न चाललेले नाटक...

    30-Jun-2023   
Total Views |
Indian playwright Mahesh Elkunchwar Statement On Marathi Culture

बुद्धिमत्तेचे मापदंड गेल्या काही दशकांत बदलले. भारताची सांस्कृतिक विविधता आणि तिच्यातील अंतर्गत जटिलता उत्तमरितीने मांडली जाऊ लागली. अशाच एका हिर्‍याला प्रकाशात आणलं, ते विजया मेहतांनी. त्यांनी आपल्या उमेदीच्या काळात अनेक उत्तम नाटके केली. मुळातच रसिक असलेल्या मराठी माणसाने त्यांना उदंड प्रतिसाद दिला; पण कलेला काळाची बंधने, तसं झालं! काळ प्रवाही असतो. त्याचा तुकडा मुठीत पकडून वाहत्या काळासोबत पुढे जायचं नसतं. त्या एवढ्याशा तुकड्यातून आकाश पाहायचं नसतं. कालानुरूप स्वतःच्या कलेची चिकित्सा करतच अभिव्यक्त व्हायचं असतं. सुहास बहुलकरांच्या पुस्तक प्रकाशनावेळी एलकुंचवार बोलत होते. “मराठी माणूस स्वतःला सुसंस्कृत म्हणवतो, त्याचा सुसंस्कृततेशी खरंच संबंध आहे का?” असा बेजबाबदार प्रश्न त्यांनी यावेळी बोलताना उपस्थित केला. कला, इतिहासाबाबत आपण अनभिज्ञ असतो. हे सांस्कृतिक सुमारीकरण नव्हे, भिकारीकरण आहे,“ असं बाळबोध वक्तव्यही त्यांनी केलं. आज संस्कृती हा शब्द केवळ कला आणि मनोरंजन या दोन शब्दांच्या जोखडात अडकलेला नाही. तिला अनेक आयाम आहेत. परंपरा, साहित्य, तंत्रज्ञान, समाज माध्यमे हे बदलत्या संस्कृतीचे नवे चेहरे आहेत. अर्थातच, ते स्वीकारार्ह आहेत. कलाकाराने स्वमग्न असू नये. भवतालच्या परिस्थितीविषयी जागरूक असावं. बदलत्या सांस्कृतिक समीकरणांकडे पाहण्याचा त्याचा दृष्टिकोन कलाकाराने सतत जोखत राहायला हवा. एकतर आपल्याला येणारे अनुभव, आपले विचार, आपल्या मनाचा लेखाजोखा त्याने उत्कटतेने मांडून अभिव्यक्त व्हावं, नाहीतर कल्पिताचे भावविश्व उभारताना, कलेचा सौदा करायचा असेल, तर समाजाला काय हवं, या प्रश्नाचा गांभीर्याने विचार करावा. साहित्यनिर्मितीच्या अपयशाचे खापर समाजावर फोडणे, म्हणजे कलाकार म्हणून आपली जबाबदारी झटकण्यासारखेच आहे. आपल्या कलेचे मूल्य आपण जाणतो; पण तिची किंमत आपण ठरवू नये. अनेकांचे कलाविष्कार त्यांच्या काळात फसले. कलेला काळाची मर्यादा केव्हाच नसते. विचार हादेखील संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे.
 
कलेच्या इतिहासाची गोष्ट

आज जुनी नाटके पुन्हा-पुन्हा रंगमंचावर येतात. ‘चारचौघी’, ‘अलबत्या गलबत्या’ अशा नाटकांना आजच्या पिढीचाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो. ’देवबाभळी’ सारखी आजची नवी नाटके धार्मिक, आध्यात्मिक अधिष्ठान असतानाही लोकप्रिय होतात. ’३८ कृष्ण व्हिला’सारखी नव्या शैलीची नाटकेही चालतात. ’जाणता राजा’चे प्रयोगांवर प्रयोग होतात. इथे नाही होत ती संस्कृतीची कुचंबणा? बालसंस्कार वर्ग, गर्भसंस्कार वर्ग, विपश्यना शिबिरे, ध्यान वर्ग, योग वर्ग, या आपल्या संस्कृतीचा वारसा सांगणार्‍या संस्थांना मिळतोय, ना उदंड प्रतिसाद! मोडी लिपी, ब्राह्मी लिपी, शारदा लिपी शिकण्यासाठी आजही विद्यापीठात विद्यार्थी चौकशी करताना दिसतात. दिवाळसण, गणेशोत्सव, पाडवे, नवरात्रोत्सव, दहिकाला, नारळी पौर्णिमा आज उल्हासात साजरी होते. संस्कृतीला कायमस्वरुपी मूर्त रूप द्यावं, म्हणून प्रतिमा पूजन (आणि प्रतिमाभंजनसुद्धा) होताना आपण पाहतो. अनेकांचे पुतळे उभारले जातात. महत्त्वाच्या वास्तूंमध्ये तैलचित्रे लावली जातात. ’अभंग रिपोस्ट’ सारखे युट्यूब चॅनेल एका रात्रीत लोकप्रिय होते आणि लाखोने स्बस्क्रायबर्स त्याला मिळतात.असा हा मराठी माणूस आपली संस्कृती विविध माध्यमातून सतत जपत असतो. संस्कृतीच्या बदलत्या प्रवाहाशी तो अत्यंत प्रामाणिक असतो आणि म्हणूनच तो स्वतःला ‘सुसंस्कृत’ म्हणवतो! भारताचा इतिहास सांस्कृतिक आहे, तो राजकीय नाही. परंतु, त्याला राजकीय अंगाने किंवा बाजूने लिहिले गेले. काळावर आणि तत्कालीन समाजावर राजकारणाचा मोठ्या प्रमाणावर प्रभाव पडत असतो. परंतु, आज राजकीय आणि सामाजिक विषयांचं वावडं कलेला का आलं आहे? ’पुरुष’, ’बॅरिस्टर’सारखी नाटके का होत नाहीत? ’सिंहासन’सारखे चित्रपट का तयार होत नाहीत? कलेने आपली अस्सलता टिकवली आहे का? कला आजच्या समाजावर भाष्य करते का? स्वतःच्या कलाकृतीवर प्रेम असावं; पण तिला प्रतिसाद मिळालाच पाहिजे, असा अतार्किक अट्टाहास करू नये. ही अभिजात संस्कृती आहे, तिला खळ लागणे, कदापि शक्य नाही. केवळ तिच्या प्रवाहाच्या दिशा जोखत राहायला हव्यात. हेच आपल्या हातात आहे.

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

मृगा वर्तक

मुंबई विदयापीठातून पत्रकारिता व संज्ञापण विषयात पदव्युत्तर शिक्षण. इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठातून मानसशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण. वसईतील विविध समाज व खाद्यसंस्कृतीचा अभ्यास. ललित व पर्यटन विषयावर लेखन करण्याची आवड. तसेच स्त्रीवादी विषयांवर लेखन करण्याची आवड.