मुंबई (विशेष प्रतिनिधी) - जळगावातील पक्षीनिरीक्षकांनी भारतीय धाविक या पक्ष्यांच्या विणीचे निरीक्षण करुन महत्त्वपूर्ण नोंदी नोंदवल्या आहेत (indian courser bird). या निरीक्षणामुळे प्रजनन हंगामात भारतीय धाविक पक्ष्याचे नर आणि मादी मिळून अंडी उबवण्याची क्रिया आणि पिल्लांचे संगोपन करत असल्याचे ठोसरित्या सिद्ध झाले आहे (indian courser bird). तसेच शेणाशेजारी अंडी का देतात वा पिल्लांसाठी पाण्याची व्यवस्था कशी करतात यासंदर्भातील नोंदही त्यांनी केली आहे. (indian courser bird)
भारतीय धाविक हा तसा महाराष्ट्रभर तुरळकपणे आढळणारा पक्षी. जळगाव भागात या पक्ष्याच्या खूपच कमी नोंदी आहेत. त्यातच त्याच्या प्रजननावर देखील या भागात फार कमी अभ्यास झाला आहे. मात्र, जळगाव शहरानजीक भारतीय धाविक चांगल्या संख्येबरोबर त्यांचे प्रजननही या भागात होते. त्यामुळे वन्यजीव संरक्षण संस्थेच्या राहुल सोनवणे आणि प्रसाद सोनवणे यांनी सलग दोन वर्ष धाविक पक्ष्यांच्या चार जोड्यांचा विणीचा अभ्यास करुन त्यासंबंधीचे निरीक्षणे टिपली आहेत. ही निरीक्षणे इंडियन बर्ड्स या विज्ञान पत्रिकेत प्रसिद्ध झाली आहेत. या संशोधनासाठी त्यांना डॉ. सुधाकर कुऱ्हाडे, दीपक घाणेकर, जमीर शेख (उपवनसंरक्षक, यावल) यांचे मोलाचे मार्गदर्शन आणि मयुरेश कुलकर्णी, बाळकृष्ण देवरे, ध्रुव सोनवणे, मयुरेश सोनवणे, योगेश गालफाडे, चेतन भावसार यांचे सहकार्य लाभले.
धाविक पक्ष्यांचा मार्च ते मे महिन्यादरम्यान प्रजननाचा हंगाम असतो. राहुल आणि प्रसाद यांनी दोन प्रजनन हंगामात एकूण भारतीय धाविकाच्या चार जोड्यांचे निरीक्षण केले. यामध्ये धाविक पक्ष्याच्या प्रजनन सवयीच्या अभ्यासात अंड्यांची न बदलणारी संख्या (प्रत्येक घरट्यात दोन अंडे), नर आणि मादी दोघांचा अंडी उबावण्यात तसेच पिलांचे पालन पोषण यातील सहभाग, ब्रोकन विंग डिस्प्ले, खडतर हवामानाला तोंड देण्याची क्षमता, पालकांकडून पिल्लांसाठी केली जाणारी पाण्याची सोय, सर्व घरट्यांपाशी गुरांच्या शेणाचा वापर या बाबींची नोंद केली. शेणाशेजारी अंडी दिल्याने हे पक्षी त्यामध्ये झाकाळून जात असल्यामुळे शिकारी प्राण्यांसाठी त्यांचे संरक्षण होत असल्याचे निरीक्षण पक्षीनिरीक्षकांनी नोंदवले. तसेच पालक पक्षी हे आपल्या चोचीमध्ये साठवून पिल्लांसाठी दूरवरुन पाणी आणत असल्याचे निरीक्षणही त्यांनी टिपले. धाविक पक्ष्यांच्या प्रजनन सवयींच्या अभ्यासादरम्यान अंडी उबवण्याच्या प्रक्रियेत एका जोडीला अत्यंत प्रतिकूल हवामानाला सामोरे जावे लागले. यात अवकाळी पाऊस, गारपीट, वादळ, आणि दुपारचे रखरखीत ऊन अशा टोकाच्या हवामान स्थितीचा समावेश होता. अशा खडतर स्थितीतही या पक्ष्यांनी यशस्वीरित्या आपल्या अंड्यांचे रक्षण करून पिल्लांना जन्म दिला. परंतु धाविक पक्ष्याच्या एका जोडीने घरट्या लगत मानवी हालचाल सुरू झाल्यामुळे अंड्यांचा त्याग केला. म्हणजे थोडाही मानवी हस्तक्षेप या पक्ष्यांसाठी धोकादायक ठरू शकतो हे लक्षात येते.