बल्लारशाह-गोंदिया रेल्वे मार्गावर पुन्हा वन्यजीव अपघात; वन विभाग किती प्राण्यांच्या मृत्यूची वाट पाहणार ?

    08-Sep-2025
Total Views |
balharshah-gondia railway line



मुंबई (विशेष प्रतिनिधी) -
बल्लारशाह -गोंदिया रेल्वे मार्गावर लोहार येथे सोमवार दि. ८ सप्टेंबर रोजी सांबराच्या पिल्लाचा मृतदेह आढळला (balharshah-gondia railway line). या अपघातामुळे या महारामार्गावर यंदाच्या वर्षात मृत्यू पावलेल्या वन्यजीवांचा संख्या सात झाली आहे (balharshah-gondia railway line). दिवसागणिक हा रेल्वे मार्ग वन्यजीवांसाठी धोक्याचा ठरत असून वाघाचा मृत्यू झाल्यावरच वन विभाग जागे होणार आहे का, असा सवाल स्थानिक वन्यजीवप्रेमी करत आहेत. (balharshah-gondia railway line)
 
 
लोहार येथील वनविकास महामंडळाच्या कक्ष क्रमांक १० येथे सांबराच्या पिल्लू हे रेल्वे रुळावर मृतावस्थेत सापडले. मध्यरात्री १.३९ वाजता चेन्नई सेंट्रल सुपर फास्ट एक्सप्रेसच्या धडकेत सांबराच्या पिल्लाचा मृत्यू झाला. वन विभागाकडून घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी हॅबिटॅट कॉन्झर्वेशन सोसायटीचे अध्यक्ष दिनेश खाटे, अमित देशमुख, अंकित बाकडे, अभिषेक गजभिये, राहील अली आणि वनविकास महामंडळाचे वनक्षेत्र सहाय्यक खडगी उपस्थित झाली. त्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदन केले. बल्लारशाह- गोंदिया रेल्वे मार्गावर यंदा सात वन्यजीवांना आपला जीव गमवावा लागला असून त्यामध्ये तीन अस्वल, तीन सांबर आणि एका रानगव्याचा समावेश आहे. नागपूर हायकोर्टात या रेल्वे रुळासंदर्भात खटला सुरु असून, वनविभागाकडून उत्तर न आल्याने न्यायालयाने वन विभागाला चांगलेच फटकारले आहे.
 
 
बल्लारशाह- गोंदिया रेल्वे मार्ग हा ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या लगतच आहे. वाघांचा भ्रमण मार्गाचा एक भाग सुद्धा आहे. कावल अभयारण्य, उमरेड- कऱ्हांडला अभयारण्याच्या वन्यजीव भ्रमण मार्गात हा रेल्वे मार्ग येतो. हाच रेल्वे मार्ग पुढे बालाघाट- नैनपूर मध्य प्रदेशमधून जातो. त्याठिकाणी तिथल्या रेल्वे प्रशासनाने वन्यजीवांसाठी उपाय योजना म्हणून अंडर पासेस आणि ओव्हर पास बांधले आहे. मग महाराष्ट्रात रेल्वे प्रशासनाकडून वन्यजीवांसाठी उपाय योजना का करण्यात आलेल्या नाही, आणखी किती वन्यजीवांचे बळी गेल्यावर रेल्वे प्रशासनाला जाग येणार आहे, असा प्रश्न दिनेश खाटे यांनी उपस्थित केला आहे. २०१८ साली बल्लारशाह-गोंदिया रेल्वे मार्गावर वाघाच्या तीन बछड्यांचा मृत्यू झाल्यानंतर वन विभाग आणि रेल्वे प्रशासन यांची संयुक्त बैठक झाली. या बैठकीनंतर वनक्षेत्रामधून जाणाऱ्या रेल्वेचा वेग ४० किमी प्रति तास करण्यात आला. मात्र, याची अंमलबजावणी फार काळ झाली नाही. सध्या या मार्गावरुन १०० तास प्रति किमी याच वेगाने रेल्वे धावते. त्यामुळे गव्यासारख्या मोठ्या प्राण्याचा देखील रेल्वेच्या धडकेत जागीच मृत्यू होतो.