छत्तीसगढमधले धर्मांतर आणि राजकारण

    04-Feb-2023   
Total Views |
Conversion and Politics in Chhattisgarh

छत्तीसगढमधील जनता मुळातचसाधीभोळी आणि धार्मिक प्रवृत्तीची. पण, सध्या याच छत्तीसगढमधील धर्मांतरण आणि त्याविरोधातील जनआक्रोश प्रसारमाध्यमांत चर्चेचा विषय ठरला आहे. नारायणपूर येथे वनवासी समाजाने धर्मांतराविरोधात एकजुटीने उभे राहावे, ही घटना छत्तीसगढच नव्हे, तर देशभरासाठी वेगळी घटना होती. या घटनेच्या अनुषंगाने छत्तीसगढमधल्या सध्याच्या वास्तवाचा मागोवा घेणारा हा लेख...

छत्तीसगढमध्ये हजारो धर्मांतरित व्यक्ती पुन्हा हिंदू म्हणून जगायला लागले आहेत. प्रचलित भाषेत त्यांची ‘घरवापसी’ झाली आहे. यावर छत्तीसगढचे काँग्रेसी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांचे म्हणणे की, ”ज्यांची घरवापसी होते, त्यांना कोणत्या वर्णात ठेवणार? तुम्ही ख्रिस्ती झालेल्या, मुसलमान झालेल्या लोकांना परत हिंदू धर्मात आणले खरे, पण त्यांना कोणत्या वर्णात ठेवाल? शुद्र, वैश्य, क्षत्रीय, ब्राह्मण... नेमके कुठे ठेवाल? त्यांचे विवाह कोणत्या जातीतल्या व्यक्तींशी होतील की त्यासाठीही वेगळी व्यवस्था कराल?” इतकेच नाही, तर बघेल असेही म्हणाले की, ”जाती तर ‘बाय बर्थ’ मिळतात, त्या बदलू शकत नाही. मात्र, धर्म बदलू शकतो.” याचाच अर्थ छत्तीसगढच्या काँग्रेसी मुख्यमंत्र्यांना धर्म बदलला तर चालणार होता. पण, जाती बदलण्याबद्दल तितकेसे ते सहमत नाहीत. त्यांच्या या विधानातली ‘जाती बदलू शकत नाहीत’ या वाक्यामध्ये एक खूप मोठा अर्थ दडला आहे.

छत्तीसगढमध्येच का देशभरात हिंदू धर्मातून ख्रिस्ती झालेल्या लोकांपैकी बहुसंख्य लोकांनी आपल्या हिंदू समाजातील मूळ जातीच्या आधारावर असलेल्या सवलतीमिळाव्यात म्हणून जात बदलली नाही. दुसरीकडे ख्रिस्ती धर्म सांगितला की, अल्पसंख्याक म्हणूनही सवलती आहेतच.त्यामुळे धर्म बदलू शकतो. मात्र, जात बदलू शकत नाही, असे तर भूपेश बघेल म्हणाले नसावेत ना?छत्तीसगढ नेहमीच धर्मांतराच्या वणव्यात जळत असते. नक्षलग्रस्त दुर्गम भागातील पाडे. तिथे आधुनिक जगापासून दुरावलेला भोळाभाबडा साधा समाज. त्यांना फसवणे सोपेच. त्यामुळे पूर्वी येथे सेवेच्या नावाखाली धर्मांतरण व्हायचे, तर आता आंदोलन वगैरे करून धर्मांतर करण्याचा प्रयत्न होत आहे. वनवासी समाजाला जंगल संदर्भातील कायदा, नागरी हक्क कायदा याबाबत तंतोतंत ज्ञान नसतेच. तसे ते शहरी नागरिकालाही असतेच असे नाही. मात्र, या वनवासी बांधवाला जल-जमीन-जंगल तुझेच आहेत. तूच मूलनिवासी आहेस. बाकी सगळे परदेशी आहेत. बाहेरून आले आहेत. त्यांचा तुझ्या जंगलामध्ये राहण्याचा जगण्याचा हक्क नाही,असे सांगून भडकावले जाते. तसेच, सगळे जंगलाची जमीन निसर्गसंपत्ती तुझी आहे, तुला हवे ते कर, असेही सांगितले जाते. हे सगळे यातील काही समाजबांधवांना खरे वाटते.

कायद्याने त्यांच्या नसलेल्या जमिनीवर आणि साधनसंपत्तीवरही केवळ अज्ञानाने ते हक्क सांगतात. ‘तुम्ही प्रशासनाविरोधात, सरकारविरोधात इथल्या समाजव्यस्थेविरोधात आंदोलन करा, लढा, तुम्हाला हक्क आम्ही मिळवून देतो,’ असे म्हणत काही संघटना त्यांना मदत करतात. पोलिसांत म्हणणे नोंदवणे, वकील नियुक्त करून न्यायालयात केस वर्षानुवर्षे लढवणे यासाठी या संघटना मदत करतात. त्या संघटनेच्या या कामाबदल्यात काही वर्षांत हे वनवासी बांधव ख्रिस्ती झालेले आढळतात. हे एक चक्र आहे. आश्चर्याची गोष्ट अशी की, छत्तीसगढच्या दुर्गम नक्षलग्रस्त भागात प्रशासकीय किंवा इतर कुणी सहजासहजी जाऊ शकत नाहीत. मात्र, अशा संघटना आणि येसूमसीची दया सांगणारे पाद्रीबुवा, नन मात्र अगदी सहज जातात. त्यांना प्रवेश कसा काय मिळतो देव जाणे!

असो. तर मुद्दा आहे छत्तीसगढमधल्या धर्मांतरणाच्या घटनांचा. तसेच, धर्मांतरणाविरोधात घडलेल्या घटनांचा. सध्या छत्तीसगढच्या बस्तरमधील नारायणपूर गाजते आहे. इथे जानेवारी महिन्यात एक घटना घडली. फसवून धर्मांतरण केले जाते, म्हणून जमावाने चर्चची तोडफोड केली. त्यानंतर काही लोकांवर पोलिसी कारवाई झाली. मात्र, वनवासी समाजातील लोकांवर उगीचच कारवाई केली, असे समाजाचे म्हणणे. त्यातूनच पोलीस अधिकार्‍यालाही मारहाण झाली. धर्मांतरणाविरोधात उभा ठाकलेला जमाव वनवासी समाजातलाच होता. स्थानिक वनवासींविरूद्ध धर्मांतरित वनवासी आणि ख्रिश्चन असा हा संघर्ष. आजपर्यंत असे कधी घडले नव्हतेच. त्यामुळे या घटनेबद्दल चर्चांना उधाण आले. भोळाभाबडा वनवासी समाज आपले काम भले की आपण भले! मग ही घटना कशी घडली? असा सवाल काही लोक विचारू लागले. तिथल्या सत्ताधारी काँग्रेस पक्षाने तसेच सहकारी पक्षांनी यापाठीमागे हिंदुत्ववादीसंघटनांचा हात आहे, असेही म्हंटले आहे

छत्तीसगढमध्ये सध्या निवडणुकीचे वातावरण आहे. सगळ्याच पक्षाचे नेते येथे दाखल होतात. देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनीही इथे भेट दिली आणि जनतेला प्रश्न केला होता की, केंद्र सरकारने छत्तीसगढला विकासासाठी ९ हजार, २०० कोटी रुपये निधी दिला. पण, छत्तीसगढचा विकास झाला का? तो निधी कुठे गेला? अमित शाह यांचा जनसंपर्क आणि प्रश्न छत्तीसगढच्या काँग्रेसी राज्यकर्त्यांना बराच झोंबला. दुसरीकडे कम्युनिस्ट पार्टीच्या वृंदा करात यांनीही छत्तीसगढला भेट दिली आणि त्या म्हणाल्या की, “छत्तीसगढच्या धर्मांतराचा मुद्दा बनवून राजकारण करू नये.”मात्र, ज्यांनी छत्तीसगढचे जनजीवन पाहिले आहे, त्यांना जाणवेल की, धर्मांतरणाबाबतच आक्रोश हा समाजाचा उत्स्फूर्त आक्रोश आहे आणि तो कधी ना कधी बाहेर येणारच होता.

छत्तीसगढमध्ये प्रशासकीय स्तरावर २९ जिल्हे वनवासीबहुल म्हणून घोषित आहे. गोंड, संथाल आणि मुंडा समाज इथे प्रामुख्याने. इथे धर्मांतराचा वेग वाढत आहे. पण, सध्या धर्मांतरापेक्षा मतांतराचा वेग वाढताना दिसतो. स्पष्टीकरण द्यायचे तर जातीनिहाय जनगणनेमध्ये जात आणि धर्म लिहावा लागतो. आम्ही वरीलपैकी कोणत्याही धर्माचे नाहीत, असे लिहिणारे आणि मानणारेही गेल्या दहा वर्षांत मोठ्या प्रमाणात तयार झाले आहेत. धर्मांतराबाबत रायपूरचे निवासी असलेले महंत श्यामसुंदर म्हणतात की, ”१९७५-साली ख्रिस्ती धर्माची एक मोठी आंतरराष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आली होती. त्यामध्ये बस्तरजशपूर छत्तीसगढचा एक अहवाल आहे. त्यात लिहिले की, बस्तरमध्ये सर्वाधिक पैसा खर्च करूनही एकही वनवासी ख्रिश्चन होत नाही. कारण, त्यांच्या श्रद्धा अत्यंत चिवट आहेत. त्या आपण भेदू शकत नाही. त्यानंतर आज परिणाम पाहतो आहोत की, छत्तीसगढमध्ये १.९२ टक्के लोक ख्रिस्ती आहेत आणि १.९४ टक्के लोक इतर धर्म म्हणजे हिंदू धर्म नाही हे मानणारे आहेत, तर ०.९ टक्के लोक कोणताच धर्म न मानणारे आहेत.” १९७६ साल ते आज २०२३. अचानकछत्तीसगढमध्ये स्वतःला ख्रिस्ती मानणारे आणि हिंदूच नाही, तर कोणत्याच धर्माला न मानणार्‍या मंडळींची लोकसंख्या कशी वाढली?
 
२०२१ साली छत्तीसगढच्या जशपूरमध्ये एक दुःखद घटना घडली. दुर्गामातेची पूजा करत पालखी काढणार्‍या जमावाला एका भरधाव वाहनाने चिरडले. जीवितहानी झाली. कधी नव्हे ते जशपूरमध्ये मोठ्या उत्साहात निघालेल्या देवीच्या पालखीमध्ये हे भयंकर घडले. त्यानंतर वाहनचालक पकडला गेला. तो मद्यधुंद होता. नशेत होता वगैरे वगैरे म्हंटले गेले. पण, तिथल्या समाजअभ्यासकांचे म्हणणे आहे की, जशपूर येथे मोठे चर्च आहे. एकाचवेळी दहा हजार लोक प्रार्थना करतील, इतके मोठे चर्च. आशियातील हे दुसर्‍या क्रमांकाचे चर्च. इथे जगभरातल्या ख्रिस्ती लोकांची वर्दळ असते. इथे धर्मांतराचे प्रमाण वाढले आणि गेल्या काही वर्षांत याच धर्मांतरित लोकांचे पुन्हा हिंदू धर्मात येण्याचे प्रमाणही वाढले. इतकेच काय, वनवासी बांधव देवदेवतांची पूजाअर्चाही पुन्हा करू लागले. याबाबत काहींना राग होता. कारण, वनवासी बांधवांचे धर्मांतरण करण्यासाठी त्यांनी पिढ्यान्पिढ्या नियोजन केले होते. प्रयत्नाअंती धर्मांतरित झाल्यावर हे वनवासी बांधव पुन्हा मूळ धर्मात जाणे हे त्यांच्यासाठी अनाकलनीय आणि वाईटच होते. त्यामुळेच हिंदू देवदेवतांच्या पालखीत अशी दुर्घटना झाली की लोक पुन्हा अशा पालख्या काढणार नाहीत. तसेच, ‘येसूदेवाला सोडले आणि दुसर्‍या देवाची पूजा करता म्हणून तुमच्यावर कोप झाला,’ असे भोळ्या समाजाला पटवून द्यायला सोपे असेही मत!
 
छत्तीसगढमधलीच एक घटना. ज्याला बघून कीव, दयाभाव उत्पन्न होईल. असाच एक अंध मुलगा. या किशोरवयीन मुलाचे आई-वडील वारले आणि छत्तीसगढच्या घासपारा नावाच्या वस्तीत तो समाजातल्या लोकांच्या मदतीने राहू लागला. त्याचे आईवडील बुढाबाब म्हणजे शंकराची पूजा करायचे. आई-बाबांच्या मृत्यूनंतर त्यांची आठवण म्हणून हा पोरका बेघर. मुलगाही बुढाबाबची पूजा करायचा. बुढाबाबा त्याच्या आयुष्याचा भाग झाले. त्यांच्या वस्तीत एकदा पास्टर बेनू महानंद आला. त्याने या मुलाला गळ घातली की, कसेही करून माझ्याबरोबर चर्चमध्ये चल आणि माझ्यासोबत तिथे फोटो काढ. मुलाचे म्हणणे बुढाबाबा सोडून मी कुणाचीही पूजा करणार नाही. त्याने पास्टरसोबत जायला नकार दिला. त्यावर त्याने या मुलाला बेदम मारहाण केली. या मुलाला भेटून मला प्रश्न पडला होता की, या बेघर, अनाथ आणि दोन्ही डोळ्यांनी अंध असलेल्या मुलाचे त्या पास्टरला धर्मांतरण का करायचे होते? त्याने धर्मांतरण केले म्हणून त्याचे पाहून इतर कुणीही धर्मांतरण केले नसतेच. मग फास्टरने त्याला मारहाण का केली? जबरदस्ती का केली? तर या मुलाला आसरा देणार्‍या त्याच्या समाजबांधवांचे म्हणणे की, हा मुलगा अतिशय गरीब दिसतो. तो दिव्यांग आहे.


या मुलासोबत फोटो काढला आणि प्रसारमाध्यमांत संदेश टाकला की, बघा, छत्तीसगढच्या दुर्गम भागात अशा गरीब, दिव्यांग मुलांसाठी आम्ही सेवाकार्य करतो, तर त्याला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या अनेक संस्था दया येऊन आर्थिक मदत करतील. तसेच, आंतरराष्ट्रीय स्तरावरची चर्च संस्थाही दखल घेईल की, पास्टर खरच गरिबांसाठी काम करतो. तोे निधी मिळवण्यासाठी तो पास्टर असे करत होता. परमेश्वरा, किती ही असंवेदनशीलता!राजकारण बाजूला ठेवले, तर एक नुकतीच घडलेली घटनाही अशीच बोलकी. छत्तीसगढमध्ये सोनी सोरी नावाची महिला आहे. ती आप पक्षाची नेताही होती. नक्षली कारवायांमध्ये सक्रिय हिंसक सहभाग म्हणून तिच्यावर डझनभर गुन्हे दाखल झाले होते. छत्तीसगढमध्ये काँग्रेसी सरकार आले. त्यानंतर पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आणि सोनी सोरीची सगळ्या गुन्ह्यांतून पुराव्याअभावी निर्दोष सुटका झाली. तिला सुरक्षाही प्रदान करण्यात आली. ती जिथे राहते, त्या घरातल्या वीजजोडणीचे शुल्क तिने भरले नव्हते. त्यामुळे प्रशासनाने तिच्या घरची वीज तोडली होती. त्यानंतर नुकतेच काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी दिल्लीतील एका पत्रकार परिषदेमध्ये सोनी सोरीच्या घरच्या वीज तोडल्याबद्दल विधान केले. त्यानंतर प्रशासनानेरात्रीतून तिच्या घरी वीजजोडणी केली, तर असे हे छत्तीसगढ. इथे आजही दुर्गम भागात नक्षली विकासकामे करून देत नाहीत. मात्र, सोरीच्या घरी तत्काळ वीजजोडणी करता येते.

सध्या मुख्यमंत्री भूपेश बघेल आहेत. त्यांचे पिता नंदकुमार बघेल यांचे म्हणणे की, ”देशातील ब्राह्मणांना गंगेतून व्होल्गामध्ये पाठवायला हवे.” कारण, त्यांच्या मते ब्राह्मण तिथले आहेत म्हणे! त्यांची अख्खी हयात हिंदू श्रद्धांना विरोध करण्यात गेली. हिंदू समाजाबद्दल अत्यंत विखार असणार्‍या या माणसाचा मुलगा आज छत्तीसगढचा मुख्यमंत्री आहे. त्यामुळे छत्तीसगढमध्ये वातावरण काय असेल? तरीही प्राणपणाला लावून तिथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या आयामातील सर्वच संघटनांचे कार्यकर्ते सेवा कार्य आणि धर्मसंघटन करत आहेत. गोष्ट छत्तीसगढमध्ये कोणाची सत्ता येईल, ही नाही, तर गोष्ट आहे माता कौसल्याचे माहेर असलेल्या छत्तीसगढमध्ये रामाला भाचा मानतात आणि प्रत्येक जण दुसर्‍या व्यक्तीला आदराने मामा म्हणतो, त्या छत्तीसगढमध्ये प्रभू श्रीरामचंद्राना मानने चूक आहे का? फसवून आणि दडपशाही करून केलेल्या धमार्धंतराविरोधात आवाज उठवणे चूक आहे का? स्वतःच्या मूळ धर्माबाबात श्रद्धावान असणार्‍या छत्तीसगढच्या समाजबांधवाची जागृती नक्कीच स्वागतार्ह आहे.





आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.