वैयक्तिक, व्यावसायिक अथवा सार्वजनिक जीवनात वावरताना विश्वास हा अत्यंत महत्त्वाचा घटक. म्हणूनच हा विश्वास कमावणे आणि त्याला तडा जाऊ न देता, तो टिकवून ठेवण्याकडे बहुतेकांचा कल असतो. ही बाब लक्षात घेता, ‘इप्सॉस ग्लोबल ट्रस्टवर्दीनेस इंडेक्स २०२३’चा एक अहवाल नुकताच प्रकाशित झाला. तेव्हा, यानिमित्ताने एकूणच या अहवालातील निष्कर्षांचा केलेला हा उहापोह...
आपले समाजव्यवस्थेतील व्यवहार हे पूर्णतः विश्वासावर चालतात. माणसांचा एकमेकांवरचा आणि व्यवस्थेवरील विश्वास उडाला तर? असा प्रश्न स्वतःला जरी विचारला, तरी सर्वत्र अंधकार दिसू लागतो. याचे कारण मानवी जीवनाची प्रगती आणि समाजाचा विकास हा विश्वासावर पुढे जात असतो. आपल्याकडील सेवाक्षेत्रदेखील विश्वासावर चालते. वैद्यकीय क्षेत्राचा विचार करता रुग्णाची तपासणी, येणारे अहवाल, त्यावर होणारे उपचार आणि त्यासाठी दिली जाणारी औषधे यांतील फारसे काही रुग्णाला माहीत नसते, तरीसुद्धा रुग्ण डॉक्टरांवर विश्वास ठेवून, त्या औषधांचे सेवन करतो. शस्त्रक्रिया करतानादेखील रूग्णाचा तोच भाव असतो. एकूणच आपले जीवन ज्या-ज्या क्षेत्राशी नाते सांगते, अशा सर्वच क्षेत्रांत केवळ विश्वास महत्त्वाचा असतो. पण, हा विश्वास गेले काही वर्षांत सर्व क्षेत्रांत मोठ्या वेगाने ढासळत असल्याचे समोर आले आहे.
आज भोवताली जवळपास सर्वच क्षेत्रांत अविश्वासाचे वातावरण निर्माण झालेले दिसते. अशा परिस्थितीत प्रत्येक क्षेत्रातील मनुष्यबळावर अधिकाधिक विश्वास वृद्धिंगत होण्याची गरज आहे. अविश्वासाच्या अंधकारात आपण फार प्रगतीचे आलेख उंचावू शकणार नाही. समाजात विविध क्षेत्रांवरील कमी होणारा विश्वास प्रगतीतील सर्वात मोठा अडथळा ठरणार आहे. नुकताच ’इप्सॉस ग्लोबल ट्रस्ट वर्दीनेस इंडेक्स २०२3’चा अहवाल प्रकाशित झाला. त्या अहवालानुसार, भारतातील विविध सेवा क्षेत्रांवरील विश्वास सातत्याने कमी होत असल्याचे समोर आले आहे. आपल्या देशात असा एकही पेशा नाही की, ज्यावर लोकांचा पूर्णतः विश्वास आहे. साधारण ५० टक्क्यांच्या आसपास शिक्षक, डॉक्टर आणि वैज्ञानिक यांच्यावर विश्वास व्यक्त झाला आहे. ज्यांच्या हाती देशाचे भविष्य आहे, जे लोकशाहीचे स्तंभ मानले जातात, लोकशाहीतील राजकीय नेतृत्व आणि प्रसारमाध्यमांत काम करणारे पत्रकार यांच्यावरील विश्वासात प्रमाणात मोठी घट झाली आहे. हा अविश्वास लोकशाहीच्या व्यवस्थेकरिता नक्कीच मारक ठरु शकतो. आज लोकशाही व्यवस्था भक्कम करण्यासाठीची पावले सर्व पातळीवर उचलली जात आहोत. राजकीय क्षेत्रातील नेत्यांवर जनतेचा विश्वास गमावणे झाले, तर राष्ट्र प्रगतीची आणि विकासासाठीच्या धोरणांची अंमलबजावणीची प्रक्रिया गतिमान कशी होणार? राष्ट्र प्रगतीचे पावले टाकत, विकासाकडे झेप कशी घेणार? त्याचवेळी पत्रकार जे काही करत आहेत, ती प्रत्येक गोष्ट राष्ट्र विकासाच्या प्रक्रियेशी निगडित आहे. त्यांचे काम समाज प्रबोधनाचे आहे. त्यातून उन्नत आणि प्रगत समाज उभा करणे आहे. अशावेळी या क्षेत्रावरील विश्वास गमावणे, हे उद्याच्या भविष्यासाठी निश्चित चिंताजनक म्हणावे लागेल.
पत्रकार, शिक्षक आणि राजकीय नेते यांच्यावरील विश्वास गमावणे, हे सामाजिक विकासाच्या दृष्टीने अधिक चिंताजनक आहे. सर्वेक्षणानुसार जागतिक स्तरावर शिक्षण क्षेत्रात कार्यरत असलेल्या शिक्षकांवर नागरिकांचा विश्वास असण्याचे प्रमाण तिसर्या स्थानावर आहे. भारतात विविध व्यावसायिकांपैकी सर्वाधिक विश्वास असणारा शिक्षकीपेशा हा प्रथम स्थानावर आहे. जपान आणि दक्षिण कोरिया वगळता जगातील इतर देशांतील नागरिकांचा शिक्षकांवर अधिक विश्वास आहे. भारतातील विविध पेशांतील लोकांवरील विश्वासाचे प्रमाण लक्षात घेता, दुसर्या स्थानी सशस्त्र दल आहे. त्यांच्यावर ५२ टक्के लोकांनी विश्वास व्यक्त केला आहे. तिसर्या स्थानी डॉक्टर असून, त्यांच्यावर ५१ टक्के लोकांनी विश्वास प्रदर्शित केला आहे. भारतातील वैज्ञानिकांवर ४९ टक्के, न्यायाधिशांवर ४६ टक्के, महिलांवर ४६ टक्के, बँकर ४५ टक्के, पुरोहित-पाद्री असे धर्मगुरु 3४ टक्के, पोलीस 33 टक्के, सरकारी कर्मचारी 3२ टक्के, वकील 3२ टक्के आणि पत्रकार 3० टक्के इतके विश्वासाचे प्रमाण आहे. जागतिक पातळीवर विश्वासाच्या प्रमाणाचा विचार करता, डॉक्टरांवर ५८ टक्के विश्वास आहे, तर वैज्ञानिकांवर ५७ टक्के विश्वास आहे. त्या खालोखाल शिक्षक आणि सशस्त्र दलावर ५3 टक्के विश्वास आहे. भारतात कॅबिनेट मंत्री आणि सरकारी अधिकार्यांवर 3९ टक्के आणि राजकारण्यांवर 3८ टक्के विश्वास व्यक्त झाला आहे. जगात ६० टक्के लोकांनी राजकारण्यांना सर्वात अविश्वासू मानले आहे. जे राज्यकर्ते देशाच्या विकासाचे धोरण आखतात, त्यांच्यावरच विश्वास नसेल, तर विकासाचे चाक गती कशी घेणार, हा प्रश्न आहे. येथील राजकारण्यांसाठी जनतेचा अविश्वास हा धोक्याचा इशारा आहे.
कोणत्याही देशात विकास, परकीय धोरण, शैक्षणिक, आरोग्यविषयक धोरण राजकारणी आखत असतात. विकासाची चाके गतिमान करण्याचे काम राजकीय नेतृत्व करत असते. त्यांच्यावर जर नागरिकांचा विश्वास नसेल, तर राजकीय व्यवस्थेबद्दल जनमानसाच्या मनात प्रश्नचिन्ह उपस्थित होते. राजकारणी हे देशाच्या जनतेसाठी धोरणे आखत असतात. ती अधिक विकासाभिमुख असावी, अशी अपेक्षा असते. भारतीय स्वातंत्र्यांच्या चळवळीत गांधी, नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, टिळक, भगतसिंग, राजगुरू, चंद्रशेखर यांसारखी अनेक माणसं कार्यरत होती. त्यावेळी कोणतीही प्रसारमाध्यमं नसतानादेखील यांच्या मागे लाखो तरूण आंदोलनात सहभागी झाले होते. त्यांच्या आंदोलनात सहभागी होताना, लोक बलिदान करत होते. नेतृत्वावर विश्वास ठेवून, लोक स्वतःच्या मृत्यूचीदेखील काळजी करत नव्हते. हा विश्वास नेतृत्वावर होता. नेतृत्वावरदेखील सामान्य जनतेचा विश्वास होता. भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे आंदोलन सुरू होते. आंदोलनातील नेत्यांची भाषणे ऐकून एक महिला प्रभावित झाली. तिच्या अंगावर अधिक सोन्याचे दागिने होते. आंदोलनात सहभागी होण्यासाठी अंगावर असलेले दागिने घरी पाठवणे आवश्यक होते. अशावेळी काय करावे, म्हणून तिने एका खादीधारी माणसाच्या जवळ जात, त्यांना पत्ता सांगत सोबतच्या पत्त्यावरील घरी ते अलंकार पोहोचवण्याची विनंती केली.
खरेतर तो खादीधारी माणूस तिला ओळखत नव्हता. तीदेखील त्या खादीधारी माणसाला ओळखत नव्हती. अशावेळी त्या माणसाला प्रश्न पडला की, ही स्त्री आपल्याला ओळखत नाही, तरी तिने आपल्याकडे इतके बहुमोल दागिने कोणत्या विश्वासावर आपल्याकडे दिले? अखेर न राहून, त्या खादीधारी माणसाने तिला प्रश्न विचारला की, ”मी तुम्हाला ओळखत नाही, तरी तुम्ही हे दागिने कसे काय माझ्याकडे इतक्या विश्वासाने दिले?” तेव्हा ती म्हणाली की, “हे खरे आहे की, मी तुम्हाला ओळखत नाही आणि तुम्ही मला ओळखत नाही; पण तुमच्या अंगावर खादी आहे. खादी घातलेला कोणताही माणूस खोटे बोलू शकत नाही. तो असत्याची वाट चालू शकणार नाही. त्यामुळे तुम्हाला दिलेल्या पत्त्यावर तुम्ही हे सोन्याचे दागिने पोहोचविणार, असा विश्वास आहे. स्वातंत्र्याच्या चळवळीत खादीधारी माणसांवर असलेला विश्वास वर्तमानात आपण गमावला आहे. त्या काळात राजकारणीदेखील निवडणुकीचा जुमला म्हणून जनतेला फसवत नव्हते. लोकांचा विश्वास हा चळवळीसाठी आत्मा असतो. त्यामुळे नेतेमंडळीदेखील तो विश्वास गमावला जाणार नाही, याची काळजी घेत होते. वर्तमानात एकमेकांचा विश्वास जपला जावा, यासाठी फारसे प्रयत्न होताना दिसत नाही. तो विश्वास गेला की, विकासासाठीच्या योजनांमध्ये लोकांचा सहभाग कमी होण्याची शक्यता अधिक उंचावते. लोकांचा सहभाग कमी झाला की, तेथे भ्रष्टाचार उंचावतो.
लोकांचा विश्वास कमी झाल्यास, त्याचा परिणाम होणार्या निवडणुकांमध्ये मतदार टक्का घसरण्याचा धोका अधिक असतो. राजकारण्यांवर विश्वासच नसेल, तर मतदान का करायचे, असा प्रश्न त्यांच्या समोर असतो. लोकांचा लोकशाही व्यवस्थेत मतदान प्रक्रियेत सहभाग नसेल, तर लोकशाहीला कोणताच अर्थ उरत नाही. त्यामुळे नागरिकांची सक्रियता लोकशाहीत महत्त्वाची असते. ती मिळवायची असेल, तर सर्वच पक्षांच्या नेतृत्वाला लोकमानसात विश्वासार्हता निर्माण केल्याशिवाय लोकशाहीच्या सक्षमीकरणाकडे जाता येता येणार नाही. राजकारणांच्या निर्णयात राष्ट्र व समाजहित सामावलेले असते, ही धारणा जनसामान्यांच्या मनात पक्की व्हायला हवी आहे. राजकारणी हे जनतेच्या अधिक विश्वासाला पात्र ठरायला हवीत. मात्र, दुर्दैवाने लोकशाहीत मतासाठी, सत्तेसाठी सर्व काही असा विचार करत होणार्या निवडणुका, होणारी भाषणे, दिली जाणारी आश्वासने, निवडणुकांदरम्यान होणारे निर्णय, राजकीय हितासाठी धर्माधर्मात, जातीपातीत होणारे संघर्ष हे सारेच जनता अनुभवत असते.
वेळ आली तर केवळ निवडणुकीचा जुमला म्हणून त्याकडे राजकारणी दुर्लक्ष करतात. या सर्व प्रक्रियेचे फलित म्हणून राजकारण्यांवरील अविश्वास वाढणे, हेही लक्षात घ्यायला हवे. त्यामुळे राजकारणी जे काही निर्णय घेतात, ते सामान्यांसाठी नाही, तर मतासाठी घेतात, ही धारणा जनमताची पक्की होत चालली आहे. ते अधिक धक्कादायक आहे. हा अविश्वास असाच वाढत गेला, तर त्याचे परिणाम भविष्यात राष्ट्राच्या विकासावर होण्याची शक्यता आहे. सरकारच्या योजनांमध्ये जर लोकांचा सहभागाचा टक्का उंचावला नाही, तर सरकारी योजनांशी जनतेचे नातेच टिकणार नाही. अविश्वासाचा अंधकार नष्ट करून, विश्वासाचा प्रकाश निर्माण केल्याशिवाय येथील सामान्य जनतेच्या आयुष्यात विकासाची प्रकाश किरणे पोहोचणार नाहीत. त्यामुळेच अधिक गंभीरतने विचार करण्याची गरज आहे. हा अविश्वास सर्वच क्षेत्रांतील मनुष्यबळाला विचार करायला लावणारा आहे.
sandeepwakchaure2007@rediffmail.com