसंगीत घरी ऐकले जात असल्याने, अनेक पोवाडे संग्रही होतेच. शाहीर सरनाईक यांचा शिवराज्याभिषेक पोवाडा आणि छत्रपती संभाजी महाराजांवरील पोवाडा सुहास यांनी कृष्णाईला शिकवला. कृष्णाईला पोवाडा शिकवणे थोडे आव्हानात्मकच होते. कारण, तिला समजेल आणि शब्दउच्चार जमेल असेच कडवे तिला गाणे सोपे जात असल्याचे सुहास सांगतात. कोरोनाकाळात सुरू झालेला कृष्णाईचा हा लोकसंगीताचा प्रवास आज 60 पोवाडे गायनापर्यंत पोहोचला आहे. आजतागायत या छोट्या शिवकन्येने 60हून अधिक कार्यक्रमांमध्ये पोवाडा सादरीकरण केले आहे. विशेष म्हणजे किल्ले रायगड येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 350व्या राज्याभिषेक सोहळ्यानिमित्त कृष्णाईला पोवाडा गायन करण्याची संधी मिळाली. यासाठी तिचा सन्मानही करण्यात आला.


कृष्णाईतील कलागुण हेरून, तिच्या पालकांनी शास्त्रोक्त संगीत शिकण्यासाठी तिला प्रोत्साहन देण्याचे ठरवले. खरंतर आजच्या काळात नृत्य, संगीत, लोककला यांना चांगले दिवस आले आहेत असे म्हटले, तर वावगे ठरणार नाही. कारण, पूर्वी याच कला शिकण्यासाठी आपल्या पालकांना समजावणे अनेकांसाठी एक आव्हानाच होते. आज पालक स्वतःच मुलांना नृत्य, गायन किंवा संगीत, चित्र अशा विविध कलांचे प्रशिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहन देतात. अशारीतीने सुहास फोंडके यांनी आपली कन्या कृष्णाईला शास्त्रोक्त संगीत शिकण्यासाठी गुरूंकडे पाठविले. आज कृष्णाई, अत्यंत आवडीने उषा जाधव यांच्याकडे शास्त्रीय संगीताचे धडे गिरवते असून, ती शास्त्रीय संगीताच्या तीन परीक्षाही उत्तीर्ण झाली आहे. आपली आवड जोपासत असतानाच, कृष्णाई शाळेतील अभ्यासातही तितकीच निपुण आहे. यंदाच्या वर्षी चौथीत गेलेल्या कृष्णाईला परीक्षेत 94 टक्के गुण मिळाले. तिची शाळा सरस्वती विद्यालयही तिला गायनासाठी कायमच प्रोत्साहन देते. शालेय स्तरावरील अनेक राज्यस्तरीय गायन स्पर्धेत, कृष्णाईने लक्षवेधी कामगिरी केली आहे.


नाशिकमधील प्रतिष्ठित ‘सावित्री ज्योति सन्मान 2022’, ‘यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान’ कोकण सन्मान 2022’मध्ये कृष्णाईला नामांकन मिळाले होते. जागतिक महिला दिनानिमित्त ठाणे येथे 2024 साली कृष्णाईला ‘ती समर्थ’ पुरस्काने सन्मानित करण्यात आले. राज्याचे परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांच्या शुभहस्ते कृष्णाईला ’विशेष लक्षवेधी’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. “कृष्णाई पोवाडा गायन या लोककलेचा प्रसार आणि प्रचार करण्याचा प्रयत्न करीत आहे आणि करत राहणार आहे. आताच्या पिढीपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांचे विचार व पराक्रम पोहोचविण्यासाठी, पोवाडा हा उत्तम कलाप्रकार आहे. कृष्णाईने तिची आवड जोपासत हे कार्य पुढेही असेच सुरू ठेवावे,” असे कृष्णाईचे वडील सुहास फोंडके सांगतात. “मला चित्रपटांची गाणी फार आवडत नाही. मला माझ्या बाबांनी पोवाडे, भजन शिकवले. माझ्या बाबांना मी कायम हेच गाताना ऐकले आणि मी शिकले. त्यामुळे मलाही आता तीच गाणी आवडतात. मला मोठेपणी जिल्हाधिकारी बनायचे आहे. पण, मी माझी गाण्याची आवडही जपणार आहे,” हे छोटी शिवकन्या कृष्णाई अत्यंत आत्मविश्वासाने सांगते. कृष्णाईची सर्व स्वप्न पूर्ण होवो या सदिच्छेसह भविष्यातील वाटचालीसाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून खूप खूप शुभेच्छा!

गायत्री श्रीगोंदेकर

मूळची अहमदनगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूटमधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयातून पदव्युत्तर शिक्षण. सध्या मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर कार्यरत.