सामान्य लोकांना भारतीय मूल्यांवर आधारित दर्जेदार शिक्षण देण्यात ‘विद्या भारती’ची अतुलनीय भूमिका - केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचे प्रतिपादन
17-Jun-2025
Total Views |
मुंबई : “शिशु मंदिर हे ओडिशाच्या शिक्षण विभागातील नाडीसारखे आहे. ‘विद्या भारती’ आणि ‘शिक्षा विकास समिती’द्वारे चालवले जाणारे सरस्वती शिशु विद्या मंदिर, भारतीय पद्धती आणि मूल्यांवर आधारित सामान्य लोकांना दर्जेदार शिक्षण देण्यात अतुलनीय भूमिका बजावते,” असे प्रतिपादन केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी केले. ओडिशाच्या कटक जिल्ह्यातील सरस्वती विद्या मंदिरात ‘विद्या भारती’ आणि ‘शिक्षा विकास समिती’द्वारा आयोजित प्रदेशिका प्राचार्य परिषदेच्या समारोपादरम्यान ते बोलत होते.
उपस्थितांना संबोधत पुढे ते म्हणाले, “राष्ट्रीय शिक्षण धोरण-2020’नुसार, सरस्वती शिशु विद्या मंदिरांमध्ये शिक्षण व्यवस्थेची गुणवत्ता वाढविण्यासाठी या परिषदेचे आयोजन स्वागतार्ह आहे. ब्रिटिशांनी भारतात बनवलेले शिक्षण धोरण ही भारताला अपमानित करण्याची प्रक्रिया होती. भारतातील लोकांची मानसिकता दीर्घकाळ गुलामगिरीत ठेवण्यासाठी त्यांनी स्वतःचे शिक्षण धोरण आणले. या शिक्षण धोरणाला पर्याय म्हणून नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरण आले आहे. या शिक्षण धोरणाचे उद्दिष्ट भारतविरोधी मानसिकता बदलणे आणि भारताची स्वार्थी मानसिकता विकसित करणे आहे.”
पुढे ते म्हणाले, “राष्ट्रीय शिक्षण धोरणात मातृभाषेसह सर्व भारतीय भाषांमध्ये शिक्षण देण्यावर भर देण्यात आला आहे. केवळ मातृभाषेत शिक्षण घेतल्यास विद्यार्थ्यांचा बौद्धिक विकास, समीक्षात्मक विचार आणि संशोधन क्षमता वाढते. येत्या काळात सर्व भारतीय भाषा शिकवल्या जातील. सध्याचे सरकार शिक्षण व्यवस्था मातृभाषेवर आधारित करण्यासाठी वचनबद्ध आहे.”
संपूर्ण ओडिशा प्रांतातील एक हजार, 100 हून अधिक मुख्याध्यापक आणि प्राचार्यांनी प्रांतीय परिषदेत हजेरी लावली. परिषदेत ‘विद्या भारती’चे अ. भा. अध्यक्ष डॉ. रवींद्र कान्हेरे, अ.भा. संघटन मंत्री गोविंद महंत, क्षेत्र संघटनमंत्री आनंद राव आणि क्षेत्र व प्रांतीय अधिकारी उपस्थित होते.