महिला सन्मान, नरेंद्र मोदी आणि समाज...

    20-Aug-2022   
Total Views |

modi
 
 
दि. 15 ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वातंत्र्य दिनाच्या भाषणातील महिला सन्मानासंदर्भातील विचार ऐकले आणि भारतीय परंपरेत एक महिला म्हणून बजावत असणार्‍या अनेक भूमिका चटकन डोळ्यांसमोर तरळल्या. नरेंद्र मोदी किती चांगले आहेत किंवा किती छान भाषण केले, हा या लेखाचा विषय नाहीच, तर विषय आहे भारतीय समाजमनाचा नरेंद्र मोदी या भारतीय मनाच्या पंतप्रधानाने किती समरस अभ्यास केला आहे हा! भारतीय समाजजीवनाचा अर्क कोळून प्यावा आणि त्यातून समाजसुधारणेचे अमृत निघावे, तसे हे विचार आहेत. त्याविषयी सविस्तर...
 
 
”कोणत्या न कोणत्या कारणामुळे आपल्यामध्ये एक विकृती आली आहे. आपण आपल्या वाणीने, व्यवहाराने आणि आपल्या काही शब्दांनी महिलांचा अनादर करतो. मी सगळ्यांनाच दैनंदिन जीवनामध्ये महिलांना अपमानित करणार्‍या प्रत्येक गोष्टींपासून मुक्तता करण्याचा संकल्प घेण्याचा आग्रह करतो. महिलांचा गौरव राष्ट्रउभारणीमध्ये मोठी पुंजी आहे. या अमृतकाळामध्ये देशाच्या प्रगतीमध्ये महिलांचे लक्षणीय योगदान मी पाहत आहे. मुलीबाळींना जितकी संधी देऊ, जितक्या सुविधा उपलब्ध करू, त्यापेक्षा कितीतरी पटीने त्यांच्याकडून आपल्याला परतफेड मिळणार आहे. त्या देशाला नवीन उंचीवर घेऊन जातील.” 15 ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिला सन्मानाबद्दल लाल किल्ल्यावरुन आपल्या भाषणात व्यक्त केलेले हे विचार...
 
 
पंतप्रधानांनी देशाच्या स्वातंत्र्यादिनी राजकीय घडामोडी किंवा विरोधकांची उणीदुणी काढणे हेच काही वर्षांपूर्वी अभिप्रेत असायचे. मात्र, स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले हे भाषण केवळ आणि केवळ देश आणि समाज प्रगती, जागृती या आयामातील लाखमोलाचे भाषण ठरले. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कारकिर्दीची आठ वर्षे ही महिला सशक्तीकरण आणि सक्षमीकरणासाठी मैलाचे दगड ठरलेली वर्षे आहेत. त्यामुळे स्वातंत्र्य दिनाला लाल किल्ल्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिला सन्मानाबद्दल मांडलेले कृतिशील विचारह तितकेच महत्त्वाचे ठरतात.
 
 
भारतात सगळ्याच घरात काही कौटुंबिक हिंसा होत नाही किंवा प्रत्येक स्त्रीवर अत्याचार होत नाही किंवा सगळ्याच महिला या शोषणाच्या बळी ठरत नाहीत. मात्र, तरीही मोदींनी सांगितल्याप्रमाणे समाजाच्या मतप्रवाहात कुठून कोण जाणे एक विकृती आली आहे. त्या विकृतीमुळे वाणी, व्यवहार आणि काही शब्दांनी महिलांचा अपमान होतो. विशेष म्हणजे, हे असे वागणार्‍या पुरुष किंवा महिलेलाही माहिती नसते की, आपण महिलांचा अपमान केला, तिचा अनादर केल. व्यक्ती, माणूस म्हणून तिचे मानसिक शोषण केले.
 
 
उदाहरणार्थगल्लोगल्ली, नाक्यावर, प्रवास करताना अगदी सोबत चहा घेताना आणि एकमेकांना आवाजदेतानाही सहजपणे आईबहिणीवरून शिव्यांची लाखोली वाहिली जाते. दुःख, संताप आणि अगदी आनंद व्यक्त करतानाही आई-बहिणी आणि महिलांच्या लिंगात्मक अवयवावर किळसवाणी टिप्पणी केली जाते. यात बोलणार्‍याला आणि ऐकणार्‍यालाही काहीच वाटत नाही. लैंगिकतासुचक विधाने करणे, महिलांच्या विशिष्ट अवयवांवरुन विनोद करणे, अशा एक ना अनेक गोष्टी यामध्ये समाविष्ट आहेत. अर्थात, हे केवळ महाराष्ट्रात किंवा आपल्या देशातच घडते आहे का? तर तसे नाही, हेच चित्र कमीअधिक फरकाने अवघ्या जगभरात आहे.
 
 
महिला म्हणून तिचे माणूसपण नाकारत तिला वस्तूंचा दर्जा सहज दिला जातो. आया-बहिणींना लेकी- सुनांना अपमानित करणार्‍या या शिव्या निदान आपल्या संस्कृतीचा भाग कधीच नव्हत्या. आई आणि बहीण हे लैंगिकतासूचक परिमाण ठरवणार्‍या शिव्या मुलांना महिलांबाबत काय विचार करायला भाग पाडतात, हासुद्धा एक अभ्यासाचा विषय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणातून महिलांची होणारी मानसिक कोंडी एकप्रकारे व्यक्त केली आहे.
 
 
दुसरीकडे महिलांनी कसे दिसावे, कसे दिसू नये याचेही काही ठोकताळे बांधणारे आणि त्यानुसारच महिलांना वागणूक देणारे महाभाग आजही समाजात आहेत. त्वचेचा रंग, चेहर्‍याची किंवा शरीराचीठेवण हे त्या महिलेच्या शक्तीचे किंवा गुणांचे परिमाण मानून, तिला संधी देणे या संकेतातून जगभरातल्या महिलांना अपमानित व्हावे लागते. राजकारण असो की आणखी कोणते क्षेत्र, हा व्यवहार स्त्रीशक्तीचा अपमान करणाराच आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर मोदींनामहिला सन्मानाबद्दल बोलण्याचा हक्क नक्कीच आहे.
 
 
कारण, नरेंद्र मोदी यांच्या सरकारमध्ये 11 मंत्री या महिला आहेत. देशाच्या स्वातंत्र्यानंतर महिलांना इतक्या मोठ्या प्रमाणावर प्रतिनिधित्व देणारे मोदींचे हे पहिलेच सरकार. नुकतेच ओडिशाच्या दुर्गम भागातील संथाल समाजाच्या द्रौपदी मुर्मू यांना राष्ट्रपतीपद बहाल झाले. मुर्मू यांना उमेदवारी देण्यापासून ते त्यांनी त्या पदी विराजमान होईपर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भूमिका कोण विसरेल? ‘महिलांना काय कळतंय?’ या गृहीतकाला केराची टोपली दाखवत मोदींच्या मंत्रिमंडळात अर्थमंत्री निर्मला सीतारामन आहेत आणि विविध महत्त्वाच्या पदांवरही महिलाच विराजमान आहेत.
 
 
अर्थात, यामध्ये या महिला शक्तींची योग्यताही महत्त्वाचीच म्हणा! तर मुद्दा असा की, योग्यतेनुसार संधी देण्याचे प्रयोजन मोदींनी वेळोवेळी केले. नुकतेच काशिविश्वेश्वर कॉरिडोर उद्घाटनावेळी नरेंद्र मोदी शिखा रस्तोगी या दिव्यांग मुलीच्या पाया पडले. शिखाला या कॉरिडोरमध्ये दिव्यांग म्हणून स्वयंरोजगारासाठी दुकान मिळाले. ती मोदी यांच्या पाया पडत होती. मात्र, मोदींनीतिला पाया पडू न देता तेच तिच्या पाया पडले. कारण, ती मातृशक्ती आहे. स्वयंरोजगार करू इच्छिणारी स्वाभिमानी मुलगी ती. पण, मोदींनी आपल्या या एका सहज कृतीतून देशाला संदेश दिला की, महिलांचा आदर करावा. त्यांना कधीही कमी लेखू नये.
 
 
या पार्श्वभूमीवर सध्या बिल्कीस बानो गुजरात आणि केरळ न्यायालयाचे महिलांच्या पोषाखासंदर्भातल्या निर्णयावर ओघाने बोलणे आलेच. मात्र मला असे वाटते की, दोन्ही विषय अतिशय संवेदनशील आहेतच, पण ते त्या त्या व्यवस्थांशी संबंधित आहेत. त्यांना वेगळे परिमाण आहेत. बिल्कीस बानो किंवा केरळच्या न्यायालयाने सुनावणी केलेल्या प्रकरणातील महिला या दोघींनीही न्यायव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत, व्यक्ती किंवा पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदींबाबत या दोघींनीही काहीही मत मांडले नाही. कारण,या दोन्ही घटनांमध्ये नरेंद्र मोदी यांचा व्यक्ती किंवा पंतप्रधान म्हणून काहीही हस्तक्षेप नाहीच. तसेही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या कठोर परिश्रमातून निर्माण झालेल्या संविधानावर आणि संविधानात्मक प्रशासकीय निर्णयावर भारतीय म्हणून प्रत्येक भारतीयाने विश्वास ठेवायला हवा.
 
 
असो. मोदी आपल्या स्वातंत्र्य दिनाच्या भाषणात म्हणाले, “मुलींना संधी द्या, सुविधा द्या. जितके द्याल, त्यापेक्षा कैकपटीने त्या तुम्हाला परत देतील.” पंतप्रधान मोदींचे हे विधान म्हणजे समाजाचे वास्तव चित्रण आहे. आज कितीतरी घरात मुलं एकवेळ आईबाबांकडे, कुटुंबाकडे लक्ष देत नाहीत. पण, मुली जन्मजात दया आणि संवेदनशीलतेमुळे आईबाबांसाठी, घरासाठी, समाजासाठी, कृतज्ञतेने योगदान देताना दिसतात. आजही कितीतरी घरात चित्र असे आहे की, आईवडिलांना मुलांपेक्षा मुलींचाच आधार जास्त वाटतो. मात्र, तरीही समाजात बहुसंख्य लोकांची धारणा आजही आहे की, मुलींना शिकवून काय करायचे? परक्याचे धन आहे ती! तिला सुविधा-संधी देण्यापेक्षा मुलांना द्यावी. कारण, मुलगा हा वंशाचा दिवा. पंतप्रधान मोदींनी या सगळ्या भयंकर समजूतींना मुळापासून नाकारले.
 
 
मोदींनी‘मुलींना संधी द्या, सुविधा द्या’ असे म्हणणे म्हणजे खेडोपाडी मुलगी आहे म्हणून शिक्षण सोडून घरी बसवलेल्या, बालविवाहाच्या बळी ठरलेल्या, उच्चशिक्षणाची संधी, वडिलोपार्जित व्यवसायाची संधी नाकारलेल्या मुलींसाठी आशेचा किरण आहे. या किरणांनी त्यांचे आयुष्य नक्कीच उजळेल. कारण, कोरोना काळात कधीही मरू अशी स्थिती झाली असतानाही केवळ मोदी म्हणाले म्हणून थाळीनादकरणारे, दीपप्रज्वलन करणारे आणि यावर्षी ‘हर घर तिरंगा’ अभियान स्वेच्छेने राबवणारे करोडो भारतीय मोदींचे हे विचार अमलात आणण्याचा विचार नक्की करतील. भारतीय महिला क्रिकेट संघाची कप्तान हरमनप्रित कौर हीने नुकतेच असेच विधान केले.
 
 
 ‘राष्ट्रकुल’ स्पर्धेत भारतीय महिला क्रिकेट संघाने चांगली कामगिरी केली त्यावेळी मोदींनी संघाचे तोंडभरुन कौतुक केले. यावर हरमनप्रित कौर म्हणाल्या, ”पंतप्रधान मोदींनी शाबासकी दिली म्हणजे देशातल्या सगळ्या जनतेने शाबासकी दिल्यासारखे आहे.” हरमनप्रीत कौर या खेळाडूचे मनोगत खूप काही सांगून जाते. खरोखरच मोदी तेच बोलतात, जे लोकांच्या मनात असते. त्यामुळेच महिला सन्मान हा प्रत्येक भारतीयांच्या मनात आहे आणि तमाम भारतीयांच्या मनातलेच विचार मोदींनी बोलून दाखवले आहेत.
 
 
मोदी महिला सन्मानाबद्दल ठामपणे बोलू शकतात. कारण, त्यांनी कार्यान्वित केलेल्या विविध योजनामुंळे पहिल्यादांच स्त्री-पुरूष जन्मदरामध्ये कलाटणी पाहायला मिळाली. नेहमीच एक हजार पुरुषांमागे 946 स्त्री असा जन्मदर बदलून, तो आता एक हजार पुरुषांमागे 1020 महिला इतका झाला आहे. ही एक क्रांती आहे. समाजाच्या विचारांमध्ये, कृतीमध्ये आमूलाग्र बदल झाला आहे, हे दर्शवणारी क्रांती. या पार्श्वभूमीवर महिला साक्षरता दर किंवा विविध क्षेत्रातले तिचे योगदान उल्लेखनीयरित्यावाढले आहे.
 
 
सैन्यामध्ये हवाई दलामध्ये महिलांना कायमस्वरूपी जबाबादरी देणे किंवा खाणक्षेत्रामध्ये महिलांना संधी देणे हे सगळे निर्णय महिलांच्या कर्तृत्वावर विश्वास निर्देशकच आहेत. जागतिक सर्वेक्षणानुसार,जगभरातली महिलांची 60 टक्के ऊर्जा स्वयंपाकासाठी जळण शोधणे आणि पिण्याचे पाणी आणण्याच्या कष्टात खर्च होते. मोदींच्या कारकिर्दीमध्ये ‘उज्ज्वला योजने’मुळे दारिद्य्र रेषेखाली जगणार्‍या करोडो भगिनींच्या घरी मोफत गॅस जोडणी झाली. आजही खेडोपाडी गेलो, तर लाकडं, कोळसा जाळून चुलीवर स्वयंपाक बनवून डोळ्यांत काचबिंदू झालेल्या महिलांची संख्या जास्त दिसेल.
 
 
 या काचबिंदूपासूनधुरापासून होणार्‍या दमाविकारापासून तिची सुटका झाली. जंगलात सरपण शोधण्यासाठीची तिची पायपीट संपली. मोदी सरकारने साडेतीन कोटींची गुंतवणूक करून दुर्गम भागात ‘हर घर नल’ योजना अमलात आणली का? तर पाण्यासाठी दाहीदिशा हिंडणार्‍या त्या माताभगिनींचे जीवन सुकर व्हावे म्हणून! अशीच एक क्रांतिकारी योजना ‘घर घर शौचालय.’ घराघरात शौचालय झाल्याने महिलांनी सुटकेचा श्वास सोडला. शौचाला बाहेर जावे लागते म्हणून पहाटे अंधारात एकदाच शौचाला जावे लागायचे, त्यातही या महिला आजारी पडल्या आणि त्यांना बाहेर जाता येणे शक्य नसायचे तेव्हा किंवा जुलाब लागले किंवा मासिक पाळी दरम्यान या महिलांचे हाल काय होत असतील, हे त्याच जाणोत.
 
 
या सगळ्या महिलांना खर्‍या अर्थाने नरेंद्र मोदी यांनी चांगल्या प्रतीचे सन्मानाचे जगणे उपलब्ध करून दिले. ‘बेटी बचाव, बेटी पढाओ’, ‘वन स्टॉप सेंटर’, ‘महिला शक्ती केंद्र’, ‘नारी शक्ती पुरस्कार’, ‘समृद्धी’, ‘निर्भया’, ‘वर्किंग वुमेन हॉस्टेल’, ‘स्वाधार’, ‘जनधन योजना’, ‘विनामूल्य रेशन योजना’, ‘हुनर हाट’ या सगळ्याच योजना महिला सक्षमीकरणासाठी कारणीभूत ठरल्या.
 
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी महिलांना सतावणारे प्रश्न,समस्या निराकरण करण्यासाठी का पुढाकार घेत असतील? तर ज्यांनी मोदींची कारकिर्द अनुभवली आहे, त्यांना हा प्रश्न पडणारच नाही. सोनिया गांधी किंवा अनेकांनी मोदींबाबत अपमानास्पद, आक्षेपार्ह विधानं केली. पण, मोदींनी मर्यादा सोडून त्यांना प्रत्युत्तर दिले नाही. मोदी कोणत्या महिलेबाबत किंवा कोणत्याही विरोधकांना महिलेला लक्ष्य करून काही म्हणालेत, असे आजपर्यंत झालेले नाही. उलट विरोधकांनी मोदींच्या पत्नी जशोदाबेन यांच्यावरून वाट्टेल ती खोटीनाटी विधानं केली. जशोदाबेनमुळे आपण मोदींची प्रतिमा भंग करू शकू, असे विरोधकांना वाटले.
 
 
मात्र, जशोदाबेन यांनी स्वतःच स्पष्ट केले की, मोदी त्यांच्यासाठी राम आहेत आणि तेच देशाची प्रगती करतील. याचे कारण असे की, मोदींनी जशोदाबेन यांच्या स्वतंत्र व्यक्तिमत्त्वाला कुठेही दबाव आणला नाही की, कुठेही खोट्या प्रतिष्ठेसाठी दिखावा केला नाही. मोदी त्यांच्या जन्मदिनी त्यांच्या माता हिराबेन यांचा आशीर्वाद घेतात. त्यातही राजकारण किंवा कृत्रिमता नाही. पुत्र म्हणून ते तिच्या पायाशी बसतात, ती त्यांना गोडधोड भरवते आणि लहान बाळासारखे मोदींची काळजीही करताना दिसते. आईशी नरेंद्र मोदी यांचे नाते अगदी घट्ट आहे.
 
 
हिराबेन यांच्या 100व्या वाढदिवसानिमित्त मोदींनी ‘ब्लॉग’वर त्यांच्याबद्दल एक लेखही लिहिला होता. महिला म्हणून हिराबेन यांनी जपलेली नाती, घरसंसार आणि समाज धर्मकर्म या सगळ्यांची सुरेख मांडणी या लेखात मोदींनी केली. हा लेख वाचल्यावर कळते की, आपल्या आईशी असलेल्या नात्याची वीणच नरेंद्र मोदी यांना मातृशक्तीचे प्रश्न सोडवण्यास प्रेरणा देत असावी.दुसरे असे की, नरेंद्र मोदी ज्या संस्कार विचारात घडले तो रा. स्व. संघाचा विचार मातृभूमीला माता मानतो, मातृशक्तीचा सन्मान करतो.
 
 
त्यामुळे मातृशक्ती आणि मातृभूमीच्या संवर्धन, सुरक्षा आणि सन्मानाचे विचारकार्य नरेंद्र मोदी करणार नाहीत तर कोण करणार? त्याचप्रमाणे करोडो भारतीय मनात, घरात आणि संस्कृतीधर्मात महिलाशक्तीचा आदर करतात. आता मातृशक्तीचा सन्मान करा, या नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानंतर भारतीय आपल्या विचार, वाणी आणि कृतीतूनही महिलाशक्तींचा सन्मान करतील हे नक्की! हे सगळे आशादायक आहे.
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.