निराधार वृद्धांचा आधार - आर्ट ऑफ हेल्पिंग फाऊंडेशन

    16-Aug-2022
Total Views |
helping hand
 
 
वयाच्या अवघ्या दुसर्‍या वर्षी वडिलांचे छत्र हरपले. परंतु, आईने वडिलांची सर्व कर्तव्ये पार पाडत दीपंकरला मोठे केले. आजही पुण्यात भाड्याच्या घरात दोघेही मायलेक राहतात. परंतु, 37 हून अधिक निराधार वृद्धांना मोफत जेवण देण्याचे पुण्याचे काम ते करीत आहेत. जाणून घेऊया, पुण्यातील दीपंकर आणि सुरेखा पाटील यांच्या ‘आर्ट ऑफ हेल्पिंग फाऊंडेशन’ या संस्थेविषयी...
 
 
धुळे शहरात १९९२ साली जन्मलेल्या दीपंकर राजेंद्र पाटील याचे पितृछत्र वयाच्या अवघ्या दुसर्‍या वर्षी काळाने हिरावून नेले. त्यानंतर आई सुरेखा यांच्यावर संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी आली. पतीच्या जागेवरच त्यांना नोकरी लागली. घर भाड्याचे असल्याने सुरेखा यांना घर चालवताना मोठी कसरत करावी लागत होती. दहावीपर्यंतचे शिक्षण दीपंकरने ‘किसोक न्यू सिटी हायस्कूल’मधून पूर्ण केले. क्रीडा क्षेत्रात पुढे जाण्याची इच्छा होती. मात्र, पैशांअभावी ते शक्य झाले नाही.
 
 
 
दहावीनंतर ‘जैन ज्युनिअर कॉलेज’ला दीपंकरने प्रवेश घेतला. आई, बहिणीच्या वाढदिवसाला ‘गिफ्ट’ देण्यासाठी पैसे नसल्याने तो घरच्याघरी शुभेच्छापत्र तयार करायचा. नेहमीच काही वेगळे करण्याची आवड त्याला ‘अ‍ॅनिमेशन’ क्षेत्राकडे घेऊन गेली. यातच त्याने पुण्यामध्ये एरिना ‘अ‍ॅनिमेशन’च्या डिप्लोमासाठी प्रवेश घेतला आणि अवघ्या वर्षभरात म्हणजेच २०१० साली त्याला नोकरीही लागली. पुढे पदवीसाठी प्रवेश घेतला खरा, पण ते नोकरीच्या व्यापामध्ये तेही मागे राहून गेले. कामावरून येता जाता प्रवासात जो कोणी असाहाय्य व्यक्ती भेटेल, त्याला तो त्याच्या घासातला एक घास देऊ लागला.
 
 
 
‘वेब डिझायनिंग’च्या कोर्ससाठी त्याने ही नोकरी सोडली. मात्र, त्याआधी दीपंकरने तब्बल १०० लोकांना जेवण दिले. यासाठी त्याला कामावरील सहकार्‍यांचीही मदत मिळाली. यानंतर दीपंकरचा ओढा समाजसेवेकडे वाढत गेला. नव्या नोकरीनंतरही तो रस्त्यावर दिसणार्‍या गरजूंना शक्य त्या स्वरूपात मदत करू लागला. नेहमी धाडस झेलण्याची आवड असणार्‍या दीपंकरने ही नोकरीही सोडून स्वतःचा ‘पॅन्शिया इव्हेंट्स’ आणि कलाकार स्टुडिओ असा स्वतंत्र व्यवसाय सुरू केला.
 
 
 
याच दरम्यान दीपंकरला सीए मेघनंद डुंगरवाल यांचे काही काम मिळाले. विशेष म्हणजे, ते त्याला नेहमीच मार्गदर्शन करत. एकदा बोलता बोलता दीपंकरने त्यांच्याकडे समाजसेवेविषयी सांगितले. त्यानंतर दीपंकरने मेघनंद यांच्या सहकार्याने ‘आर्ट ऑफ हेल्पिंग फाऊंडेशन’ची स्थापना केली. याच नावाखाली दीपंकरने कामाला सुरूवात केली आणि सुरू झाला एक अनोखा अवघड पण तितकाच आनंददायी प्रवास.
 
 
 
लहानपणी कधीही दीपंकरला हॉटेलमध्ये जाऊन जेवण करणे माहिती नव्हते. त्यामुळे बिबवेवाडी अप्पर येथील रस्त्यावरील किंवा झोपडपट्टीतील ५३ मुलांना त्याने सहकार्‍यांच्या मदतीने हॉटेलमध्ये जेवणासाठी नेले. यावेळी सर्व मुलांच्या चेहर्‍यावरील आनंदाने दीपंकरला आणखी उमेद मिळाली. यानंतर त्याने आठवड्यातून एकदा घरीच पुलाव किंवा मसालेभात बनवून गरजूंना वाटण्यास सुरूवात केली. मार्केट यार्ड, स्वारगेट परिसरात तो जेवण वाटत होता. सुरूवातील त्याला जेवणाचा अंदाज येत नसे, पण त्याने हळूहळू तेदेखील जमवून घेतले.
 
 
 
दीपंकरच्या ओळखीतील लोक त्याला शक्य तितकी मदत करत होती. २०१८ साली त्याची आईदेखील पुण्याला दीपंकरसोबत राहू लागली. हे सर्व करताना त्याला आईचे संपूर्ण सहकार्य मिळत होते. या काळात घरची परिस्थिती आणि काही काळ काम न मिळाल्याने दीपंकरने आर्थिक परिस्थितीस सांभाळण्यासाठी तीन ते चार महिने टॅक्सीदेखील चालवली.
 
  
 
वारंंवार तीच-तीच लोकं आपल्याला मदत करू शकत नाही, हे त्याला माहीत असल्याने त्याने संस्थेची नोंदणी करण्याचा निर्णय घेतला. यामागे पारदर्शकता हा महत्त्वपूर्ण मुद्दा होता. अनेकदा अर्ध्या तासात संपूर्ण जेवण संपून जायचे, तर कधीकधी तो चार-चार तास जेवण देण्यासाठी माणस शोधत बसायचा. ऑगस्ट २०१९ मध्ये संस्थेची अधिकृत नोंदणी केल्यानंतर दीपंकरने मागे वळून पाहिलेच नाही.
 
 
 
आई सुरेखा आणि स्वतः दीपंकर संस्थेच्या संचालकपदाची जबाबदारी सांभाळत आहेत. २०२० साली कोरोनाच्या संकटकाळातही दीपंकरने ‘आर्ट ऑफ हेल्पिंग फाऊंडेशन’च्या माध्यमातून सामाजिक उपक्रम राबविण्यास सुरूवात केली. लातूर जिल्ह्यातील ४० कुटुंबांना दोन महिन्याचे रेशन, पोलिसांना मास्क आणि सॅनिटायझर वाटप, चहावाटप असे उपक्रम राबवले. २०२१ साली जवळपास ३५० पोलिसांसोबत रक्षाबंधनाचा सण साजरा करण्यात आला. कोल्हापुरातील महापुराच्या परिस्थितीत संस्थेचा छोटासा हातभार म्हणून दीपंकरने आणि त्यांच्या सहकार्‍यांनी मिळून २०० कुटुंबांना धान्य वाटप केले होते.
 
 
 
आपल्या कार्याला आणखी मोठ्या स्तरावर नेण्यासाठी दीपंकरने प्रयत्न सुरू केले. नियमित लंगर संकल्पनेला प्रत्यक्षात उतरवण्साठी ‘आर्ट ऑफ हेल्पिंग फाऊंडेशन’ने शनिवारी आणि रविवारी ‘फूड ट्रक’ लावण्यास सुरूवात केली. सुरुवातीला मोफत जेवण देण्यात आले. परंतु, गरुजूंपर्यंत त्याचा लाभ पोहोचत नसल्याने त्यांनी नंतर पाच रुपये आकारण्यास सुरुवात केली. नंतर अतिक्रमणाची समस्या उभी ठाकली. अखेर दीपंकरने नवले हॉस्पिटलमध्ये हा उपक्रम पुन्हा मोफत सुरू केला. परंतु, नंतरच्या अभ्यासानंतर मोफतचे जेवण असल्याने १०० पैकी ४० टक्के लोक गरज नसतानाही जेवण घेत होते.
 
 
 
त्यामुळे त्याचा लाभ खर्‍या गरजूंना होत नव्हता. आपण कष्टाने जेवण बनवतो, त्यामुळे ते गरजूंनाच मिळाले पाहिजे, असा संस्थेचा उद्देश होता. त्यामुळे ही संकल्पनाही नंतर बासनात गुंडाळावी लागली. यानंतर पुन्हा २०२२ जून महिन्यात ‘टिफीन सेवे’चा शुभारंभ करण्यात आला. यामध्ये निराधार वृद्धांना दोन वेळचे मोफत जेवण, आठवड्यातून एकदा फळे, उपवासाला उपवासाचे पदार्थ, आजारपणात नारळपाणी आणि औषधे दिली जातात. तसेच, किराणासहित अन्य आवश्यक गोष्टीही संस्थेमार्फत पुरविल्या जातात. विशेष म्हणजे, या उपक्रमासाठी गरजूंची निवडदेखील प्रत्यक्ष भेट घेऊन व अन्य माहिती घेऊन केली जाते.
 
 
 
आतापर्यंत १२० जणांची या सेवेसाठी नोंदणी झाली असून सदर सेवेचा लाभ एकूण ३७ जणांना दिला जातो. पर्वती, पद्मावती, तळजई या परिसरातील वृद्धांना ही सेवा पुरविली जात आहे. अगदी झोपडपट्टीच्या आत हे वृद्ध राहत असल्याने त्यांची शोधाशोध करताना दीपंकरला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. यामध्ये त्याला वृद्धमित्र संस्थेची मोठी मदत मिळाली.
 
 
 
भविष्यात हा उपक्रम भारतभर नेण्याचा दीपंकर आणि त्याच्या ‘आर्ट ऑफ हेल्पिंग फाऊंडेशन’चा मानस आहे. पुण्यात जवळपास दहा हजार निराधार वृद्ध आहेत. त्यामुळे पुण्यातच तीन ठिकाणी हा उपक्रम सुरू करण्यासाठी दीपंकर प्रयत्नशील आहे. जितकी मदत मिळते, जितके पैसे उपलब्ध आहेत त्यातच काटकसरीने व नियोजनाने कार्य करण्याकडे संस्थेचा कल असतो. दीपंकरला वैष्णवी भुतडा, हर्षद येनपुरे, शिवानी गोगावले, इशा सांगरोळकर, अक्षीता चौहान, दीपक सुभेदार यांचेही मोलाचे सहकार्य मिळते.
 
 
 
“अनेक वाईट प्रसंग मात्र त्याला धीराने सामोरे गेलो. अनेक अपमानांना पचवले. मुले असतानाही अनेक वृद्ध निराधार आयुष्य जगत आहे. अनेकांना खायला काही नाही. झोपायला जागा नाही. अंथरूण नसल्याने कित्येक वृद्ध जमिनीवरच झोपतात. काही वृद्ध अशा आहेत की, त्या बाथरूमसारख्या खोल्यांमध्ये आपले आयुष्य व्यतित करत आहेत.
 
 
 
वीज नाही, गॅस नाही. अशा निराधारापर्यंत पोहोचण्याचा आमचा प्रयत्न आहे. यामध्ये लोकांचीही मदत आम्हाला मिळणे तितकेच आवश्यक आहे,” असे दीपंकर सांगतो. जे गरजू आहे त्यांना मदत करणे आणि जे सक्षम आहेत त्यांना पुढे जाण्यासाठी मदत करण्याचा संस्थेचा उद्देश असल्याचे दीपंकर सांगतो.
 
 
 
दीपंकर आणि त्याची आई अजूनही भाड्याच्या घरात राहतात, असे असूनही ते निराधारांचा आधार होण्यासाठी आणि ते उपाशी राहू नये, यासाठी धडपडत आहेत. इतक्या कमी वयातही समाजसेवेला आपलेसे करत निराधारांच्या आयुष्यात प्रकाश पेरणार्‍या दीपंकर पाटील आणि त्याच्या ‘आर्ट ऑफ हेल्पिंग फाऊंडेशन’ या संस्थेला आगामी वाटचालीसाठी दै. ‘मुंबई तरूण भारत’तर्फे मनःपूर्वक शुभेच्छा...!
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.