जयंत पाटलांकडून प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा! नवे प्रदेशाध्यक्ष कोण?
12-Jul-2025
Total Views |
मुंबई : शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आपल्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याची माहिती पुढे आली आहे. तसेच लवकरच नवीन प्रदेशाध्यक्षांची नियुक्ती होणार असल्याचेही सांगण्यात येत आहे. दरम्यान, आता नवीन प्रदेशाध्यक्ष कोण होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून जयंत पाटील प्रदेशाध्यपदावरून निवृत्त होणार असल्याच्या चर्चा सुरु होत्या. मागील महिन्यात झालेल्या पक्षाच्या वर्धापन दिन सोहळ्यात त्यांनी यासंदर्भातील भाष्यही केले होते. यावेळी जयंत पाटलांनी आपल्या भाषणात प्रदेशाध्यक्ष पदावरून मोकळे करण्याची विनंती शरद पवारांकडे केली. "मला पवार साहेबांनी बरीच संधी दिली. ७ वर्षांचा कालावधी दिला. शेवटी पक्षाने नव्या चेहऱ्यांना संधी देणे आवश्यक आहे," असे ते म्हणाले. यावर तात्काळ प्रमुख सहकाऱ्यांना एकत्र घेऊन या विषयावर त्यांच्याशी आम्ही सुसंवाद साधू आणि सामूहिकपणाने या संदर्भातला निर्णय घेऊ, अशी प्रतिक्रिया शरद पवारांनी दिली होती. त्यानंतर आता शरद पवारांनी भाकरी फिरवल्याचे बोलले जात आहे.
जयंत पाटील यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर आता शशीकांत शिंदे हे पक्षाचे नवे प्रदेशाध्यक्ष होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. येत्या मंगळवारी ते प्रदेशाध्यक्षपदाची धूरा सांभाळणार असल्याचीही माहिती आहे. दरम्यान, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या पार्श्वभूमिवर शरद पवार गटातील हा मोठा बदल मानला जात आहे.