मुंबईतील वाहतूक कोंडीवर तोडगा! 'वॉटर टॅक्सी’ सुरु करण्याबाबत मंत्री नितेश राणेंच्या महत्वपूर्ण सूचना

    02-Jun-2025
Total Views |
 
Nitesh Rane
 
मुंबई : मुंबईतील वाहतूक कोंडीच्या समस्येवर उपाय म्हणून गेट वे ऑफ इंडिया येथील रेडिओ जेट्टी ते नवी मुंबई विमानतळ येथे वॉटर टॅक्सी सुरू करण्याचा प्रस्ताव असून यासाठी बंदरे विभागाने याबाबतचे नियोजन पूर्ण करावे. तसेच गरजेच्या ठिकाणी जेट्टी उभारण्यासाठी प्रस्ताव तयार करावेत, अशा सूचना मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी सोमवार, २ जून रोजी दिल्या.
 
वॉटर टॅक्सी सुरू करण्याबाबत मंत्रालयात पार पडलेल्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी परिवहन, बंदरे आणि हवाई वाहतूक विभागाचे अपर मुख्य सचिव संजय सेठी, नवी मुंबई विमानतळ प्राधिकरणाचे ब्रिजेश सिंघल, महाराष्ट्र सागरी मंडळाचे प्रदीप बढीये यांच्यासह विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
 
हे वाचलंत का? - 'त्या' प्रकरणातून मंत्री नितेश राणेंची निर्दोष मुक्तता
!
 
मंत्री नितेश राणे म्हणाले की, "वॉटर टॅक्सी सुरू करण्यासाठी टर्मिनल उभारणी टप्प्याटप्प्याने सुरू करावी. तसेच यासाठी विमानतळ प्राधिकरणाने आवश्यक परवानग्यांसाठी प्रस्ताव सादर करावे. माल वाहतुकीसाठीही जेट्टी उभारण्यासाठी ठिकाणे निश्चित करावीत. मुंबईतील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी राज्य सरकारने जलवाहतुकीच्या क्षेत्रात महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे."
  
प्रवासाची वेळ सुमारे ४० मिनिटे!
 
"नवीन वॉटर टॅक्सी सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला असून, यामुळे मुंबई आणि नवी मुंबईतील प्रवासाचा वेळ लक्षणीयरीत्या कमी होईल. या सेवेमुळे नवी मुंबईतील विविध भाग मुंबईशी जोडला जाईल. प्रवासाची वेळ सुमारे ४० मिनिटे असणार आहे. या वॉटर टॅक्सी सेवांमध्ये इलेक्ट्रिक बोट्सचा वापर केल्यामुळे प्रदूषण कमी होईल आणि पर्यावरणाला फायदा होईल. तसेच मुंबईतील वाहतूक कोंडी कमी होईल आणि प्रवाशांना आरामदायक प्रवासाचा अनुभव मिळेल," असे मंत्री नितेश राणे यांनी यावेळी सांगितले.