मशीदीवरील भोंग्यांबाबत किरीट सोमय्यांची भूमिका योग्यच : मंत्री आशिष शेलार
25-Jun-2025
Total Views | 18
मुंबई : मशीदीवरील भोंग्यांबाबत किरीट सोमय्यांची भूमिका योग्यच आहे, अशी प्रतिक्रिया मंत्री आशिष शेलार यांनी दिली आहे. किरीट सोमय्या यांनी भोंग्याप्रकरणी कुठल्याही मशिदीत जाऊ नये, असे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सांगितल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु होती. यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली.
मंत्री आशिष शेलार म्हणाले की, "अजितदादा काय बोलले ते मला माहिती नाही. परंतू, मोठ्या प्रमाणात मर्यादेच्या वर अवैध भोंग्याच्या आवाजाने त्रस्त असलेल्या समाजाने न्यायालयात धाव घेतली आहे. न्यायालयाने आदेश दिल्यामुळे अवैध आणि मर्यादेच्या बाहेर असलेले भोंगे उतरवले गेले पाहिजे ही किरीट सोमय्यांची भूमिका योग्य आहे," असे ते म्हणाले.
"आज आणीबाणीच्या काळ्या दिवसाची ५० वर्षे पूर्ण झालीत. भारतातील लोकशाहीची मुल्ये टिकावी यासाठी शपथ घेण्याचा हा दिवस आहे. ५० वर्षांपूर्वी लोकशाहीच्या बाबतीत गळा काढणाऱ्या काँग्रेसने लोकशाहीचा खून केला. ते तेव्हासुद्धा लोकशाही विरोधी होते आणि आज त्यांचे मुर्त स्वरूप लोकशाही व्यवस्थांना मजबूत आणि बळकट करणाऱ्या व्यवस्थांच्या विरोधात आहे. काँग्रेसचे लोकशाहीविरोधाचे स्वरूप आताच्या भारताच्या राजकीय वाटचालीत लोकशाही मजबूत आणि बळकट करणाऱ्या व्यवस्थांच्या विरोधात आहे. त्यामुळे काँग्रेसकडून लोकशाहीला असलेल्या धोक्यापासून समाजाने सतत जागरूक राहिले पाहिजे. नागरिकांच्या अधिकारांची पुन्हा पुन्हा आठवण केली पाहिजे. विविध नागरी अधिकारांवर काम करणाऱ्या संस्थांना या आठवणीतून पुढे जाण्यासाठी बळ मिळावे, यासाठी आपण आजचा दिवस साजरा करतो," असे ते म्हणाले.
त्यावेळी राऊत कुठल्या पक्षात होते?
बाळासाहेब ठाकरेंचे आणीबाणीला समर्थन होते असे संजय राऊत म्हणाले होते. यावर बोलताना मंत्री आशिष शेलार म्हणाले की, "संजय राऊत त्यावेळी कुठल्या पक्षात, कुठल्या विचारधारेत आणि कुठल्या मासिकात काय लिहित होते हे त्यांनी सांगावे. मग त्यांनी आणीबाणी आणि बाळासाहेबांवर वक्तव्य करावे," अशी टीकाही त्यांनी केली.
गैरसमजांच्या पिकाचे खूप बळी!
"गैरसमजांच्या पिकाचे खूप लोक बळी आहेत. पाचवीपासून हिंदी सक्ती होतीच. या राज्यात पहिलीपासून हिंदीची सक्ती नाही. त्यामुळे हे शरद पवारांनीसुद्धा समजून घेतले पाहिजे. पाचवी, सहावी, सातवीला बंधनकारक असलेली हिंदीसुद्धा आता राज्य सरकारने ऐच्छिक आणि पर्याय म्हणून उपलब्ध केली आहे. अभ्यासाविना बोलणाऱ्या शरद पवारांच्या हेतूवरच आता शंका घ्यावी लागेल," असेही ते म्हणाले.