दाऊदच्या भागीदाराशी संबंधित बांधकाम प्रकल्पाला पैसे पुरवणाऱ्यांची चौकशी होणार ; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधानसभेत घोषणा

    14-Dec-2023
Total Views |
devendra fadanvis 
 
नागपूर : महादेव ॲप आणि कुख्यात दहशतवादी दाऊदच्या भागीदाराशी संबंधित बांधकाम प्रकल्पाला पैसे पुरवणाऱ्या रशेश शहा आणि त्यांच्या एडलवाईस कंपनीतील व्यवहारांची येत्या दोन महिन्यांत चौकशी करण्यात येईल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवार, दि. १४ डिसेंबर रोजी विधानसभेत केली.
 
भाजपा आमदार आशिष शेलार यांनी हा मुद्दा सभागृहात उपस्थित केला. अमित शर्मा हा कुख्यात दहशतवादी दाऊदचा भाऊ मुस्ताकीन याचा भागीदार असून, त्या दोघांवर महादेव ॲप चालवण्याचा आरोप आहे. विजय जैन यांच्या जे.पी. इन्फ्रा कंपनीत त्यांनी पैसे गुंतवले आहेत. या कंपनीचे गोरेगाव आणि मिरा रोड येथे बांधकाम प्रकल्प सुरू असून अंडरवर्ल्डचा पैसा या व्यावसायात आणला गेला आहे. विशेष म्हणजे या बांधकाम प्रकल्पाला रशेश शहा यांच्या एडलवाईस या वादग्रस्त फायनान्स कंपनीने १ हजार कोटी रुपयांचे अर्थसहाय्य केले आहे. त्यामुळे देशविरोधी कृत्ये करणाऱ्यांशी संबंधीत या व्यवहारांची तात्काळ चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी आशिष शेलार यांनी केली.
 
त्यावर उत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, महादेव ॲपची ईडी मार्फत चौकशी करण्यात आली असून, देशभरातील विविध राज्यांत या गुन्ह्याची व्याप्ती असल्याने या प्रकरणी एसआयटी स्थापन करण्यात आली आहे. आशिष शेलार यांनी सभागृहात जी माहिती दिली, त्यानुसार विजय जैन यांची जे.पी. इन्फ्रा ही बांधकाम व्यावसायिक कंपनी, अमित शर्मा, एडलवाईस आणि रशेश शहा यांच्यात झालेल्या व्यवहारांमागील उद्देश काय आहे, हा पैसा कायदेशीर मार्गाने बँकेच्या माध्यमातून आला की काळा पैसा गुंतवण्यात आला, त्यातून काही गैरव्यवहार झाले का, गुन्हेगारीशी त्यांचा संबंध आहे का, याची चौकशी येत्या दोन महिन्यांत करण्यात येईल. त्यात जर गैरव्यवहार आढळून आले, तर कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
 
‘महादेव ॲप’प्रकरणी खातेधारकांची पडताळणी सुरू
 महादेव ॲपच्या माध्यमातून बेटींग आणि ऑनलाईन खेळ खेळण्याकरिता पैसे जमा करण्यासाठी, तसेच जिंकलेले पैसे पाठवण्याकरिता एयू स्मॉल फायनान्स बँकेची एकूण १६ खाती वापरल्याचे निदर्शनास आले आहे. त्यापैकी १५ बँक खाती आणि खातेधारकांची माहिती प्राप्त झालेली आहे. ही बँक खाती ही महाराष्ट्र, राजस्थान, नवी दिल्ली, आसाम, मध्यप्रदेश व हरियाणा या राज्यातील असल्याचे निष्पन्न झाले आहे. खातेधारकांची पडताळणी सुरू आहे. तसेच बेटींग ॲप कंपन्यांना मिळालेल्या नफ्याच्या रक्कमेवर जीएसटी न भरता सरकारी तिजोरीचे प्रचंड नुकसान केल्याबाबत सखोल तपास करण्यात येत आहे, असेही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
 
 
अग्रलेख
जरुर वाचा