मुंबई (विशेष प्रतिनिधी) - पक्षीमित्रांचे संघटन असलेली महाराष्ट्र पक्षिमित्र या संस्थेचे ३८ वे पक्षीमित्र संमेलन अमरावतीमध्ये पार पडणार आहे (pakshimitra sammelan). १ आणि २ नोव्हेंबर, २०२५ दरम्यान या संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे (pakshimitra sammelan). अमरावती येथील वन्यजीव व पर्यावरण संवर्धन संस्था (वेक्स) यंदाच्या संमेलनाची यजमान असून संस्थेच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त संमेलन अमरावतीमध्ये पार पडणार आहे (pakshimitra sammelan).
राज्यात चार दशकांपासून महाराष्ट्र पक्षीमित्र ही संस्था कार्यरत आहे. पक्षी मित्रांचे संघटन, पक्षी अभ्यास, पक्षी संवर्धन व जनजागृती यासाठी ही संस्था काम करत आहे. पक्षिमित्रांचे संघटन व पक्षी विषयक घडामोडींचे आदान प्रदान व्हावे या उद्देशाने महाराष्ट्र पक्षिमित्रतर्फे दरवर्षी राज्यस्तरीय तसेच वेळोवेळी विभागीय स्तरावर पक्षिमित्र संमेलने होत असतात. अशा प्रकारचे संघटन आणि संमेलने घडवून आणणारे महाराष्ट्र हे देशातील एकमेव राज्य आहे. या वर्षीचे ३८ वे महाराष्ट्र पक्षिमित्र संमेलन अमरावती येथील वन्यजीव व पर्यावरण संवर्धन संस्था (WECS) या संस्थेच्या यजमानपदाखाली अमरावती येथे होणार आहे. वेक्स ही संस्था पक्षी अभ्यास, वन्यजीव संशोधन व पर्यावरण जनजागृतीसाठी विदर्भात कार्यरत असून यावर्षी संस्थेच्या स्थापनेस २५ वर्षे पूर्ण होत आहेत. या रौप्यमहोत्सवी वर्षाचे औचित्य साधून यावर्षी अमरावती येथे पक्षिमित्र संमेलनाचे आयोजन करण्याचे संस्थेतर्फे ठरविण्यात आले होते. त्या अनुषंगाने महाराष्ट्र पक्षिमित्र कडून मान्यता प्राप्त झाल्याने आगामी ३८ वे संमेलन अमरावती येथे होणार हे निश्चित झाले आहे.
रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त वेक्स तर्फे ऑक्टोबर २०२५ ते ऑक्टोबर २०२६ दरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्याचे वेक्सच्या नुकत्याच पार पडलेल्या कार्यकारिणी सभेत निश्चित करण्यात आले आहे. तसेच ३८ वे पक्षिमित्र संमेलन हे भव्य स्वरुपात आयोजित करायचे असल्याने त्यास अखिल भारतीय स्तरावरून सुद्धा सहभाग व्हावा याचा प्रयत्न केला जाणार आहे. त्यामुळेच यावर्षीचे संमेलन हे तिसरे रे अ.भा. संमेलन सुद्धा होणार आहे. दोन दिवस चालणाऱ्या या संमेलनात विविध चर्चासत्रे, सादरीकरणे, परिसंवाद, प्रकट मुलाखत व राज्याबाहेरील सहभागींचे बहुभाषिक सत्राचे आयोजन करण्यात येणार आहे. या संमेलनाचा भाग म्हणून शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे “विद्यार्थी पक्षिमित्र संमेलन” विद्यार्थ्यांच्या विविध स्पर्धा, तसेच पक्षी छायाचित्र स्पर्धेचे आयोजन करण्याचे सुद्धा निश्चित करण्यात आले आहे.
संमेलनाच्या उद्घाटन कार्यक्रमामध्ये महाराष्ट्र पक्षिमित्रतर्फे दिले जाणारे पुरस्कार तसेच विविध स्पर्धांचे पुरस्कार इ. चे वितरण सुद्धा करण्यात येणार आहे. पक्षीविषयक पुस्तकांचे प्रकाशन सुद्धा होणार आहे. संमेलनाला जोडून आधीच्या दिवशी पक्षी या विषयावर कार्यशाळा तसेच संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी मेळघाट सहलींचे आयोजन सुद्धा करण्यात येणार आहे. या संमेलनास राज्यातून तसेच राज्याबाहेरील सुमारे ३०० प्रतिनिधी यांची उपस्थिती अपेक्षित असून संमेलनाची व सबंधित कार्यक्रमांच्या नोंदणी बाबतची माहिती महाराष्ट्र पक्षिमित्र च्या वेबसाईट www.pakshimitra.org वर तसेच विविध माध्यमातून उपलब्ध करून देण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी आयोजक वेक्स या संस्थेशी 9834912904, 9923910034 या क्रमांकावर संपर्क साधता येईल.