कोकणातील आंबा, काजू, फणस ही उत्पादने आणि त्यांच्यावर आधारित उद्योग हे तसे परंपरागत. याच परंपरागत व्यवसायाला आपल्या शिक्षणाची, तंत्रज्ञानाच्या कौशल्याची जोड देऊन कालसुसंगत व्यवसाय उभा करणे ही काळाची गरज आहे. हीच गरज ओळखून कोकणातील अतिशय दुर्गम, डोंगराळ खेड्यातसुद्धा ’शंतनु फ्रूट प्रॉडक्ट्स’च्या माध्यमातून उद्योजकतेचा वसा जपणारे आजचे उद्योजक राजेंद्र निमकर यांचा उद्योजकीय प्रवास उलगडणारा हा लेख...
राजेंद्र निमकर गुहागर तालुक्यातील अत्यंत दुर्गम अशा असोरे गावात गेली 27 वर्षे ’शंतनु फ्रूट प्रॉडक्ट्स’ हा त्यांचा व्यवसाय सांभाळत आहेत. हा संपूर्ण डोंगराळ भाग. तिथे अगदी रोजचे किराणा सामान जरी आणायचे झाले तरी चार ते पाच किलोमीटर चालण्याशिवाय गत्यंतर नाही. अशा ठिकाणी शिक्षणाने पशुवैद्यक (व्हेटर्नरी डॉक्टर) असलेला तरुण जातो आणि त्याच दुर्गमतेत आपला उद्योग उभा करतो आणि तो यशस्वीही करून दाखतो. हा राजेंद्र यांचा प्रवास थक्क करणारा आहे.
राजेंद्र शिक्षणाने पशुवैद्यक. पुण्यात राहून त्यांनी पशुवैद्यकीय शिक्षण घेतले. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर सर्वसाधारण मुलांसारखी या व्यवसायाची ‘प्रॅक्टिस’सुद्धा त्यांनी केली. या निमित्ताने त्यांना कोल्हापूर, निपाणी, बारामतीजवळचे वडगाव-निंबाळकर या ठिकाणी काम करण्याची संधी मिळाली. तरीसुद्धा मनात सातत्याने गावाची ओढ होतीच. तिथेच काहीतरी उद्योग सुरू करावा आणि तिकडेच राहावे हा विचार सातत्याने मनात येत होताच. तशातच वडिलांची आणि चुलत्यांचीसुद्धा तशीच इच्छा होती.
त्यामुळे त्यांच्या विचारांना घरातूनही बळ मिळाले. स्वतःचे स्वतंत्र अस्तित्व तयार करावे, चाकोरीबाहेरचे काम करावे, ही वृत्ती त्यांच्यात अंगभूत होतीच. त्याला घरच्यांचेही पाठबळ मिळाल्याने राजेंद्र यांनी 1989 साली आपली ‘प्रॅक्टिस’ सोडून परत असोरे गावचा रस्ता धरला. घरात तशी एका पिढीची व्यवसायाची पार्श्वभूमी होतीच. वडिलांचे किराणामालाचे दुकान होते. व्यवसाय करणे म्हणजे काहीतरी जगावेगळी गोष्ट आहे, खूप मोठी जोखीम आहे, असे मानण्याचा काही प्रश्नच नव्हता. त्यामुळे आता व्यवसायाच करणार, हे नक्की झाले. नेमका कशाचा व्यवसाय, या प्रश्नाचेही उत्तर लगेच मिळाले. कोकणातील प्रमुख उत्पन्न म्हणजे आंबा. बहुतांश कोकण या आंब्याच्याच उत्पन्नावर अवलंबून. मात्र, प्रत्येकवर्षी या पिकाच्या लहरीपणामुळे यापासून मिळणार्या उत्पन्नात कधीच स्थिरता नसते. यामुळेच या उत्पन्नाला कौशल्याची, नवीन तंत्रज्ञानाची जोड दिली पाहिजे, तरच यात स्थिरता येईल, हा विचार पक्का झाला आणि यातूनच बीज रोवले गेले ते ’शंतनु फ्रुट प्रॉडक्ट्सचे.’
याच काळात गुहागरचे आमदार तात्यासाहेब नातू यांनी कोकणातील मुले कोकणातच राहावीत. त्यांना इकडेच रोजगार उपलब्ध करून देता यावा, यासाठी प्रशिक्षण देण्याची दापोली कृषी विद्यापीठाला पत्र पाठवून विनंती केली होती. त्यांच्याच पुढाकाराने तिथे असे प्रशिक्षणाचे वर्ग सुरू करण्यात आले होते. ‘फ्रुट प्रोसेसिंग’च्या प्रशिक्षणाचे ‘शॉर्ट टर्म कोर्सेस’ विद्यापीठात सुरू करण्यात आले होते. याच कोर्सेसमधून राजेंद्र यांनी प्रशिक्षण घेतले. याआधीचे त्यांचे व्यवसायासाठीचे शिक्षण म्हणजे बाजारात कुठली नवीन ‘प्रॉडक्ट्स’ आहेत ती बघणे, ती ‘प्रॉडक्ट्स’ घरी आणून त्यांच्यासारखे ‘प्रॉडक्ट्स’ आपल्याला बनवता येईल का, याचा अभ्यास करणे. त्यात काही चांगले करता येतेय का, ते बघणे, याकडेच कल होता. कृषी विद्यापीठाच्या कोर्सनंतर त्याला एक दिशा मिळाली. ही सर्व पूर्वतयारी जय्यत झाल्यानंतर मग व्यवसायाचा श्रीगणेशा झाला.
राजेंद्र यांनी 1994 साली व्यवसाय सुरू केला. ‘शंतनू फ्रुट प्रॉडक्ट्स.’ आमरस, कोकम सरबत, आगळ, लोणची यांसारखी उत्पादने बनवण्यास सुरुवात झाली. कोकणातील फळांपासून तयार उत्पादने विकणे हा काही नवीन व्यवसाय नव्हता. याआधी ’योजक’च्या नाना भिडे यांनी ही उत्पादने लोकप्रिय केली होती. कोकम सरबतासारखी उत्पादने लोकप्रिय करण्याचे श्रेय त्यांनाच जाते. त्याचा फायदा असा झाला की, ‘शंतनु’सारख्या इतर अनेक कंपन्या बाजारात आल्या असल्या तरी त्यांना त्यांच्या उत्पादनाची नव्याने ओळख करून द्यावी लागली नाही.
गेल्या काही वर्षांत कोकणताही खूप सुधारणा झाल्या आहेत. 1988 साली वीज आली. 1994 साली गावात मुख्य फाट्यापासून कच्चा रस्ता आला. गावात गाडी यायला लागली तरी पुष्कळ सुधारणा होणे बाकी आहे. तरी या सर्व अडचणी ‘शंतनु’च्या प्रगतीआड आल्या नाहीत.
प्रारंभीच्या काळात राजेंद्र यांच्यासमोर पुष्कळ अडचणी उभ्या होत्या. गुहागर तालुक्यातील अतिशय दुर्गम भागात असोरे हे गाव वसलेले आहे. कुठल्याही सुविधा नीट उपलब्ध नव्हत्या. बस पकडायला जायचे तरी किमान दोन ते तीन किलोमीटर चालत जाऊन मग बस पकडायची. जवळचे सर्वात मोठे शहर म्हणजे रत्नागिरी तेही 60 किलोमीटरच्या अंतरावर. या अशा परिस्थितीत व्यवसाय करणे कुठल्या सामान्य माणसास अशक्यच वाटले असते पण राजेंद्र यांना त्यांच्या चुलत्यांनी एक कानमंत्र दिला होता. मुंबईतून लोक इथे गाड्या घेऊन येतात पण तू इथून गाडी घेऊन मुंबईत गेला पाहिजेस आणि राजेंद्र यांनी हे शब्दशः खरे करून दाखवले आहे.
सुरुवातीच्या काळात स्वतः मार्केटमध्ये जाऊन आपली उत्पादने विकण्यापासून काम करत करत त्यांनी ‘शंतनु फ्रुट प्रॉडक्ट्स’ला आता एक ब्रँड बनवले आहे. असोरेच नव्हे, तर पंचक्रोशीची ओळख बनवले आहे. या सर्व प्रवासात त्यांच्या मागे खंबीरपणे उभे राहून त्यांना साथ दिली ती त्यांच्या पत्नीने नमिता निमकर यांनी. त्यांनी पत्नी म्हणून घराची जबाबदारी सांभाळण्याबरोबर व्यवसायचीही जबाबदारी सांभाळली. राजेंद्र यांनी उचललेल्या प्रत्येक पावलात नमिता यांची साथ असते.
व्यवसायानिमित्त सतत बाहेरगावी जावे लागत असताना घरची तसेच फॅक्टरीचीही जबाबदारी त्या सांभाळतात. नवीन तंत्रज्ञान शिकून घेणे व्यवसायात त्याचा वापर करणे या गोष्टी राजेंद्र सातत्याने करत असतात. आता शंतनुचा व्यवसाय ठाणे, रायगड, कोल्हापूर, नाशिक, एवढा पसरत चाललेला आहे. जुन्या परंपरागत उत्पादनांबरोबरच नवीन नवीन उत्पादने घेण्यासही सुरुवात झाली आहे. सर्वच प्रतिकूल परिस्थितीवर मात करून स्वकर्तृत्वावर उद्योग उभा करून यशस्वीपणे तो सांभाळणार्या राजेंद्र निमकर यांना तसेच त्यांच्या ‘शंतनु फ्रुट प्रॉडक्ट्स’ला खूप शुभेच्छा.
- हर्षद वैद्य
बाबा आमटेंचे एक सुंदर वाक्य आहे की, ‘भान ठेवून योजना आखा आणि बेभान होऊन त्या राबवा.’ हा मंत्र कायम लक्षात ठेवला पाहिजे, असे राजेंद्र सांगतात. त्यामुळे कुठल्याही योजना-धोरणे त्याचे संपूर्ण भान ठेवून, सर्व साधकबाधक विचार करूनच आखले पाहिजे आणि एकदा का ही योजना आखली की, ती योजना सर्वकाही विसरून राबवलीदेखील पाहिजे. कुठलाही व्यवसाय हा कधीच सोपा नसतो. तो उभा करताना अनंत अडचणींना सामोरे जावे लागते. या अडचणींचा सामना केल्याशिवाय माणसाला खरंतर यशाची किंमतच कळत नाही. त्यामुळे न घाबरता, न डगमगता आपण काम केले पाहिजे, तरच यश मिळू शकते, असे राजेंद्र सांगतात. - राजेंद्र निमकर