मुबई (विशेष प्रतिनिधी) - कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यातील तिलारीच्या जंगलामधून केशरी रंगाच्या मलबारी चापडा म्हणजेच मलबार पीट व्हायपरची नोंद करण्यात आली आहे (malabar pit viper). दोडामार्गमधील निसर्ग अभ्यासक मकरंद नाईक यांनी या सापाची नोंद केली आहे (malabar pit viper). जगात केवळ पश्चिम घाटामध्ये आढळणारा हा साप सर्वसामान्यपणे हिरव्या रंगामध्ये आढळतो (malabar pit viper). महाराष्ट्र इतर रंगछटा असणारे या प्रजातीचे साप फार क्वचितच दिसतात (malabar pit viper).
भारतात पिट व्हायपरच्या ३१ प्रजाती आढळतात. त्यापैकी ९ या पश्चिम घाटात सापडतात. यांमधील बांबू, मलबार आणि हम्पनोज्ड या तीन प्रजाती या महाराष्ट्रात दिसतात. त्यामधील मलबार पीट व्हायपर हा केवळ पश्चिम घाटातच आढळते. मराठीत याला मलबारी चापडा म्हणतात. निशाचर असलेली ही प्रजात संथ असली तरी ती विषारी आहे. पीट व्हायपरच्या प्रजातींमध्ये डोळे आणि नाकाच्या मध्यभागी एक इंद्रिय असत. या इंद्रियाला पीट्स म्हणून ओळखल जात. अत्यंत संवेदनशील असणारे हे इंद्रिय या सापाला उष्ण रक्ताच्या प्राण्याचा दूरनच वेध घेण्यासाठी मदत करत. खास करुन रात्रीच्या वेळी शिकार करणारे हे साप या इंद्रियाचा वापर करुन इन्फ्रारेड रेडिएशनच्या मदतीने आपले भक्ष किंवा भक्षकाच्या आकाराचा मागोवा घेऊ शकतात. वर्षावन, सदाहरित आणि पानझडीच्या जंगलात राहणाऱ्या मलबारी चापड्याच्या अंगावरील वेगवेगळ्या रंगछटा म्हणजेच मॉर्फ हे विशेष लक्षवेधी ठरतात.
अशाच केशरी रंगाचा माॅर्फ असणारा मलबारी चापड्याची नोंद तिलारीच्या जंगलामधून करण्यात आली आहे. मलबारी चापड्यामध्ये हिरव्या, निळ्या, तपकिरी, केशरी अशा अनेक रंगछटा दिसतात. रंगांच्या या विविधतेला कलर पाॅलीक्रोमॅटिझम म्हणतात. कलर म्हणजे रंग आणि पाॅली म्हणजे अनेक आणि क्रोमॅटिझम म्हणजे रंगांमधील विविधता. या सापांमध्ये असलेल्या रंगछटांच्या विविधतेबद्दल सखोल अभ्यास झालेला नाही. मात्र, त्यामागे अनेक तर्क आहेत. सरपटणारे जीव हे एक्टोथर्मिक म्हणजेच शीत रक्तीय असतात. त्यांना आपल्या शरीराच्या तापमानाचे नियमन बाह्य स्त्रोतांच्या मदतीने करावे लागते. उदाहरणार्थ, सूर्यप्रकाश. मलबारी चापड्यामध्ये आढळणाऱ्या गडद रंगछटा या त्यांना अधिक उष्णता शोषून घेण्यास मदत करत असव्यात, असा एक तर्क आहे. तर आपल्या अधिवासात मिसळून जाण्यासाठी किंवा मिलन काळात एकमेकांना आकर्षित करण्यासाठी त्यांनी या रंगछटा विकसित करुन घेतल्या असाव्यात, असाही एक अंदाज आहे.