मुंबई (विशेष प्रतिनिधी) - सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्गातील ओमकार नामक टस्कर हत्तीने रविवारी पहाटे गोव्यात प्रवेश केला आहे (dodamarg omkar tusker). या हत्तीने काही महिन्यांपूर्वी सिंधुदुर्गातील एका शेतकऱ्याला ठार केले होते (dodamarg omkar tusker). त्यामुळे वन विभागाने याला पकडण्याचे ठरवले होते (dodamarg omkar tusker). मात्र, आता हा हत्ती गोव्यातील मोपा गावात दाखल झाला असून तो तिथून पुढचा प्रवास करतो की, पुन्हा दोडामार्गात परततो हे पाहण्याजोगे ठरणार आहे (dodamarg omkar tusker).
सध्या सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर मिळून आठ रानटी हत्तींचा वावर याठिकाणी आहे. यामधील काही हत्ती हे चंदगड, आजरा या भागात असून काही हत्ती हे दोडामार्ग तालुक्यात आहे. ओमकार नामक निमवस्यक हत्ती हा कळपापासून वेगळा झाला असून तो स्वतंत्रपणे वावरत आहे. या हत्तींमुळे होणारी पिकनुकसानी ही मोठ्या प्रमाणावर आहे. या हत्तीने ९ एप्रिल रोजी दोडामार्ग जिल्ह्यातील मोर्ले गावातील ६५ वर्षीय शेतकरी यशवंत गवस यांना ठार केले होते. गवस काजू बागेत फेरफटका मारण्यासाठी गेला असता, त्याठिकाणी ओमकारने त्यांच्यावर हल्ला करुन जागीच त्यांना ठार केले होते. या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या मागणीनंतर वन विभागाने या हत्तीला पकडण्याचे आदेश होते.
गेल्या पाच महिन्यात वन विभाग या हत्तीला पकडू शकलेले नाहीत. सिंधुदुर्ग वन विभागाने या हत्तीला पकडण्यासाठी कर्नाटक वन विभागाला विनंती केली होती. त्यावेळी कर्नाटक वन विभागाने या हत्तीला पकडून देण्याची विनंती मान्य केली होती. मात्र, या हत्तीला कर्नाटकात हलवण्यासाठी ते तयार नव्हते. सिंधुदुर्ग वन विभागानेच हत्ती कॅम्प तयार करावा, अशी त्यांची मागणी होती. मात्र, अशातच या हत्तीने आता गोव्यात प्रवेश केला आहे. दोडामार्ग वन विभागाच्या हत्ती पथकाने रविवारी पहाटे या हत्तीला मोपा विमानतळाच्या मागील बाजूच्या जंगलात प्रवेश करताना पाहिले. त्यानंतर साधारण सकाळी ६.४५ वाजता हा हत्ती मोपा गावाच्या दिशेने गेला. सायंकाळी ६.४५ वाजता या हत्तीला मोपामधील वेताळाच्या मंदिराजवळ पाहण्यात आले. रात्री ८.१५ वाजता हा हत्ती मोपा विमानतळामागे असणाऱ्या जंगलात गेला. ओमकार नामक हा हत्ती निमवयस्क असून त्याच्या जन्म सिंधुदुर्गातच झाला आहे.