जीवनात साईबाबांचा मंत्र अंगिकारल्यास...! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे प्रतिपादन

    02-Jun-2025
Total Views |
 
Devendra Fadanvis
 
नाशिक : साईबाबांचा श्रद्धा आणि सबुरीचा मंत्र जीवनात अंगिकारता आल्यास कुठलाच आजार होऊ शकत नाही, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. सोमवार, २ जून रोजी नाशिक येथे श्री साईबाबा मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल, हार्ट इन्स्टिट्यूट ॲण्ड रिसर्च सेंटरचे उद्घाटन त्यांच्या हस्ते पार पडले. यावेळी ते बोलत होते.
 
याप्रसंगी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, खासदार डॉ. शोभा बच्छाव, आमदार सीमा हिरे, आमदार राहुल ढिकले, आमदार हिरामण खोसकर, रुग्णालयाचे प्रमुख डॉ. अनिरुद्ध धर्माधिकारी, डॉ. पल्लवी धर्माधिकारी, अण्णासाहेब मोरे आदी उपस्थित होते.
 
हे वाचलंत का? -  पुढच्या काळात राज्याचा महसूल विभाग देशातील क्रमांक एकचा विभाग ठरणार : मंत्री चंद्रशेखर बावनकुळे
 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "नागरिकांच्या बदलत्या जीवनशैलीमुळे विविध आजारांचे प्रमाण वाढत असून अशा आजारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी आधुनिक उपचार पद्धतीसोबत संयमी जीवनशैली आवश्यक आहे. या रुग्णालयाला श्री साईबाबा यांचे नाव देण्यात आले आहे. साईबाबांचा श्रद्धा आणि सबुरीचा मंत्र जीवनात अंगिकारता आल्यास कुठलाच आजार होऊ शकत नाही. हा मंत्र आपण विसरल्याने जीवनशैलीशी निगडित विविध आजार आपल्याला होतात. गेल्या काही वर्षात चांगल्या चिकित्सा पद्धती विकसित झाल्याने भारतीयांचे जीवनमान वाढले आहे. साईबाबा हॉस्पिटलमधील आधुनिक उपचार पद्धतींमुळे रुग्णांना चांगली वैद्यकीय सेवा मिळेल. सेवा करणे हा हॉस्पिटल काढण्यामागचा उद्देश असल्याने गरिबातील गरीब माणसाची सेवा इथे होईल," असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.