वयातही अतिशय उत्तम प्रकृतीस्वास्थ्य लाभलेले भारतातील धरमशाला येथे वास्तव्यास असणारे तेनझिन ग्यात्सो (दलाई लामा) तिबेटच्या स्वातंत्र्यासाठी आधीच्याच उत्साहाने, कडवेपणाने शांततामय मार्गाने झुंज देत आहेत. सगळ्या जगासाठी ध्यान, आत्मिक उंची, आंतरिक शांती, अध्यात्म या प्रवासातील दीपस्तंभ ठरलेल्या या जगावेगळ्या मुत्सद्दी राजकारण्याला जगानेही आजवर तितकाच आदर आणि प्रेम दिलेले आहे. 154 आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आले आहे. यात ‘नोबेल पारितोषिक`, ‘मॅॅगसेसे`, ‘टेंपलपन`, अमेरिकेचे काँग्रेगेशनल सुवर्णपदक इ. अनेक पुरस्कारांचा समावेश आहे.
गेल्या 64 वर्षांत तिबेटियन जनतेच्या मनातला दलाई लामांविषयीचा आदर तिळमात्रही कमी झालेला नाही. 2008 मध्येे जो स्वातंत्र्याचा उठाव तिबेटमध्ये झाला, त्यावेळी दीडशेहूनही अधिक तिबेटियन तरुणांनी स्वातंत्र्याची आणि दलाई लामांना परत आणण्याची मागणी करत स्वतःला जाळून घेतले. स्वाभाविकपणे अत्यंत जहरी, कुटील, पाताळयंत्री चिनी कम्युनिस्ट सत्तेने आता काय होईल, या भयाने दलाई लामांना अधिकाधिक दुषणे देऊन, ‘साधूच्या वेशातील लांडगा` इ. संबोधनांनी त्यांचा उपमर्द करत, तिबेटी समाजावर अधिकाधिक अन्याय करण्याचे सत्र सुरुच ठेवले. त्यामुळेच वर वर शांत दिसणारा, जगाच्या खिजगणतीतही नसणारा तिबेट दर चार-पाच वर्षांनी अत्याचारी चिनी हुकूमशाही विरुद्ध बंड करून उठतो. पण, राक्षसी महत्त्वाकांक्षा आणि अपरिमित शक्ती असणाऱ्या चिनी सरकार आणि सैन्यापुढे ते निष्प्रभ ठरतात. परंतु, जगभरात दया, क्षमा, करुणा आणि शांतीचा संदेश देताना आपल्या देशातील सत्य परिस्थितीचे वर्णन दलाई लामा सतत विविध जनसमूहांसमोर मांडत असतात. परिणामस्वरूप आता जवळजवळ 100 देशांमध्ये तिबेटच्या स्वातंत्र्यासाठी प्रयत्न करणारे शेकडो गट तयार झाले आहेत. त्यामुळे चीन ज्याप्रमाणे तिबेटातील लोकांना त्रास देत आहे, त्याचप्रकारे जगभरात पसरलेल्या तिबेटी समाजाचीही (डायस्पोरा) विविध प्रकारे अडवणूक करत आहे.
आज तिबेटी भाषा समजू शकणारी तरुण पिढी तिबेटच्या समाजातून नष्टच झाली आहे. चिनी मँडेरिन हीच सक्तीची शिक्षण भाषा झाली आहे. या समाजाने आपली संस्कृती, भाषा, आपला इतिहास, आपले तत्वज्ञान सगळे अडगळीत टाकून देऊन संपूर्णपणे चिनी कम्युनिस्ट आचार-विचारपद्धती स्वीकारावी, यासाठी सरकार गेली सहा दशके प्रयत्नशील आहे. संपूर्ण तिबेटी जनजाती, येथील वंशच नष्ट व्हावेत, यासाठी अतिशय थंड डोक्याने कुटील चाली खेळल्या जात आहेत. तिबेटमधील वेगवेगळ्या कार्यालयांत काम करण्यासाठी हान वंशाच्या स्मार्ट, सुस्वरूप चिनी तरुणांची निवड केली जाते आणि त्यांनी तिबेटी मुलींशी लग्न करावीत यासाठी त्यांना भरीस घातले जाते. जेणेकरून नवी पिढी हानवंशीय असेल आणि तिबेटी समाजाचा नंबर आपसुकच कमी होईल, असा भयंकर आचरट आणि अनैतिक प्रकार गेली अनेक वर्षे चालू आहे. परंतु, या सगळ्याचा फारसा उपयोग होत नाहीये, हे निदर्शनास आल्यामुळे गेली 15-20 वर्षे ते तिबेटच्या धार्मिक बाबींमध्येसुद्धा मोठ्या प्रमाणावर नाक खुपसू लागले आहेत. 25 वर्षांपूर्वी पंचेन लामांचा नवा पुनर्जन्म ज्या मुलाच्या रूपाने झाला आहे, अशी घोषणा दलाई लामांनी केली, त्या मुलाचे अपहरण चायनीज कम्युनिस्ट पार्टीने केले. पंचेन लामा म्हणजे दलाई लामांच्या खालोखाल ज्यांचा अध्यात्मिक धार्मिक अधिकार असतो, असे तिबेटी धर्मगुरू. आज `गेधून च्योयकी नेमा` नावाची ही व्यक्ती म्हणजेच अपर्हुत पंचेन लामा हे जीवंत असतील, तर 31 वर्षांचे असतील.
संरक्षणासाठी म्हणून ताब्यात घेतलेल्या या पंचेन लामांचा लहानपणीचा केवळ एक फोटो त्यांच्या अनुयायांकडे उपलब्ध आहे. `सर्वात लहान राजकीय बंदी` असे या अपहरणाचे वर्णन मानवाधिकार संघटना करतात. या अपर्हुत पंचेन लामांना चीनने जगासमोर हजर केले नाहीच. पण, आपल्या सोयीच्या अशा नव्या मुलाला त्यांनी ‘पंचेन लामा` म्हणून घोषित केले. आज अमेरिकेनेही तिबेटच्या धार्मिकबाबींमध्ये नाक खुपसायला चीनला अधिकार नाही, नव्या दलाई लामांची व पंचेन लामांची निवड हा सर्वार्थाने तिबेटी लोकांचा, अध्यात्मिक संस्थेचा अधिकार आहे, हे ठासून सांगत पंचेन लामांना जगासमोर हजर करा, अशी मागणी चीनकडे केली आहे. परंतु, गेधुन नेमो आणि त्यांचे कुटुंबीय एक सामान्य चिनी नागरिक असून ते शांत, सामान्य चिनी जीवन पसंत करीत आहेत आणि त्यांना कोणी त्रास देऊ नये, अशी त्याची इच्छा आहे; असे उत्तर प्रत्येक चिनी प्रवक्ता याविषयी छेडले असताना नेहमी देतो. चीनला सर्व बाजूनी कोंडीत पकडण्यासाठी वापरायचे एक हत्यार, इतकाच याचा अर्थ अमेरिकन सरकारसाठी असू शकतो. परंतु, सर्वसामान्य बौद्ध समाजासाठी हा एक महत्त्वाचा टप्पा आहे.
आजपर्यंत अमेरिकेसोबत जवळपास 20 देशांनी चीनच्या झुंडशाहीला भीक न घालता, स्वतंत्र तिबेट आणि दलाई लामा यांच्यासाठी आपापल्या पार्लमेंटमध्ये 50 ‘रिझॉल्युशन्स` पास केलेली आहेत. पण, हे भयंकर कठीण काम आहे. आपल्याकडे लोक शेताच्या बांधाच्या मालकीवरून एकमेकांचे गळे चिरायला निघतात, इथे तर एका संपूर्ण देशाच्या स्वायत्ततेचा, सार्वभौमत्वाचा संकल्प करायचा आहे आणि तेही लाखो लोकांच्या कत्तली, अब्जावधी रूपयांची संपत्ती सहज बेचिराख करणारे राक्षसी महत्त्वाकांक्षी, दुसऱ्याची जमीन, जानमाल हडपून जगात दादागिरी करण्यासाठी त्याचा वापर करणारे, गुंड, कम्युनिस्ट चिनी सरकार समोर असताना...
त्यांना त्यांच्या गुडघ्यावर आणून आपल्याला हवे ते त्यांच्याकडून करवून घेणे हे एक महाकर्मकठीण कार्य आहे. ‘कोविड`नंतरचे जग म्हणजे विविध देश, जनता, संस्था, सरकारे सर्वच मोठ्या प्रमाणात आपल्या आसपास, जगात, देशांत काय घडते आहे, याबाबत जागृत होऊ लागली आहेत. आपापल्या रणनीती बदलून वेगवेगळी जागतिक समीकरणे आजमावून पाहू लागली आहेत.
1959 साली म्हणजे 62 वर्षांपूर्वी अरुणाचलातील तवांगमार्गे दलाई लामा भारताच्या आश्रयाला आले. भारतीय सैन्यातील शूर सैनिकांनी त्यांना पळून येण्यासाठी मदत केली. तिबेट बळकावण्याची पूर्वतयारी माओ झेडाँगने 1949 सालीच सुरू केली होती. कम्युनिस्ट क्रांतीच्या विजयानंतर माओच्या साम्राज्यवादाच्या विस्तारवादी आकांक्षांना नवे धुमारे फुटू लागले.
गरजेप्रमाणे इतिहासाचा वापर करायचा, इतिहास मोडूनतोडून आपल्याला हवा तसा सोयीने लोकांच्या माथी मारायचा, ही कम्युनिस्ट पद्धत आपल्याला भारतात चांगलीच ओळखीची झाली आहे. त्याची विषफळे आपल्याला आजही चाखावी लागत आहेत. नाही का? जे चीनने भारतीय कम्युनिस्टांना, काँग्रेसीजनांना शिकवले, तेच त्यांनी तिबेटमध्ये प्रत्यक्षात आणले. चिनी-तिबेटी इतिहासाचा, इथल्या समाजाचा, जनजातीच्या मानसिकतेचा, तत्वज्ञानाचा, जीवनपद्धतींचा यापैकी कसलाही विचार मानवतेच्या दृष्टिकोनातून करायची गरज या क्रूर सत्तेला भासली नाही. जो आपल्या आतंकी हव्यासाच्या आड येईल, त्याला नेस्तनाबूत करून टाकणे, संपवून टाकणे हीच साधी, सोपी, सरळ नीती त्यांनी स्वीकारली. त्याचा पुरेपूर, सढळ हस्ताने वापर ते आजही करत आहेत. 1989 साली घडलेल्या तियानमेन चौकातील कत्तली असोत किंवा आज रोजच्या रोज घडणाऱ्या हाँगकाँगमधील घटना असोत, तिथे बळजोरीने केलेली राष्ट्रीय सुरक्षा कायद्याची अंमलबजावणी असो किंवा वुहानमध्ये कोरोनाच्या साथीला ज्या अमानवीय पद्धती वापरून आटोक्यात आणले गेले तो सगळा प्रकार असो, चिनी कम्युनिस्ट पार्टी क्रौर्याच्या परिसीमा गाठून जगाला आश्चर्यचकित करायला कधीच चुकत नाही.
चीन आणि तिबेटच्या संस्कृतींचा अभ्यास करता, त्यांच्यात काही साम्य नाही, हे पदोपदी जाणवते. याउलट अनेक भारतीय परंपरांशी तिबेटी पद्धती बहुतांशी मिळत्याजुळत्या आहेत. चीन राजेशाही, साम्राज्यवादी, तर तिबेट पुनर्जन्मावर विश्वास ठेवून दलाई लामा, पंचेन लामांना आपली प्रमुख धारा मानून चालणारा! चिनी समाजाला विविध काळात जशा बंडाळ्या, उठाव यांचा अनुभव आहे, तशी काही परिस्थिती तिबेटियन समाजाची नाही. त्यांनी कधी या धार्मिक व्यवस्था किंवा राजकीय यंत्रणेविरुद्ध बंड पुकारल्याचे ऐकिवात नाही.
आपल्या विस्तारवादी धोरणाच्या अंतर्गत आज चीनचे 21 देशांशी सीमावाद आहेत. ही बाब ‘पीएलए` आणि ‘सीसीपी`ला एखाद्या शौर्यपदकाप्रमाणे मिरवावीशी वाटते. हे भारतासाठी काळजीचे कारण नाही का? अशा बिकट परिस्थितीत आधीच गिळलेला घास या चिनी ड्रॅगनला ओकायला लावणे म्हणजे भगीरथाने पृथ्वीवर गंगा आणण्याइतके कठीण.. नाही का?