गुरूपूजन हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघातही केले जाते. संघाचे संस्थापक डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांनी १९२५ मध्ये संघाची स्थापना करताना भगव्या ध्वजालाच गुरूस्थानी मानले. तेव्हा आज गुरुपौर्णिमेनिमित्त गुरु परंपरेचे स्मरण करुया...
आजच्या आषाढ शुद्ध पौर्णिमेला ‘गुरुपौर्णिमा’, ‘व्यासपौर्णिमा’ असेही आपण म्हणतो. ज्यांनी वेदांची पुनर्रचना करून ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद असे चार वेद तयार केले, तसेच महाभारत, भागवत, महापुराण आणि इतर पुराणे लिहिली, त्या व्यासमुनींना वंदन करण्याचा, त्यांची पूजा करण्याचा हा मंगलदिन. त्यांच्याएवढे श्रेष्ठ गुरू, आचार्य अद्याप झालेले नाहीत, अशी आपली श्रद्धा आहे. अशा आचार्यांना साक्षात देवाप्रमाणे मानावे, असे शास्त्रात कथन केले आहे. एवढेच नव्हे, तर महर्षी व्यास हे भारतीय संस्कृतीचे शिल्पकार आणि मूलाधार मानले जातात. ज्या ग्रंथात धर्मशास्त्र, नीतिशास्त्र, व्यवहारशास्त्र, मानसशास्त्र आहे, असा सर्वश्रेष्ठ ग्रंथ त्यांनी लिहिला. ’ज्ञानियांचा राजा गुरु महाराव...’ म्हणून संत तुकाराम ज्यांचा उल्लेख करतात, त्या ज्ञानदेवांनीसुद्धा ज्ञानेश्वरी लिहिताना ‘व्यासांचा मागोवा घेतू...’ असे म्हणून सुरुवात केली आहे. संतगणही गुरुला प्रथम स्थानी मानतात.
व्यासपौर्णिमेच्या, गुरुपौर्णिमेच्या दिवशी ‘ॐ नमोऽस्तुते व्यास, विशाल बुद्धे’ अशी प्रार्थना करून, त्यांना प्रथम वंदन करण्याचा आपला प्रघात आहे, तशी परंपरा आहे. याच श्रद्धायुक्त भावनेने आपण गुरुपौर्णिमा साजरी करतो.
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः।
गुरुर्देवो महेश्वरः।
गुरुरेकः परं ब्रह्म। तस्मातगुरुमुपाश्रयेत॥
अर्थात- गुरु ब्रह्मा सत्य जाण।
तोचि रुद्र नारायण। गुरुचि ब्रह्म कारण।
म्हणोनि गुरु आश्रावा॥
ज्याला अनेकांनी ’पाचवा वेद’ असे मानले आहे, अशा गुरुचरित्राच्या पोथीमध्ये ब्रह्मदेव आणि कली यांच्यातील संवाद आहे. सायंदेवांच्या या पोथीत गुरुची महती वर्णन करताना ब्रह्माने गुरुचा महिमा विस्ताराने वर्णिला आहे. या पोथीमधील मंगलाचरणाच्या पहिल्या अध्यायात नेहमीप्रमाणे गणेश-सरस्वती वंदनेनंतरचा ’सिद्धनामधारकसंवादे शिष्यदीपकाख्यानं’ हा दुसरा अध्याय गुरुची महती प्रकट करणारा असून त्यात गुरुंना वंदन केलेले आढळते. त्यातील ओव्यांमध्ये देवाच्या जोडीनेच, किंबहुना देवापेक्षाही गुरू कसा श्रेष्ठ आहे, हे विशद केले आहे.
गुरुः पिता गुरुर्माता।
गुरुरेव परः शिवः।
शिवे रुष्टे गुरुस्त्राता
गुरौ रुष्टे न कश्चन ॥
अर्थात
गुरु आपला मातापिता गुरु शंकरु निश्चिता। ईश्वरु होय जरि कोपता।
गुरु रक्षील परियेसा॥
गुरु कोपेल एखाद्यासी। ईश्वर न राखे परियेसी। ईश्वरू कोपेल ज्या नरासी। श्रीगुरु रक्षी निश्चये॥
आणखी एका श्लोकात म्हटले आहे-
ईश्वर जरी प्रसन्न होता।
त्यासी गुरु होय ओळखविता।
गुरु आपण प्रसन्न होता।
ईश्वर होय अधीन आपुल्या॥
यावरून गुरुचे महत्त्व किती अनन्यसाधारण आहे ते आपल्याला समजते.
आजही आपण धार्मिक, ऐतिहासिक, पौराणिक, आध्यात्मिक महती असलेल्या गुरुपौर्णिमेला गुरुंना मान-सन्मान देत वंदन करत असतो. ज्ञान हे सर्वोत्तम असते, म्हणून ज्ञानाचा आदर करावयाचा असतो. आपण गुरुपौर्णिमेच्या दिवशी ज्यांना प्रणाम करतो, त्यांच्याकडे प्रचंड असा अनुभव म्हणजे ज्ञान असते, म्हणून आपला प्रणाम ज्ञानाला असावा, असे आपण मानतो. आपण जगद्गुरू शंकराचार्यांचे उदाहरण घेऊ. शंकराचार्य 25 वर्षांचे असताना जगद्गुरू झाले. मोठे मोठे ऋषी व साधू त्यांच्या पाया पडत असत. हे वंदन त्यांच्या ज्ञानाला असे, वयाला नव्हे.
तोच विचार आपण करतो. गुरू आपल्यापेक्षा वयाने लहान आहे की मोठा आहे, याचा विचार आपण करत नाही. जवळपास सगळ्यांनीच कोणाला तरी आपले ’गुरू’ मानलेले असते. आपण कुठल्याही क्षेत्रात असू आणि आपण वयांनी केवढेही असू, आपण एकतरी गुरू मानावाच, असे सगळे सांगत आले आहेत. ते ऐकले तर त्याचा फायदा आपल्याला खचितच मिळतो.
आपल्या देशात रामायण-महाभारत काळापासून गुरू-शिष्य परंपरा चालत आलेली आहे. आपल्या परंपरेत गुरूशिष्यांच्या अनेक जोड्या प्रसिद्ध आहेत. महर्षी व्यास-शुक, वैशंपायन-परशुराम, द्रोणाचार्य -भीष्म, द्रोणाचार्य-अर्जुन, सांदीपनी ऋषी-श्रीकृष्ण व बलराम, महर्षी विश्वामित्र- श्रीराम व लक्ष्मण, आर्य चाणक्य- चंद्रगुप्त, समर्थ रामदास स्वामी -शिवाजी महाराज, स्वामी विरजानंद-स्वामी दयानंद सरस्वती,रामकृष्ण परमहंस-स्वामी विवेकानंद अशा अजूनही काही सुपरिचित जोड्या आहेत.
शिष्याची आकलन क्षमता, समज, बुद्धी, त्याचा समंजसपणा, शहाणपणा, सुज्ञपणा हे सारे महत्त्वाचे असते, नाहीतर तसे पाहता अर्जुन आणि दुर्योधन या दोघांचे गुरू द्रोणाचार्य होते, पण अर्जुन शिष्योत्तम झाला .
गुरु द्रोणाचार्य व एकलव्य यांच्या वागणुकीतून आपल्याला एक धडा मिळतो. अनुकरणीय शिष्यत्व म्हणजे काय, हा प्रश्न मनात आला की लगेच आपल्या तोंडी एकलव्य हे नाव येते.
महाभारत काळातील ‘ती’ कथा आपण जाणतोच. धनुर्विद्येच्या म्हणजे आजकालच्या भाषेत ’आर्चरी’च्या खेळातील उत्तम ‘आर्चर’ असलेल्या एकलव्यासारख्या धनुर्धारी शिष्याने स्वतःच्या मेहनतीने धनुर्विद्या शिकलेली होती. वरवर पाहता द्रोणाचार्यांनी एकलव्यावर अन्याय केला, असे आपल्याला वाटत असले, तरी त्यांनी शिष्योत्तमाचा आदर्श निर्माण केला. त्यामुळे समर्पणाचे उदाहरण जेव्हा जेव्हा दिले जाईल, त्यावेळी आपल्या समोर अर्जुनाऐवजी एकलव्याची प्रतिमा येईल. यामध्ये द्रोणाचार्यांचे श्रेष्ठत्व पाहा, त्यांनी शिष्यासाठी सर्व आळ आपल्यावर घेतला. मात्र, गुरू कधीच चुकीचा नसतो. या राज्यात राजपुत्रापेक्षा कोणी श्रेष्ठ होऊ शकणार नाही, हे पाहणे त्यांचे कर्तव्यच होते. तेव्हा गुरूंनी एकलव्याचे श्रेष्ठत्व अधोरेखित करत कर्तव्याचेही रक्षण केले.
आदिवासी जनतेचे भगवान बिरसा मुंडा यांचेही एक गुरू होते. एक दिवस रानातून जात असताना आनंद पांडे हे बिरसांच्या जीवनात आले. बिरसांचे नाव पंचक्रोशीत पसरले असल्याने आनंद पांडे यांनी बिरसांना ओळखले आणि त्यांच्याशी जवळीक साधली.बिरसांनी आनंद पांडेंचे शिष्यत्व स्वीकारले. त्यांच्याकडून दीक्षा घेतली. त्यांच्याबरोबर अनेक ठिकाणी भ्रमंती करत वैष्णव धर्माबद्दल ज्ञान प्राप्त करून घेत बिरसांनी रामायण, महाभारत शिकून घेतले. हाच आनंद पांडेंचा शिष्य पुढे समस्त आदिवासी जनतेचा गुरू बनला व त्यांनी एक इतिहास घडवला.
एक गुरू, एक शिष्य, एक गुरू अनेक शिष्य, एक शिष्य अनेक गुरू, अनेक गुरू अनेक शिष्य असे क्रमपरिवर्तन आणि संयोजन (परम्युटेशन-कॉम्बिनेशन) आपण आज बघतो. आजच्या आधुनिक युगात गुरूला ’मेंटॉर’ असेही संबोधतात. क्रिकेटमधील सुनील गावसकरला ’सनी’ हे नाव वासू परांजपे यांनीच ठेवले होते. ’क्रिकेट द्रोणा’ नावाचे आत्मचरित्र त्यांनी लिहिले आहे. सचिन तेंडुलकर, सुनील गावसकर, दिलीप वेंगसरकर यांच्यासारख्यांचे ते ‘मेंटॉर’ (गुरु) होते. एक गुरू अनेक शिष्य याचे हे उदाहरण होय.
ध्यानसिंह हा रात्री चंद्रप्रकाशात एकट्यानेच तासन्तास हॉकीचा सराव करण्यात स्वतःला विसरून जात असे. हे बघून पंकज गुप्ता यांनी ‘ध्यानसिंह’ या मूळ नावाचे ‘ध्यानचंद’ असे नामकरण केले आणि त्याला एक दिशा दिली. याच पंकज गुप्ता नामक गुरुचा ध्यानचंद हा शिष्य अवघ्या विश्वात प्रसिद्ध झाला.
आजच्या काळातही गुरूंचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. गुरू-शिष्यांच्या अनेक जोड्या आजही आपण जाणतो. वरच्याप्रमाणे क्रीडा क्षेत्राचे उदाहरण तर आपल्याला परिचित आहेच. खेळाडूंचे प्रशिक्षक (कोच)हा एक गुरू असतो आणि तो शिष्यापेक्षा जास्त तपस्या करत असतो. या सगळ्या गुरुस्थानी असलेल्या प्रशिक्षकांनी आपल्या कर्तव्याचे पालन करावे आणि आपल्या शिष्याचे भविष्य उज्ज्वल करण्यासाठी आपले योगदान द्यावे. अशा प्रशिक्षकांना सगळे शिष्य आदर देत असतात. गुरू-शिष्य यांच्यात आपुलकीचे नाते असेल, तर तो खेळ बहरतो आणि त्यातून चांगलीच फळे मिळतात.
गुरूपौर्णिमेच्या दिवशी शाळेत, मठांत, मंदिरात, मंडळात, आश्रमात, गुरुकुलात अशा अनेक ठिकाणी गुरूंचे पूजन केले जाते. तसेच गुरूपूजन हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघामधेही करतात. संघाचे संस्थापक डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांनी १९२५ मध्ये संघाची स्थापना करताना भगव्या ध्वजालाच गुरूस्थानी मानले. मनुष्यात अनेक दुर्गुण असू शकतात, पण त्यागाचे प्रतीक असलेला हा भगवा ध्वज आपल्याला काहीना काही शिकवणच देत असतो. सूर्य ज्याप्रमाणे स्वतः जळत राहून सगळ्या दुनियेला प्रकाशमान करत असतो, त्या सूर्यासारखे दुसर्यांसाठी आपले जीवन समर्पित करणारे साधू, संत हे भगवे वस्त्रच परिधान करत असतात. अशा विचारांनी व्यक्तिपूजेऐवजी ध्वजाला गुरू मानणे कधीही योग्यच आहे, असा हा ध्वज तपोमय व ज्ञाननिष्ठ अशा भारतीय संस्कृतीचे सर्वाधिक सशक्त व पुरातन असे प्रतीक आहे. संघाच्या व्यवहारातील प्रत्येक कृती ही अशीच दिव्यत्वाकडे, ईश्वराकडे नेणारा संस्कारच असते.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघातील स्वयंसेवक काही उत्सव साजरे करत असतात, ते उत्सव म्हणजे -विजयादशमी, मकर संक्रांत, शिवराज्याभिषेक अर्थात ‘हिंदू साम्राज्य दिन’, गुरूपौर्णिमा आणि रक्षाबंधन. अशा या गुरूपौर्णिमेच्या उत्सवात सगळे स्वयंसेवक हे भगव्या ध्वजाचे पूजन करतात आणि यथाशक्ती धन अथवा वस्तू अर्पण करतात. संघाच्या स्थापनेनंतर १९२८ मध्ये सुरू झालेल्या पहिल्या गुरूपौर्णिमेपासून ही परंपरा अजूनही चालू आहे व राहील.
छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास स्वामी या गुरूशिष्याच्या जोडीने अख्खा महाराष्ट्र घडवला. राष्ट्र घडवताना, हिंदवी स्वराज्याचा पाया घालताना या दोघांनी भगवा ध्वजच हाती घेतला.
गुरू कोणाला करावे? तर, जिथे आपले समाधान होते, संशय, शंका दूर होतात, तेच गुरूपद म्हणावे. गुरूपद, गुरूतत्त्व सर्व ठिकाणी एकच असते म्हणूनच-
ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे।
त्या त्या ठिकाणी निजरूप तुझे।
मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी।
तेथे तुझे सद्गुरु पाय दोन्ही॥
आपल्या जीवनात गुरूंची नानाविध रूपे आपणांस पाहायला मिळतात. मूल गर्भात असल्यापासून आई त्याच्यावर उत्तम संस्कार करते. कारण, आई ही आपला पहिला गुरू असते. आपले पालक आपल्या कुटुंबाचे पालनपोषण करतात तेव्हा त्यांची पुढची पिढी ते बघत असते. नकळत पालक हे पाल्याचे गुरू होतात.
आपण स्वतःला ज्ञानी म्हणवून घेत असलो-नसलो, तरी आपण कितपत ज्ञानी आहोत हे ओळखून घ्यायची तळमळ असेल, तर लवकरात लवकर सद्गुरू शोधा. ज्यांना गुरुचरणी आसरा मिळाला आहे ते सुदैवी. संत कबिरांनी त्यांच्या दोह्यात म्हटले आहेच, सद्गुरु की महिमा अनंत, अनंत किया उपकार। लोचन अनंत उघाडिया, अनंत-दिखावनहार॥ गुरूंची महती अपार असते. गुरूने आपल्या शिष्यावर केलेले उपकार कधी न फेडण्यासारखेच असतात. गुरूची तशी अपेक्षाही नसते. ते आपल्या शिष्यांना सतत जागृतावस्थेत ठेवत असतात. शिष्याला ज्ञानाचा साक्षात्कार कसा होईल, हे सतत बघत असतात. आपल्याला सद्शील, सद्गुणी शिष्य बनायचे असेल, तर आपण कबिरांचे दोहे समजून घेतले पाहिजेत. ‘घट में हैं पर बतावे, दूर की बात निरासी। कहत कबीर सुनो भाई साधो, गुरु बिन भ्रम ना जासी॥’ शिष्यरुपी घडा बनवताना गुरू हा एका कुंभाराप्रमाणे वागतो. शिष्य आधी कच्च्या मातीसारखा गोळा असतो. गुरू मडक्याच्या अंतरंगास हाताने आधार देत असताना बाहेरून मात्र चापट्या मारत असतो. शिष्यातील दुर्गुण काढून टाकत असतो. गुरूच शिष्याचे चरित्र निर्माण करत असतो. आषाढात नभ मेघांनी आक्रमिलेले असते. तारांगण सर्वही झाकुनि गेलेले असते, अशा आषाढातल्या पौर्णिमेला ‘गुरुपौर्णिमा’ असे का बरं म्हणत असावेत? याचं उत्तर मला ’हिंदी विवेक’च्या अंकात वाचताना मिळाले. चंद्र-चांदण्यांचे दर्शन या ऋतूमध्ये दुर्लभच असते. परंतु, ज्यांनी आषाढ पौर्णिमेला गुरुपौर्णिमेची उपमा दिली असेल, त्यांना असे सुचवायचे असेल की, गुरू हे चंद्राप्रमाणे असतात आणि शिष्य आषाढासारखे. आषाढ महिन्यात आकाशात ढगांनी गर्दी केलेली असतानाही ढगांच्या वर चंद्र मात्र आपले कार्य अविरतपणे करतच असतो.
गुरुपौर्णिमेच्या आजच्या या मैफिलीचा समारोप करताना आपण स्वरभास्कर भारतरत्न पंडित भीमसेन जोशींचा जरुर उल्लेख करु. १९५३ साली भीमसेन जोशी नावाच्या शिष्याने त्यांच्या गुरुंना भारतीय शास्त्रीय संगीत समारोहाच्या रुपाने दिलेली ती आदरांजली. गुरुंच्या नावाने सुरू झालेला ’सवाई गंधर्व महोत्सव’ हा नंतर २०१८ साली ’सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव’ या नवीन नावाने अजूनही चालू आहे. या एकमेवाद्वितीय समारोहात अनेक गुणी कलाकार आपली कला सादर करतात. हा महोत्सव म्हणजे सवाई गंधर्व-भीमसेनजी या गुरू-शिष्यांनी कलेच्या चाहत्यांना दिलेली मोलाची देणगीच आहे.
जेव्हा गुरूंना शिष्यांबद्दल अभिमान आणि शिष्यांना गुरूंबद्दल अभिमान वाटतो, तेव्हा त्यांचे आयुष्य यशाकडे मार्गक्रमण करताना दिसते. आपल्या हिंदुस्थानाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव चालू आहे. अशा अमृतकाळी आपल्या आयुष्याला पर्यायाने राष्ट्राला दिशा देणार्या सर्वच गुरूंना आपण भक्तिभावाने नमस्कार करुया...
गुरु एक जगी त्राता
गुरु दयासिंधू गुरु दीनबंधू
गुरु जननी जन्मदाता॥