सुषुम्ना नाडी : कृष्णविवर
जड-यम नियमांच्याही वर म्हणजे उणे असलेल्या त्या देहातीत कालावस्थेला भगवान वेदव्यास ‘काळ्या पाण्याची यमुना’ (यम+उना) म्हणतात. याच यमुनेवर (सुषुम्नेवर) भगवान गोपालकृष्ण खेळत असतात. ज्या साधकाला ‘गोपालकृष्ण’ व्हायचे आहे, त्याने यमुनेत डुंबलेच पाहिजे, तेव्हाच साधकातील गुप्त अशा शक्ती, गोप-गोपी रूपाने नटतील. विज्ञानात आज अशाच एका भयंकर अवस्थेचा शोध लागला आहे. आपल्या जगाच्या अंतावर काही कृष्णविवरे आढळली आहेत. सर्व वस्तुजातीची ही कृष्णविवरे भक्षण करतात. अनंत सूर्य, ग्रह एवढेच नव्हे, तर प्रकाशसुद्धा या विवरात स्वाहा केला जातो. एवढे प्रचंड सूर्यतारे, प्रकाशझोत सारेच एका महान शून्यात गडप होतात. असली कृष्णविवरे म्हणजे भयानक शून्यावस्था आहे. यालाच आपले ऋषिमुनी ‘भगवान काळ’ असे म्हणतात. सर्व जग या काळपुरुषात लीन होऊन मग पुन्हा तेथून भयंकर स्फोटाद्वारे सर्व जगांचा प्रपंच विस्तारतो. असे म्हणतात की, त्या विवरातील वातावरणात इतकी प्रचंड शक्ती असते की, त्यातील एक कण पृथ्वीच्या वजनाचा असतो, पण आकाराने मात्र ओतापेक्षाही सूक्ष्म. काय भयानक अवस्था ही? या अवस्थेचा सुषुम्ना प्रवेशाचे वेळेस साधकाला अल्पसा अनुभव येतो. भयानक वेगाने शक्ती शून्यात संचारते. तो वेग प्रकाशवेगापेक्षाही कितीतरी पटीने भयंकर असतो. साधक एकाच कालात, सर्व लोकात आणि सर्व अवस्थेत जात असतो. तो एकाच कालात भूत, वर्तमान, भविष्य काळात, एकाच स्थळी त्रिखंडात गमन करताना व सर्व अस्तित्वाचे भक्षण करणार्या शून्यावस्थेत असतो. भगवान काळ, कृष्णविवर! त्याची सोयीस्कर सुरुवात म्हणजे ‘शक्तिसवे संचरे मध्यमेमाजी’ होय. हे सत्य अनुभव वर्णन पलीकडील असल्यामुळे यापेक्षा अधिक सांगता यायचे नाही.
प्रकाशाचा वेग दर सेकंदाला १ लाख, ८६ हजार मैल असतो. वायुतत्त्वातील वेग एका क्षणात सर्व ब्रह्मांडाला वळसा घालून येणार असतो. या कल्पना नसून प्रत्यक्ष साधनेतील अनुभव आहेत. प्रख्यात वैज्ञानिक डॉ. आईनस्टाईन याचे मते, आपल्या ब्रह्मांडाला वळसा घालण्यास प्रकाशवेगाने गेल्यास ३५० कोटी प्रकाशवर्षे अवधी लागेल. अशी ३५० कोटी प्रकाशवर्षे सतत प्रवास केल्यास त्या प्रकाशाला आपल्या एकाच ब्रह्मांडाला वळसा घालता येईल. वायुतत्त्वातील साधकाचा अनुभव आणखी भयानक आहे, तो सर्व ब्रह्मांडाला एकाच क्षणात वळसा घालेल, काय हे शक्य आहे? होय, हा वायुतत्त्वातील साधकाचा प्रत्यक्ष अनुभव आहे. अशा भयानक अवस्थेत कोणतेच शरीर टिकत नाही. त्यामुळे असल्या अवस्थेतील साधक जीवात्मा नियत शरीराचा आपोआप त्याग करतो. म्हणजे लौकिक भाषेत त्याला मरण येते. तो मुक्त होतो. यापेक्षा अधिक वेग असल्यास काळ मागे सरतो. उदाहरण द्यायचे झाल्यास या वेगाने एखादी व्यक्ती या ब्रह्मांडाच्या अन्य टोकास गेल्यास तिला अनेक युगे तर लागणार नाहीत, पण त्या दूरदूरच्या स्थानी ती व्यक्ती अनंत युगे अगोदर जाऊन पोहोचेल. वेद या अवस्थेचे वर्णन करतात, ’ये अवाञ्चररताँ उ पराच आहुर्य। पराचस्ताँ उ अर्वाच आहु:॥’ म्हणजे जे जवळ आहेत ते अतिदूर आहेत, तर जे अतिदूर आहेत ते जवळ आहेत. मग विश्व केव्हा उत्पन्न झाले? केव्हाच नाही. मग जे दिसते ते काय आहे? सर्व आभास आहे. माऊली सांगतात, ’अगा जे जहालेची नाही. सर्व अनुभवांचे मूळ मनात असते.’
मन असेल तर अनुभव येतील. मनच जर लोप पावले असेल, तर कोणताच अनुभव येणार नाही. साधीच गोष्ट घ्या. आपण गाढ झोपलो असताना जवळ काय चालले आहे, याचा आपल्याला थांगपत्ता नसतो. तरी या गाढ अवस्थेत ‘मन’ नावाची अवस्था असते. सर्व जगाचे मूळ मनात आहे. मन आहे म्हणून विश्व आहे. मनाच्या निरनिराळ्या अवस्थांमुळे साधकास निरनिराळे अनुभव येतात. मनाचे अत्युच्च स्तर प्राप्त करणे साधनेचे परिफल आहे. मनाच्या साधारण अवस्थेवर जाणे म्हणजे ‘उन्मनी अवस्था’ होय. अशा उन्मनी अवस्थेत गेल्यावर नवनवी ज्ञानाची दालने आपोआप मोकळी होतात, मुक्त होतात. ती दिव्य दालने उघडी केल्यास साधकाला दिव्य अनुभव येतील. मुक्ताबाई म्हणतात, ‘मन मारुनि उन्मन करा। ताटी उघडा ज्ञानेश्वरा॥’ मन जसजसे एकाग्र करावे, तसतसे मन आपोआप सूक्ष्म व उच्चावस्था धारण करते. साधकांचे सर्व प्रकारचे अनुभव त्यांच्या एकाग्र अवस्थेचा परिपाक होय. समजा, एखादा दगड आपल्या समोर पडला आहे. बाह्यार्थाने तो निर्जीव आहे. पण, त्या दगडावर आपले मन, म्हणजे चित्त एकाग्र केल्यास तो निर्जीव गोटा अतिशय सजीव वाटेल. ज्या अणु-परमाणुपासून तो दगड बनला असेल ते अणु-परमाणु संच एकमेकांशी अतिशय प्रेमाने बंदिस्त झालेले आपणास दिसतील. अणुच्या आत डोकावल्यास असे दिसून येईल की, त्या अणुची धारणा भयंकर वेगाने धावणार्या ओतप्रोतांनी झाली आहे.
तो निर्जीव दगड आता सजीव ओतांचा गीत झंकार असलेला दिसेल. ओतांच्या सततच्या भ्रमणामुळे प्रत्येक परमाणु आता दिव्य संगीताची गायन शाळा भासेल. काय त्या निर्जीव जड दगडात संगीत आहे ? होय, दिव्य संगीत! त्या जड पत्थरात कधीच नष्ट न होणार्या अनाहत नादाची वीणा सतत झंकारलेली दिसेल. ही दिव्य ओत अवस्था आपतत्त्वातील असल्यामुळे त्याच आप अवस्थेतून सरणार्या-अप्सरा त्या दिव्य मनाचे साधकासमोर येऊन त्याला त्या दिव्यावस्थेचा मोह घालणार नाहीत का? याच अप्सरा साकारून तपस्व्यांच्या मागे लागत असतात. जो तापसी असल्या अप्सरांच्या मायेत सापडला, त्याची तपस्या म्हणजे साधना प्रगती भंगली नाही का? मेनका, उर्वशी, रंभा इत्यादी अप्सरा सर्व साधकांना त्यांच्या प्राप्त मनाच्या अवस्थेनुसार भाळण्याचा प्रयत्न करीत असतात. सर्व अवस्थांच्या प्रेमात फसणारा विश्व+मित्र मेनकेच्या प्रेमात म्हणजेच स्वत:च्या मनाच्या अवस्था बंधनात सापडून तपस्या भंग करतो. असल्या विश्वामित्राला पुन्हा तपस्या करावी लागते. गीता सांगते, ‘मन एवं मनुष्याणां कारणं बंध मोक्षयोः।’ मनाला येनकेनप्रकारे मोह घालणारी साधकाची अवस्था म्हणजे मेनका होय.
(क्रमशः)
योगिराज हरकरे
शब्दांकन : राजेश कोल्हापुरे