अतिदुर्मीळ जेर्डन धाविक पक्ष्याचा सुगावा लागला; १२५ वर्षानंतर 'या' भागातून नोंद

    06-Sep-2025
Total Views |
Jerdons Courser




मुंबई (विशेष प्रतिनिधी) -
जगात केवळ भारतामध्येच आढळणारा अतिदुर्मीळ असणारा जेर्डन धाविक म्हणजेच जेर्डन कोर्सर या पक्ष्याचा शोध घेण्यात पक्षीनिरीक्षकांना यश मिळाले आहे (Jerdons Courser). आंध्रप्रदेशमधील श्री लंकमल्लेश्वर अभयारण्याच्या बाहेरील परिसरातून दि. २४ आॅगस्ट रोजी पक्षीनिरीक्षकांनी या पक्ष्याचा आवाज ध्वनीमुद्रित केला (Jerdons Courser). या पक्षीनिरीक्षकांमध्ये महाराष्ट्रातील पक्षीनिरीक्षकांचा देखील समावेश असून जवळपास १२५ वर्षांनंतर श्री लंकमल्लेश्वर अभयारण्याच्या बाहेरील परिसरातून या पक्ष्याची नोंद करण्यात आली आहे. (Jerdons Courser)
 
 
 
ब्रिटीश पक्षीशास्त्रज्ञ थाॅमस सी. जेर्डन यांनी गोदावरी आणि पेन्नार नदीच्या खोऱ्यातून १८४८ साली जेर्डन धाविक पक्ष्याच्या शोध लावला. जेर्डनच्या मते, हा पक्षी आंध्रप्रदेशमधील नेल्लोर, कडप्पा, भद्राचलम्, अनंतपू आणि महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यातील सिंरोचा येथे दिसत आहे. हा पक्षी या भागासाठी प्रदेशनिष्ठ असावा असा त्याचा कयास होता. १८७१ सालापर्यंत त्याच्या या कयासासंदर्भातील खात्रीलायक नोंदी मिळाल्या. मात्र, त्यानंतर तो कोणालाच दिसला नाही. त्यामुळे १९०० साली या पक्ष्याच्या समावेश नामशेष झालेल्या पक्ष्यांच्या यादीत करण्यात आला. १९८६ साली हा पक्षी आंधप्रद्रेशातील कडप्पा जिल्ह्यातील रेड्डीपल्ली या गावात पुन्हा सापडला. 'बाॅम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी'ने त्यावर अभ्यास करुन हा पक्षी केवळ आंध्रप्रदेशमधील श्री लंकमल्लेश्वर डोंगररागांच्या भागासाठीच प्रदेशनिष्ठ असण्याच्या जेर्डनच्या निष्कर्षावर शिक्कामोर्तब केले. साधारण १६ वर्षांपूर्वी श्री लंकमल्लेश्वर डोंगररागांच्या परिसरातून या पक्ष्याची शेवटची नोंद करण्यात आली होती. त्यांनतर आता या पक्ष्याचे अस्तित्व शोधण्यात पक्षीनिरीक्षकांना यश मिळाले आहे.
 
 
 
पक्षीनिरीक्षक हरीश थंगराज, आदेश शिवकर, शशांक दळवी, रोनिथ आणि प्रणव यांनी आंध्रप्रदेशमधील श्री लंकमल्लेश्वर अभयारण्याच्या बाहेरील प्रदेशामधून २४ आॅगस्ट रोजी या अतिदुर्मीळ पक्ष्याची नोंद केली. पक्षीनिरीक्षकांनी अभयारण्यापासून तीन ते चार किलोमीटरच्या परिसरात २३ आॅगस्टपासून या पक्ष्याला शोधण्यास सुरुवात केली. हा पक्षी निशाचर असल्यामुळे त्याचा शोध घेणे सायंकाळी सुरू होत असे. अखेरीस २४ आॅगस्ट रोजी रात्री ९.३९ वाजता या पक्ष्याच्या आवाज ध्वनीमुद्रित करण्यात पक्षीनिरीक्षकांना यश मिळाले. जगातील अतिदुर्मीळ आणि हरवलेल्या दहा पक्ष्यांमध्ये जेर्डन धाविकचा समावेश होत असून जवळपास १६ वर्षानंतर त्याची नोंद करण्यात आली आहे. महत्त्वाचे म्हणजे १२५ वर्षानंतर श्री लंकमल्लेश्वर अभयारण्याच्या बाहेरील प्रदेशामधून या पक्ष्याची नोंद करण्यात आली आहे.
 
 
जेर्डन धाविकविषयी...
जेर्डन धाविक हा पक्षी दिवसा फिरणारा नसून तो रात्री भटकतो. बाकीचे धाविक हे ओसाड माळरानात राहतात. मात्र, जेर्डन धाविक हा झुडपी जंगल पसंत करतो. अंजन, करवंद, बोर आणि खुरटे विरळ झुडपे व झाडोरा असणाऱ्या प्रदेशात तो वावरतो. त्याचे मुख्य अन्न हे वाळवी आणि इतर छोटे किडे आहेत. झुडपी जंगलाच्या ऱ्हासामुळे हा पक्षी अतिदुर्मीळ होऊन बसला आहे.