महाराष्ट्राला राकट देशा, कणखर देशा असे म्हणताना, ‘दगडांच्या देशा’ असे म्हटले आहे. दगडातून जसे सौंदर्य महाराष्ट्रात निर्माण झाले, तसे देशात इतरत्र आढळणे खचितच. अनेक किल्ले, मंदिरे, शिल्पे या दगडातूनच साकार झाली. असेच एक मंदिर म्हणजे नांदगाव-चाळीसगाव नजीकचे महेश्वर मंदिर होय! या मंदिराचे वैशिष्ट्य, वेगळेपणा, मोहक निसर्गसौंदर्य या सार्यांचा लेखात घेतलेला मागोवा...
महाराष्ट्राचे अनेक भूभाग आपल्यासाठी ‘पर्यटन’ या व्याख्येत बसत नाहीत. या भागांना त्या पद्धतीने कधी लोकांपुढे मांडलेही गेले नाही, हेदेखील तितकेच खरे. आजच्या आणि पुढच्या लेखात आपण थोड्याशा पर्यटनदृष्ट्या अपरिचित, पण ऐतिहासिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या जागी असणार्या मंदिरांचा परिचय करून घेणार आहोत. पुणे-मुंबईपासून साधारण सहा तासांवर आणि नाशिकपासून साधारण तीन तासांवर, नांदगाव-चाळीसगाव रस्त्याच्या उजवीकडे पाटण गाव आहे. चंडिकेला अर्पण केलेल्या मंदिरासाठी हे गाव प्रसिद्ध आहे. बोलीभाषेत आपण या जागेला ‘पाटणादेवी मंदिर’ म्हणून ओळखतो. गौताळा अभयरण्याच्या रम्य प्रदेशात हे मंदिर वसलेले असून, पुढे जाऊन गोदावरी नदीला मिळणार्या पूर्णा नदीचेदेखील हे उगमस्थान आहे. या खोर्यात मागच्या अनेक हजार वर्षांपासून मानवी वस्ती आहे. इथे झालेल्या उत्खननात शहामृगाच्या अंड्यांचे नक्षीकाम केलेले अवशेष, तसेच कवच आणि शंख यांच्यापासून तयार केलेले मणीदेखील सापडले आहेत.
सातवाहन, वाकाटक, अभिर, सेंद्रक, कलचुरी, राष्ट्रकूट, यादव अशा अनेक राजसत्तांनी या भागावर राज्य केले. पाटण गावाचे अजून एक महत्त्व म्हणजे, प्राचीन भारतातले महान गणिती आणि खगोलशास्त्रज्ञ भास्कराचार्य याच गावातले. आपल्या आजोबांच्या कामाची सर्वांना ओळख व्हावी आणि प्रसार व्हावा, यासाठी त्यांच्या नातवाने इथे विद्यापीठदेखील सुरू केले होते; ज्याला राजाश्रय मिळाला होता. हा संपूर्ण परिसर पाटणादेवी मंदिरासाठी जरी ओळखला जात असला, तरी आज एका वेगळ्या मंदिराची ओळख आपण करून घेणार आहोत.
पाटणादेवी मंदिराच्या अलीकडे उजवीकडच्या बाजूला मुख्य रस्त्यापासून आत साधारण 200-300 मीटर अंतरावर, महेश्वर नावाचे अतिशय सुंदर मंदिर आहे. हेनरी कझिन्स याने 1931 साली लिहिलेल्या ‘मिडिव्हल टेम्पल्स ऑफ दि दख्खन’ या पुस्तकात महेश्वर मंदिराचा उल्लेख ‘पद्मेश्वर’ असादेखील केला आहे. इसवी सनाच्या बाराव्या शतकाच्या शेवटी आणि तेराव्या शतकाच्या सुरुवातीला, यादव राजांच्या कालखंडात या मंदिराची निर्मिती झाली असावी.
मुख्य प्रांगणात प्रवेश केल्यानंतर जगतीवर उभे असणारे मंदिर आपल्याला दिसते आणि आठ-दहा पायर्या चढून आपण या मंदिरापर्यंत पोहोचतो. उंच जगती म्हणजेच प्लॅटफॉर्म. हा खजुराहोमधल्या कंधारिया महादेव मंदिराची आपल्याला आठवण करून देतो. मुख्यमंडप, मंडप, अंतराळ आणि गाभारा असे या मंदिराचे भाग आहेत.
महेश्वर मंदिराच्या गाभार्याची द्वारशाखा (मुख्य द्वारच्या चौकटीची पट्टी) अतिशय देखणी कोरलेली आहे. पत्र, स्तंभ, व्याल इत्यादी शाखा या द्वारशाखेमध्येच आहेत. त्याचबरोबर चौकटीच्या सुरुवातीला गंगा-यमुनादेखील कोरलेल्या दिसतात. मंदिराच्या गर्भगृहात मधोमध शाळूंका असून, त्यावर शिवलिंग प्रतिष्ठापना केलेले दिसते. मंदिराच्या अंतराळात म्हणजेच मंडप आणि गर्भगृह यांना जोडणार्या भागामध्ये, एक मोठा शिलालेख आपल्याला दिसतो. इतिहासाचा अभ्यास करणार्यांसाठी हा शिलालेख प्राथमिक पुरावा म्हणून वापरला जातो. त्याकाळी घडलेल्या घटनांची व्यवस्थित माहिती या शिलालेखांमधून आपल्याला मिळते. इथे असणारा शिलालेख देवनागरी लिपीमध्ये असून, यात निकुंभ घराण्याचा इतिहास, त्या कुळात होऊन गेलेले राजे आणि दान दिलेल्या देवसंगम या गावाचा उल्लेख येतो. निकुंभ राजांनी इथल्या भूभागावर 200 पेक्षा अधिक वर्षे राज्य केले आणि त्यांच्या अधिपत्याखाली 1 हजार, 600 गावे होती.
मंदिराच्या मंडपाचा भाग हा 14 खांबांनी तोलून धरला आहे. हा मंडप तिन्ही बाजूने उघडा असून, भिंतींच्या बाजूला अर्धस्तंभ दिसतात. मंदिराच्या खांबांवरचे नक्षीकाम अतिशय सुंदर असून, मधोमध रंगशिळादेखील तयार केलेली आहे. दुर्दैवाने डावीकडे आणि उजवीकडे असणार्या देवाकोष्ठात आज कुठलेही शिल्प दिसत नाहीत. मंडपाच्या बाह्य भिंतींवरती मात्र छोटी छोटी शिल्प आणि नक्षीकाम केलेले दिसते. या मंडपामध्ये गेल्यावर अजिंठा जवळील अन्वा मंदिर आणि कर्नाटकमधील हळशी इथल्या मंदिराची आठवण झाल्याशिवाय राहत नाही.
महेश्वर मंदिराच्या बाह्यंगाची भिंत परिपूर्ण आहे. नक्षीकाम केलेली तळपट्टी, त्यावर असणारे वेगवेगळे थर आणि मग येणारा गजथर यांमुळे एक वेगळीच शोभा प्राप्त झालेली आहे. गजथराच्या वरच्या भागात छोटी देवाकोष्ठ असून, त्यामध्ये वेगवेगळ्या देवतांच्या प्रतिमा कोरलेल्या दिसतात. यावर असणार्या भिंतीच्या भागाला ‘मंडोवर’ असे म्हणतात. मंडोवराच्या तिन्ही बाजूंना मध्यभागी मोठे देवकोष्ठ असून, त्यामध्ये एका बाजूला अंधकासूरसंहार शिल्प, तर दुसर्या बाजूला चामुंडा आहे. मधले देवकोष्ठ हे रिकामे आहे. मंदिराचे शिखर मात्र आज उपलब्ध नाही पण, त्याचे विखुरलेले अवशेष आजूबाजूला बघायला मिळतात. या मंदिरात असणार्या काही शिल्पांचा परिचय आता आपण करून घेऊया.
मंदिराच्या प्रदक्षिणापथावर जे पहिले देवकोष्ठ दिसते, त्यामध्ये अंधकासुराचा संहार करणार्या शिवाची प्रतिमा कोरलेली आहे. हा शिव अष्टभुज असून, हातामध्ये ढाल आणि त्रिशूळ पकडलेला दिसतो. या शिल्पामधल्या चेहर्याचा थोडा भाग, जटामुकुट, दोन हात, ढाल, अंधकासुराचा थोडा भाग आणि उजव्या पायाचा भाग एवढ्याच गोष्टी दिसतात. बाकी सर्व शिल्प भग्न अवस्थेत आहे.
याच्याच विरुद्ध बाजूला असलेल्या देवकोष्ठात चामुंडेची प्रतिमा कोरलेली दिसते. ही थोडी वेगळ्या धाटणीची, नृत्यमग्न चामुंडा येथे कोरलेली आहे. पायाशी एक प्रेत असून नरसिंहाने हिरण्यकश्यपूला घ्यावे, असे अजून एक प्रेत तिने आपल्या मांडीवरती घेतलेले आहे. शिल्प जरी भग्न झाले असले, तरी तिच्या गळ्यातली नरमुंडमाळा इथे स्पष्ट दिसते. या प्रमुख शिल्पांबरोबरच मंदिरावर हनुमान, कुबेर, नृत्यगणेश, मुखवटे, नायक-नायिका, वादक आणि नृत्यांगना इत्यादी शिल्पंदेखील कोरलेली दिसतात.
महेश्वर मंदिराकडे जाताना उजवीकडच्या बाजूला दोन अज्ञात देवालयदेखील दिसतात. ही दोन्ही देवालय संपूर्णपणे भग्न अवस्थेत असून, एखादं दुसर्या शिल्पाशिवाय इथे दुसरे काहीही नाही. एक देवालय हे साधारण 12 मीटर लांब आणि सहा मीटर रुंद असून, दुसरे देवालय नऊ मीटर लांब आणि आठ मीटर रुंद आकाराचे आहे. कधीकाळी हा संपूर्ण परिसर वेगवेगळ्या मंदिरांनी नटलेला एक मोठा समूह असेल ही शक्यता आपल्याला नाकारता येत नाही.
पाटणादेवी मंदिराचा हा सगळा भाग अतिशय सुंदर आणि निसर्गरम्य आहे. पावसाळ्यात तर इथे आजूबाजूला असणारे अनेक धबधबे आपले लक्ष वेधून घेतात. इथूनच जवळ पितळखोरे म्हणून अजून एक अतिशय सुंदर ऐतिहासिक जागा आहे. इथे ट्रेकिंगसाठी ही अनेक जण येतात. एखादा शनिवार-रविवार हा सगळा भाग फिरायला, अनुभवायला सर्वांनी नक्की या. तुम्ही खूप काही वेगळे घेऊन इथून परत जाल, याची खात्री आहे. या भागामध्ये असणारी लोकसुद्धा आनंदाने सर्वांना मदत करायला पुढे येतात. जवळच असणार्या चाळीसगाव, धुळे, जळगाव इत्यादी शहरांमध्ये राहण्यासाठी खूप छान सोयीदेखील उपलब्ध आहेत. पुढे येणार्या पावसाळ्यातले शनिवार-रविवार अजिबात वाया घालवू नका, इकडे या!!