मुलांच्या आणि मराठीच्या हिताचाच निर्णय घेणार! मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया
25-Jun-2025
Total Views | 15
मुंबई : मंत्री दादाजी भुसे यांना पहिलीपासून हिंदी सक्तीबाबत सगळ्यांशी चर्चा करण्याची जबाबदारी दिली असून आमच्या मुलांच्या आणि मराठीच्या हिताचाच निर्णय आम्ही घेऊ, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. बुधवार, २५ जून रोजी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "मंत्री दादाजी भुसे यांना पहिलीपासून हिंदी शिकवण्यासंदर्भात सगळ्यांशी चर्चा करण्याची जबाबदारी दिली आहे. नवीन शिक्षण पद्धती काय आहे, त्यात क्रेडिट सिस्टीम काय आहे ते समजावून सांगण्याची जबाबदारी त्यांना दिली आहे. आमचा मराठी मुलगा या क्रेडीट सिस्टीममध्ये मागे राहू नये आणि आपण केवळ क्रेडीट सिस्टीम योग्य प्रकारे न पाळल्याने इतर माध्यमांतील मुले त्याच्या पुढे जाऊ नये, हाच आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे दादा भुसे यासंदर्भात सगळ्यांशी चर्चा करतील. त्यानंतर याबाबत अंतिम निर्णय घेऊ. आमच्या मुलांच्या आणि मराठीच्या हिताचाच निर्णय आम्ही घेऊ.
राहुल गांधींच्या आरोपांवर उत्तर देताना ते म्हणाले की, "एखादा व्यक्ती रोज खोटे बोलत असला तरी लोकांना सगळं कळतं. त्यांना वाटतं की, रोज खोटं बोलल्यावर कदाचित लोकांना त्यांचे बोलणे खरे वाटेल. त्यामुळे ते दरवेळी काहीतरी बोलतात आम्ही पुराव्यानिशी त्यांना तोंडावर पाडतो. तरीसुद्धा ते त्यातून काहीही बोध घेत नाहीत," अशी टीकाही त्यांनी केली.
ते पुढे म्हणाले की, "काँग्रेस पहिल्या दिवसापासून सगळ्याच विकासकामांना विरोध करत आहे. समृद्धी महामार्गालासुद्धा त्यांनी विरोध केला. पण लोकांनी समोरून येऊन समृद्धी महारामार्गाला समर्थन दिले. मागच्या काळात ३०० ते ३५० शेतकऱ्यांनी मला घेराव घालून सह्यांचे पत्र दिले आणि आम्हाला शक्तीपीठ महामार्ग हवा आहे, असे सांगितले. काही लोकांचा विरोध असू शकतो पण आम्ही त्यांच्याशी संवाद साधू. परंतू, राजकीय जे विरोध करतील त्यांना आम्ही बधणार नाही," असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केले.