कुंडमळा पूल दुरुस्तीला हेतुपुरस्सर दिरंगाई  झाली असल्यास संबंधितांवर कारवाई! - रविंद्र चव्हाण; संजय राऊतांची टीका निव्वळ राजकारणापोटी

    17-Jun-2025   
Total Views | 13


मुंबई : मुसळधार पावसामुळे इंद्रायणी नदीवरील कुंडमळा येथील पादचारी पूल वाहून गेल्याची दुर्घटना अत्यंत दु:खद असून मृतांच्या कुटुंबासोबत व जखमी झालेल्यांमागे महायुती सरकार खंबीरपणे उभे आहे. मात्र अशा दु:खद प्रसंगी संजय राऊत यांनी निव्वळ राजकारण करण्याच्या उद्देशाने केलेली टीका ही अत्यंत उथळ, अपरिपक्व विचारांचे प्रदर्शन करणारी आहे, अशी घणाघाती टीका भाजपचे प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी मंगळवारी केली. या पुलाच्या दुरुस्तीच्या कामाला हेतुपुरस्सर दिरंगाई झाली असेल, तर संबंधित अधिकाऱ्यांवर निश्चित कारवाई होईल, अशी ग्वाहीही चव्हाण यांनी दिली.

भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. यावेळी प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये, प्रदेश माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन आदी उपस्थित होते. चव्हाण यांनी सांगितले की, कुंडमळा नदीवरील जोडरस्त्यासह नवीन पूलाच्या बांधकामासाठी जुलै, २०२४ च्या पुरवणी अर्थसंकल्पामध्ये ८ कोटी रुपयांच्या तरतुदीला प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. प्रशासकीय मान्यता दिल्यानंतर २०२४ विधानसभा निवडणूक आचारसंहिता लागू झाली. दरम्यानच्या काळात सर्व तांत्रिक बाबींची पूर्तता व पूलाचे डिझाईन अंतिम करण्यात आले. मावळ तालुक्याचे भाजपाचे तालुकाध्यक्ष रविंद्र भेगडे यांनी पाठपुरावा केल्यानंतर शेतकरी व लोकहितासाठी आपण तात्काळ ८ कोटी रुपयांच्या रक्कमेच्या नवीन पूलास प्रशासकीय मंजूरी दिल्याचे पत्र ११ जुलै २०२४ रोजी दिले होते. बांधकाम विभागातर्फे या पुलाच्या दुरुस्तीचा कार्यारंभ आदेश देण्यात आले असून, एका वर्षात काम पूर्ण करण्याच्या सूचनाही दिल्या गेल्या होत्या. असे असताना पुढील प्रक्रियेला हेतुपूर्वक विलंब लावला गेला असेल तर त्याची चौकशी होईल आणि दोषींवर कारवाईही होईल, असेही श्री. चव्हाण यांनी नमूद केले.

अर्थसंकल्प कसा वाचावा याबाबत पुस्तक राऊतांना भेट देऊ

अर्थसंकल्प कसा वाचायचा याची ढोबळ माहितीही राज्यसभा खासदार असलेल्या संजय राऊत यांना नसल्याचे त्यांनी केलेल्या टीकेवरून दिसत आहे. या पुलाच्या कामासंदर्भात श्री. राऊत यांनी केलेल्या आरोपांची कीव येते. अर्थसंकल्पात आकडे हजारात असतात. त्या हिशोबानुसार या पुलाच्या दुरुस्तीसाठी ८ कोटींची तरतूद करण्यात आली होती. हे खासदार असलेल्या राऊत यांना कळत नसेल तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लिहीलेले ‘अर्थसंकल्प – सोप्या भाषेत’ हे पुस्तक राऊत यांना भाजपा तर्फे भेट देऊ, असा मिश्किल टोलाही त्यांनी लगावला.

सुहास शेलार

'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' म्हणून कार्यरत. मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. गेल्या आठ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत. महाराष्ट्राचे राजकारण आणि त्यासंबंधीच्या वृत्तांकनामध्ये विशेष रस. २०१४, २०१९ आणि २०२४ सालच्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांचे वार्तांकन. २०१८ साली राजस्थानमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या प्रत्यक्ष वार्तांकनाचा अनुभव.
'मुंबई तरुण भारत'चं व्हॉट्सअप चॅनल फॉलो करा!
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121