अष्टांग योग

युञ्जते इति योग : भाग-१

    15-Jun-2022
Total Views |

yoga




सहसा योग म्हटले की, आसन आणि प्राणायाम हेच डोळ्यांसमोर येतात. योग म्हणजे व्यायाम प्रकार. योग म्हणजे वृद्धांनी करावा असा अभ्यास. योग करण्यासाठी खूप साधना लागते. खूप अध्यात्माची ओढ लागते वगैरे वगैरे. अशा अनेक मिथ्या गोष्टी योगविषयी सामान्य जनतेमध्ये प्रचलित आहेत. तेव्हा यंदाच्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या पार्श्वभूमीवर योगसप्ताहाच्या निमित्ताने दै. ‘मुंबई तरुण भारत’आणि ‘आयुर्वेद व्यासपीठ, ठाणे शाखे’तर्फे ‘युञ्जते इति योग:’ या सात भागांच्या विशेष लेखमालिकेतून विविध योग पद्धतींची तोंडओळख करून घेऊया....
 
 
भारतीय प्राचीन शास्त्रांमधील योगशास्त्र हे एक महत्त्वाचे शास्त्र आहे. भारतीय तत्त्वाज्ञानाचा मूळ पाया मोक्षप्राप्ती हाच आहे व ते साध्य करण्याचे विविध मार्ग आहेत. त्यातील योगशास्त्र हा एक मार्ग. योगशास्त्राचेही विविध प्रकार आहेत, जसे ‘अष्टांगयोग’, ‘हठयोग’, ‘कर्मयोग’, ‘ज्ञानयोग’, ‘भक्तियोग’ व ‘राजयोग.’
 
 
अष्टांग योग : म्हणजेच ज्याचे आठ अंग/उपांग आहेत, असे म्हटले तर चुकीचे होणार नाहीत. या आठ पायर्‍या उत्तरोत्तर ध्येयाकडे (मोक्षप्राप्ती) वाटचाल करण्यास मदत करतात. ही आठ अंगे म्हणजे - यम, नियम, आसन, प्राणायम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी.
 
 
यम : याद्वारे प्रत्येक व्यक्तीने समाजात वावरताना कसे वागावे, याबद्दलचे मार्गदर्शन आहे. अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य व अपरिग्रह हे नियम कायिक, वाचिक व मानसिक स्तरावर पालन करण्यासाठी आहेत. इतर कुठल्याही सजीवाला हिंसा करू नये (ज्ञान होऊन) म्हणजेच अहिंसा. एखाद्याला बोलूनही दुखावल्यास त्यालाही हिंसा म्हटली जाते. सत्य बोलताना नेहमी सत्य बोलावे हे बरोबर; पण आवश्यकता नसतानाही बोलण्याची गरज नाही. अस्तेय म्हणजे (स्तेय म्हणजे गोळा करणे, जमवणे, इतरांचेही आपल्याकडे बळकावून घेणे इ. प्रकारची इच्छा/लोभ) कमीतकमी गरजांमध्ये समाधानी राहणे. ब्रह्मचर्यामध्ये केवळ कायिक ब्रह्मचर्य अपेक्षित नाही. ब्रह्मचर्याचा अर्थ -मन, बुद्धी, विचार, सतत ब्रह्मज्ञानासाठी (म्हणजेच आत्मज्ञानासाठी) अभ्यस्त राहणे होय. अपरिग्रह म्हणजे परिग्रह न करणे. जास्त संचय/संग्रह न करणे.
 
 
नियम : यामध्ये व्यक्तिसापेक्ष नियमावली आहे, ज्याने व्यक्तिगत उन्नती होण्यास मदत होते. जसे - शौच, संतोष, तप, स्वाध्याय व ईश्वरप्रणिधान (म्हणजेच आंतरिक व बाह्यशुद्धी, समाधान, संतुष्ट, आत्मसाक्षात्कारासाठी सतत अभ्यस्त, स्व- मूळ तत्त्वाचा निरंतर अभ्यास व ईश्वराप्रति श्रद्धा, एकनिष्ठता) या दोन अंगांनी व्यक्ती योगसाधनेस योग्य होते. पण, नियमांचा सतत अभ्यास असावा.
 
 
आसन : विविध शरीरस्थितीत (स्थिर सुखासन) शरीर व मन शांत, ‘रिलॅक्स’ ‘स्ट्रेस फ्री’ ठेवण्याचे साधन.
 
 
प्राणायाम : श्वसनावर नियंत्रण आणण्याचे विविध प्रकार या प्राणायामाद्वारे साध्य होते. श्वसनावर नियंत्रण मिळविता आले की, चंचल मनाला स्थिर करणे, शांत करणे शक्य होते.
 
 
प्रत्याहार : सर्व इंद्रियांना अंतर्मुख करुन एकाग्रता मिळविणे. बाह्य विषयांमधून मनाला व इंद्रियांना वेगळे करून अंतर्मग्न करणे, मनाची स्थिरता साध्य करण्यास उपयोगी अंग.
 
 
धारणा : प्राणायामापर्यंत जी चार अंगं आहेत, त्यांना ‘बहिरंग योग’ म्हणतात प्रत्याहार ही ‘ब्रीज स्टेप’ आहे. ती पार केल्यावर ‘अंतरंग योग’ सुरु होतो. यातील धारणा, ध्यान व समाधी ही तीन अंग उपयुक्त आहेत.
 
 
धारणा : विचारांना नियंत्रित करणे खूप महत्त्वाचे आहे. विविध विषयांवर मन चटकन विचार करते. त्या मनाला एकाग्र करुन एका विशिष्ट विचारांवर, मंत्रावर, दृश्यावर स्थिर करणे, एकाग्र करणे, याचा अभ्याग धारणा या अंगामध्ये होते.
 
 
ध्यान : मन, चित्त एकाग्र झाले, बाह्य विषयांपासून परावृत्त झाले की, अंतर्मग्न होणे शक्य होते. इ. या पायरीमध्ये ईश्वर, शक्तीशी एकरुप होण्याचा प्रयत्न केला जातो., (Totally cut off from the reality/ surroundings)
 
 
समाधी : हा ‘अल्टिमेट गोल’ आहे. ईश्वरतत्त्वापर्यंत पोहोचण्याचा शेवटचा टप्पा. यात विलीन होणे, ईश्वरतत्त्वातच समरुप होणे, याप्रमाणे स्थूलातून सूक्ष्माकडे अष्टांग योगाद्वारे वाटचाल केली जाते.
 
 
(क्रमश:)

(लेखिका आयुर्वेदिक कॉस्मॅटोलॉजिस्ट व पंचकर्मतज्ज्ञ आहेत.)
९८२०२८६४२९
vaidyakirti.deo@gmail.com

-वैद्य कीर्ती देव
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121