राज्यातून रानम्हशी नामशेष होण्याच्या मार्गावर; केवळ २० रानम्हशी शिल्लक ?

    02-Nov-2023   
Total Views |
wild buffalo



मुंबई (विशेष प्रतिनिधी):
राज्यात केवळ हाताच्या बोटांवर मोजण्याइतकी रानम्हशींची ( wild buffalo ) संख्या शिल्लक आहे. राज्यातून नामशेष होण्याच्या मार्गावर असणाऱ्या या संकटग्रस्त प्रजातींच्या संवर्धनाची नितांत गरज आहे. अशा परिस्थितीत राज्य वन्यजीव मंडळाच्या बैठकीत याबाबत चिंताही व्यक्त करण्यात आली आहे. ( wild buffalo )


आजमितीस भारतामधून रानम्हशी ( wild buffalo ) नामशेष होण्याच्या मार्गावर पोहोचल्या आहेत. आययूसीएनच्या लाल यादीत संकटग्रस्त श्रेणीमध्ये नोंद असणारी ही प्रजात छत्तीसगढ राज्याचा राज्य प्राणी आहे. महाराष्ट्राचा विचार केल्यास राज्यातील केवळ गडचिरोली गडचिरोली जिल्ह्यात रानम्हशींचा अधिवास आढळतो. येथील सिरोंचा तालुक्यातील कोलामार्का येथे रानम्हशी आढळतात. या रानम्हशींच्या अधिवास संवर्धनासाठी राज्य वन्यजीव मंडळाच्या बैठकीत चिंता व्यक्त करण्यात आली. मंडळाचे सदस्य आणि 'बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी'चे अध्यक्ष प्रवीणसिंघ परदेशी यांनी रानम्हशींच्या संवर्धनासंदर्भातील प्रस्ताव मंडळासमोर मांडला. नागपूर येथील गोरेवाडा वन्यजीव बचाव केंद्रामध्ये रानम्हशींना आणून त्याठिकाणी त्यांचे प्रजनन करावे, असा प्रस्ताव त्यांनी मंडळासमोर मांडला आहे. यावर वन विभाग काय कारवाई करणार, हे पाहण्यासारखे ठरेल.


रानम्हशी संवर्धनाच्या दृष्टीकोनातून गडचिरोलीतील कोलामार्का वन्यजीव अभयारण्य घोषित करण्यात आले आहे. यापूर्वी ते संवर्धन राखीव क्षेत्र म्हणून संवर्धित करण्यात आले होते. गडचिरोलीमध्ये सध्या केवळ ५-६ नर, १० मादी आणि काही पिल्ले अशी एकुण १५-२० रानम्हशींची संख्या शिल्लक असल्याची माहिती गडचिरोलीचे मानद वन्यजीव रक्षक उदय पटेल यांनी दै. मुंबई तरुण भारतशी बोलताना दिली. तसेच रानम्हशींची आकडेवारी ही वन विभागाकडून नेहमी फुगवून सांगितली जाते, असाही दावा त्यांनी केला. गडचिरोलीतील ग्यारावाडा, पेनकासा, तिराफूट आणि रावेंचा या ठिकाणांवर या रानम्हशी दिसतात. इंद्रावती नदीच्या किनाऱ्यावर असलेल्या कोपेला परिसरामध्ये रानम्हशींचा अधिवास आढळतो. त्यामुळे हा परिसर अभयारण्याला जोडून घेण्याबाबतचा प्रस्ताव सातपुडा फाऊंडेशनचे संस्थापक किशोर रिठे यांनी मांडला होता. मात्र, त्याला अद्यापही मंजुरी मिळालेली नाही. छत्तीसगढ वनविभाग आणि वाईल्डलाईफ ट्रस्ट ऑफ इंडिया यांच्या समन्वयातून रानम्हशींचे प्रजनन करण्यात आले होते. या यशस्वी प्रयोगाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात ही असेच प्रजनन प्रकल्प राबवून रानम्हशींची संख्या वाढवण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.




आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

समृद्धी ढमाले

लेखिका रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेच्या पदवीधर आहेत. सध्या दै. 'मुंबई तरुण भारत'मध्ये पर्यावरण प्रतिनिधी म्हणून कार्यरत. यापूर्वी विविध 'ह्यूमन इंटरेस्ट स्टोरीज', मुलाखती आणि इतर वार्तांकनासाठी काम. आवाज आणि सूत्रसंचालन या क्षेत्रांमध्ये काम आणि विशेष आवड.