मुंबई (विशेष प्रतिनिधी) - नाशिकच्या नांदूरमधमेश्वर पक्षी अभयारण्यामधून प्रथमच पाणमांजर म्हणजेच आॅटर या सस्तन प्राण्याची नोंद करण्यात आली आहे (nandur madhmeshwar bird sanctuary). शनिवार दि. ६ सप्टेंबर रोजी पक्षीनिरीक्षकांना हा प्राणी जलाशयात पोहताना दिसला (nandur madhmeshwar bird sanctuary). या नोंदीमुळे रामसर पाणथळ जागेचा आंतरराष्ट्रीय दर्जा मिळालेल्या नांदूरमधमेश्वर अभयारण्याच्या जैवविविधतेत भर पडली आहे. (nandur madhmeshwar bird sanctuary)
नांदूरमधमेश्वर हे पक्षी स्थलांतराच्या सेंट्रल एशियन फ्लायवे या आकाशमार्गामधून होणाऱ्या पक्ष्यांच्या स्थलांतराकरिता महत्वाचे पाणथळ क्षेत्र आहे. याठिकाणी पक्ष्यांच्या ३०० हून अधिक प्रजातीचे पक्षी आढळतात. त्यापैकी जवळपास १५० हून अधिक प्रजातीचे पक्षी हे स्थलांतरित आहेत. ११० वर्षांपूर्वी ब्रिटीशांनी बांधलेल्या या धरणाची पाणी साठवण्याची क्षमता हळूहळू कमी होत गेली. धरणाच्या मागील जलाशयात वर्षानुवर्ष गाळ साचत राहिला आणि विकसित झाली ती पक्ष्यांसाठी समृद्ध अशी पाणथळ जमीन. ही पाणथळ जमीन विविध स्थलांतरी पक्ष्यांसाठी ओळखली जाते. मात्र, पाणथळीमुळे याठिकाणी पाण्यात अधिवास करणाऱ्या सस्तन प्राण्यांची विविधताही नांदत असल्याचे पाणमांजराच्या दर्शनामुळे आता समोर आले आहे.
शनिवारी अभयारण्यात पक्षीनिरीक्षण करत असताना पक्षीनिरीक्षक विकास श्रीवास्तव यांना पाणमांजराचे दर्शन झाले. त्यांनी लागलीच या पाणमांजराचे छायाचित्र टिपले. यापूर्वी कधीही नांदूरमधमेश्वर पक्षी अभयारण्यात पाणमांजराचे दर्शन न झाल्याची माहिती स्थानिक पक्षीनिरीक्षक गंगाधर आघावा यांनी दै. मुंबई तरुण भारतशी बोलताना दिली. हे पाणमांजर स्मूथ काॅटेड आॅटर या प्रजातीचे आहे. पाणमांजराची ही प्रजात नद्या आणि तलावांमध्ये आढळते. समूहाने राहते. आपल्या हद्दीबाबत हा प्राणी प्रचंड संवेदनशील असतो. मलमूत्राव्दारे तो आपली हद्द आखून घेतो. हद्दीच्या संरक्षणार्थ प्रसंगी हिंस्त्र देखील होतो. या पाणमांजरांचे प्रमुख खाद्य हे मासे असले, तरी कोळंबी, खेकडे, बेडूक, निवटी आणि काही वेळा छोट्या पक्ष्यांवर तो आपली गुजराण करतो. कांदळवनांमध्येही स्मूथ काॅटेड पाणमांजरं राहतात. प्रसंगी ही पाणमांजर समुद्रामार्गे पोहून दुसऱ्या खाड्यांमध्ये स्थानिक स्वरुपाचे स्थलांतर देखील करताना दिसतात.