मुंबई (विशेष प्रतिनिधी) - सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामध्ये व्याघ्र स्थानांतरणाची प्रतिक्षा अखेरीस संपली आहे (sahyadri tiger translocation). कारण ताडोबा आणि पेंच व्याघ्र प्रकल्पामधून सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात आठ वाघांच्या स्थानांतरणासाठी अखेर केंद्र सरकारच्या पर्यावरण, वन आणि हवामान बदल विभागाने हिरवा कंदील दाखवला आहे (sahyadri tiger translocation). याअंतर्गत पुढच्या काही महिन्यांमध्ये सर्वप्रथम वाघिणीचे स्थानांतरण करण्यावर भर दिला जाणार आहे. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात गेल्या पंधरा वर्षात केवळ वाघांचीच नोंद झाली आहे (sahyadri tiger translocation). त्यामुळे वाघिणीचे स्थानांतरण व्याघ्र प्रकल्पातील व्याघ्र वंशाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणार आहे. (sahyadri tiger translocation)
सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात सद्यपरिस्थीत तीन वाघ आहेत. यामधील एसटीआर-टी १ हा वाघ गेल्या दीड वर्षांहून अधिक काळ व्याघ्र प्रकल्पात ठिय्या मांडून आहे. व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्रफळ पाहता याठिकाणी २७ वाघांचा घरोबा होऊ शकतो. मात्र, दक्षिणेच्या बाजूने वाघांच्या नैसर्गिक स्थलांतराचे अल्प प्रमाण पाहता २०२२ साली या प्रकल्पात विदर्भातील व्याघ्र प्रकल्पामधून वाघांचे स्थानांतर करण्याचा निर्णय झाला. गेल्या चार वर्षांमध्ये स्थानांतरणाच्या अनुषंगाने सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामध्ये बऱ्याच तयारी करण्यात आल्या. ज्यामध्ये तृणभक्षी प्राण्यांचे स्थानांतरण, पिंजरा निर्मिती, वनकर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण इतर बाबींचा समावेश होता. मात्र, गेल्या वर्षभरापासून केंद्र सरकारच्या दरबारी व्याघ्र स्थानांतरणाची प्रक्रिया अडकली होती. अखेरीस गुरुवारी केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाच्या वन्यजीव विभागाने सह्याद्रीसाठीच्या व्याघ्र स्थानांतरणास मंजुरी दिली.
केंद्र सरकारकडून प्रधान मुख्य वनसंरक्षकांना पाठवलेल्या मंजुरी पत्रात आठ वाघांच्या स्थानांतरणास मंजुरी देण्यात आली आहे. ताडोबा आणि पेंच व्याघ्र प्रकल्प मिळून पाच वाघिण आणि तीन वाघांचे स्थानांतरण करण्यात येणार आहे. यासाठी चांदोली व्याघ्र प्रकल्पामध्ये सोनार्ली येथील गाभा क्षेत्रात विलग्नवासाचे पिंजरे तयार करण्यात आले आहेत. ताडोबा आणि पेंच प्रशासन सह्याद्रीमध्ये स्थानांतरणासाठी योग्य असलेल्या वाघांची निवड करुन त्याची माहिती सह्याद्री व्याघ्र प्रशासनाला देईल. त्यानंतर सह्याद्रीचे अधिकारी विदर्भात जाऊन वाघांची पाहणी करतील. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात तीन नर असल्याने सुरुवातीस वाघिणीचे स्थानांतरण करण्यास व्याघ्र प्रशासन आग्रही आहे. त्याठिकाणी वाघिणीला पकडून तिला रेडिओ काॅलर लावून सोनार्ली येथील विलग्नवासाच्या पिंजऱ्यात आणले जाईल. या पिंजऱ्यामध्ये काही दिवस ठेवून त्यानंतर तिला नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात येईल. नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यापूर्वी देखील कोणत्या वाघाच्या परिसरात तिला सोडायचे, याचा निर्णय घेण्यात येईल.
वाघिणीचे स्थानांतरण प्राथमिकता
सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात व्याघ्र स्थानांतरणाच्या दृष्टीने आम्ही संपूर्ण प्रक्रिया पूर्ण केली आहे. विलग्नवासाचे पिंजरे, वन कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण पूर्ण झाले आहे. प्रकल्पात सध्या वाघांचे अस्तित्व असल्याने आम्ही सुरुवातीस वाघिणीच्या स्थानांतरणाला प्राथमिकता देणार आहोत. - तुषार चव्हाण, क्षेत्र संचालक, सह्याद्री व्याघ्र प्रकल्प