गोंदिया - 'ट्रान्समीटर'धारी सारस पक्ष्याची वीण यशस्वी; घरट्याबाबत महत्त्वाची अपडेट

    15-Sep-2025
Total Views |
satellite tagged sarus



मुंबई (अक्षय मांडवकर) -
'बाॅम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी'ने (बीएनएचएस) गोंदिया जिल्ह्यात ट्रान्समीटर लावलेल्या सारस पक्ष्याच्या जोडीने यंदाच्या विणीच्या हंगामात यशस्वी प्रजनन केले आहे (satellite tagged sarus). या जोडीने दोन पिल्लांना जन्म दिला असून ती पिल्ले अंड्यातून बाहेर देखील पडली आहेत (satellite tagged sarus). दरम्यान गेल्या ११ महिन्यांमध्ये ही जोडी भंडारा जिल्ह्यातच वावरली आहे (satellite tagged sarus).

राज्यात केवळ गोंदिया आणि भंडाऱ्यात जिल्ह्यामध्येच सारस पक्षी आढळतो. हा पक्षी जगातील सर्वात उंच पक्षी आहे. वन विभाग आणि 'सस्टेनिंग एनव्हायरमेंट अँड वाईल्डलाईफ असेंबलाज' (सेवा) या संस्थेने यंदा केलेल्या सारस गणनेनुसार भंडारा आणि गोंदिया मिळून केवळ ३४ सारस पक्ष्यांची नोंद करण्यात आली आहे. ही संख्या चिंताजनक आहे. 'बीएनएचएस'च्या शास्त्रज्ञांनी २०२४ मध्ये १२ ते १५ नोव्हेंबर रोजी गोंदियात तपशीलवार सर्वेक्षण करुन सारस पक्ष्याचा मागोवा घेतला होता. त्यामधील वीण हंगाम यशस्वीरित्या पूर्ण करुन दोन पिल्लांसोबत फिरणारी सारसची जोडी हेरुन त्यामधील मादी पक्ष्याला 'जीपीएस-जीएसएम ट्रान्समीटर' बसविण्यात आले होते. शिवाय दोन पिल्लांना पकडून त्यांच्या पायात सांकेतिक क्रमांक असणारी रिंग लावण्यात आली. मात्र, दरम्यानच्या काळात या दोन पिल्लांमधील एक पिल्लाचा विजेच्या तारेला धडकून मृत्यू झाला.

त्यानंतर सारसच्या जोडीसह एक पिल्लू गोंदिया जिल्ह्यातील पाणथळ क्षेत्रात फिरत होते. यंदाचा सारस पक्ष्यांचा विणीचा हंगाम जवळपास संपुष्टात आलेला आहे. हे पक्षी धानाच्या म्हणजेच भातशेतीमध्ये आपले घरटे बांधतात. अशातच टॅग केलेल्या या जोडीने जुलै महिन्यात दासगावमधील एका धानाच्या शेतामध्ये आपले घरटे तयार केले होते. त्यामध्ये दोन अंडी घातली होती. आॅगस्ट महिन्यात या अंड्यामधून यशस्वीरित्या दोन पिल्लं बाहेर आली असून त्या लहान पिल्लांसोबत सध्या ही जोडी जवळच्या भागातच फिरत आहे. बऱ्याचवेळा 'जीपीएस-जीएसएम ट्रान्समीटर' लावलेले पक्षी प्रजनन करु शकतात का, याविषयी शंका उपस्थित केली जाते. मात्र, या विणीमुळे अशा स्वरुपाच्या शंकेचे निरसरण होण्यास मदत मिळू शकते.


विणीच्या जागांचे महत्व अधोरेखित
टॅग लावलेल्या सारस पक्ष्याने गेल्यावर्षी या धानाच्या शेतात घरटे बांधले होते तिथूनच ५० मीटर अंतरावर यंदा देखील घरटे बांधले होते. त्यामुळे विशिष्ट जोडी दरवर्षी एकाच ठिकाणी घरटे बांधत असल्याने त्यांच्या या विणीच्या पाणथळ जागा वाचवणे किती महत्त्वाचे आहे, हे यावरुन आमच्या लक्षात आले आहे. गेल्या ११ महिन्यात ही जोडी जास्तीत जास्त ९ किलोमीटरच्या परिसराचा वापर आपल्या वावरासाठी करत आहे. - डॉ. पी. सथियासेल्वम, वरिष्ठ शास्त्रज्ञ, बीएनएचएस

'जीपीएस- जीएसएम' यंत्रणा म्हणजे काय?
पक्षी स्थलांतर अभ्यासाच्या आंतरराष्ट्रीय नियमांनुसार पक्ष्यांवर लावले जाणारे उपकरण त्यांच्या वजनाच्या २ टक्के असणे अपेक्षित आहे. ’जीपीएस’ आणि ’जीएसएम’ यंत्राचे वजन हे अनुक्रमे ३.५ ग्रॅम आणि १० ग्रॅम असते. त्यामुळे हे उपकरण लावण्यासाठी मोठ्या पक्ष्यांची निवड केली जाते. या दोन्ही उपकरणांमुळे वायरलेस पद्धतीने पक्ष्यांच्या स्थलांतरादरम्यानची माहिती संशोधकांना मिळते. ’जीपीएस’ उपकरणामुळे पक्ष्याचा स्थलांतरादरम्यानचा वेग, समुद्रसपाटीपासूनची उंची आणि भौगोलिक स्थानाची माहिती मिळते, तर अत्याधुनिक ’जीएसएम’ उपकरणामुळे वर नमूद केलेल्या तीन गोष्टींबरोबरच स्थलांतरादरम्यानचा कोनीय वेग, वार्याचा दबाव, स्थलीय चुंबकत्व, प्रकाशाची तीव्रता आणि तापमानाची माहिती मिळण्यास मदत होते. सौर उर्जेवर हे उपकरण चालते. नेटवर्क न मिळाल्यास त्या ठिकाणांचे संचयन करुन नेटवर्क आल्यानंतर ती माहिती ही यंत्रे संशोधकांपर्यंत पोहोचवतात.