यासिन मलिकचा खरा ‘मालिक’!

    20-Sep-2025
Total Views |

ज्या पक्षाची राजकारणातील मूल्ये केवळ सत्ता आणि स्वार्थ हीच राहिली असतील, त्या पक्षाची अधोगती झपाट्याने होते. आपल्याला सत्ता मिळत नसेल, तर देशात अराजक माजविण्यासही या पक्षाचे नेते मागेपुढे पाहत नाहीत, हे राहुल गांधी यांच्या कार्यशैलीवरून दिसतच आहे. अशा स्थितीत भारताची सूत्रे एका सच्चा राष्ट्रवादी नेत्याच्या हाती आहेत, हे भारताचे सुदैवच म्हणायला हवे.

भारत सरकारने बंदी घातलेल्या ‘जेकेएलएफ’ या फुटीरतावादी संघटनेचा नेता व काश्मिरी दहशतवादी यासिन मलिक याने नुकत्याच दाखल केलेल्या एका प्रतिज्ञापत्रामुळे, काँग्रेस सरकार आणि पाकिस्तानी दहशतवादी यांच्यात किती घनिष्ठ संबंध होते, ते उघड झाले आहे. या यासिन मलिकला तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी २००६ साली पंतप्रधान निवासस्थानी बोलावून मेजवानी दिली होती आणि त्याच्याशी काश्मीर समस्येवर चर्चा केली होती. आता मलिकच्या प्रतिज्ञापत्रानुसार मनमोहन सिंग यांनीच मलिकला हाफीज सईद याच्याशी चर्चा करण्यास पाठविले होते आणि अशी चर्चा केल्याबद्दल त्याचे आभारही मानले होते.

हाफीज सईद हा ‘लष्कर-ए-तोयबा’ या दहशतवादी संघटनेचा नेता भारतात घडविण्यात आलेल्या अनेक बॉम्बस्फोटांना जबाबदार होता. अशा या दहशतवाद्याशी मनमोहन सिंग यांना कसली चर्चा घडवून आणायची होती? पाकिस्तानने माजविलेल्या दहशतवादामुळे त्या देशाशी अधिकृत राजनैतिक बोलणी भारत सरकारने थांबविली होती. असे असले, तरी राजकीय क्षेत्रात आतल्या दाराने चर्चा सुरू असते. अगदी इस्रायलही गुप्त मध्यस्थांद्वारे ‘हमास’च्या नेतृत्वाशी बोलणी करीतच असतो, हा जगभर मान्यताप्राप्त मार्ग आहे. पण, ही चर्चा संबंधित सरकारशी सुरू असते. त्या देशाने पोसलेल्या दहशतवादी संघटनांशी सरकार चर्चा करू शकत नाही. असे असताना यासिन मलिक या एका दहशतवाद्यामार्फत, पाकिस्तानात राहणार्या हाफीज सईद या दुसऱ्या दहशतवाद्याशी भारत सरकारला कसली चर्चा करायची होती?

यावरून इतकेच दिसते की, मनमोहन सिंग सरकारचा ‘रिमोट’ भारतात नव्हताच, तर तो पाकिस्तानात होता. अर्थात मनमोहन सिंग हेच भारतात सोनिया गांधी यांच्या इशाऱ्यावर काम करीत असल्याने, ही चर्चा सरकारी स्तरावर नसून काँग्रेस पक्ष आणि दहशतवादी यांच्यात होत होती असे दिसते. काँग्रेसने चीनच्या कम्युनिस्ट पक्षाशी एक करार केला आहेच. तो कशासाठी आहे, हे त्या पक्षाने आजवर उघड केलेले नाही. त्याचप्रमाणे काँग्रेसला पाकिस्तानपुरस्कृत दहशतवाद्यांबरोबरही करार करायचा असेल. काँग्रेसचे गेल्या दहा वर्षांतील धोरण पाहिल्यास ते संयुक्तिकही वाटते. कारण, काँग्रेसमध्ये आता अशा देशद्रोही विचारसरणीच्या लोकांचीच भरती होत आहे आणि पक्षावरही त्यांचेच वर्चस्व दिसून येते. ‘ओव्हरसीज काँग्रेस’ या काँग्रेसच्या परदेशी संघटनेचे अध्यक्ष आणि राहुल गांधी यांचे गुरू सॅम पित्रोडा हे पुन्हा एकदा, एका वादग्रस्त विधानामुळे प्रसिद्धीच्या झोतात आले आहेत. "पाकिस्तान आणि बांगलादेशात गेल्यावर आपल्याला अगदी स्वगृही आल्यासारखे वाटते आणि आपल्याला तेथेच राहावेसे वाटते,” असे विधान त्यांनी केले. म्हणजे पाकिस्तान-बांगलादेशातील पराकोटीची गरिबी, धर्मांधता, राजकीय अस्थैर्य, भ्रष्ट सामाजिक स्थिती, हिंसाचार ही परिस्थिती आवडणाऱ्या व्यक्तीही जगात आहेत. अशा व्यक्तींना भारतातील सशक्त सरकार, राजकीय स्थैर्य आणि दिवसेंदिवस समृद्ध होत जाणारा देश पाहून घुसमटायला होणारच. डुकराला घाणीतच लोळायला आवडते. अशा व्यक्तींना स्वा. सावरकर यांनी भारतमातेचे केलेले ‘जे जे उत्तम, उदात्त, उन्नत, महन्मधुर ते ते’ असे वर्णन वाचून ओकारी येणारच. कारण, त्यांना भारतच नव्हे, तर भारतीयांचीही लाज वाटते. याच सॅम पित्रोडा यांनी गतवर्षी भारताच्या विविध प्रदेशांत राहणाऱ्या भारतीयांची तुलना आफ्रिकी, चिनी, अरबी वगैरे लोकांशी केली होती. ज्या व्यक्तीची समज आणि पिंडच भारतविरोधी आहे, त्याच्याकडून यापेक्षा वेगळी काय अपेक्षा करणार! हे देश जर पित्रोडा यांना इतके आवडत असेल, तर ते तेथेच का स्थायिक होत नाहीत, हे मात्र कोडचे आहे. कारण, ते राहतात इंग्लंड-अमेरिकेत. भारतातील घरभेद्यांविरोधात मोदी सरकारने कारवाईचा बडगा उचलल्यावर, आमिर खानची पत्नी किरण राव, सैफ अली खान, नसीरुद्दिन शहा यांच्यासारख्या काही भंपक सेलेब्रिटीजना भारतात असुरक्षित वाटू लागले होते. त्यांनीही भारत सोडून अन्यत्र राहण्याची भाषा केली होती पण, भारतीयांच्या दुर्दैवाने ही मंडळी अजूनही भारतातच ठाण मांडून बसली आहेत.

काँग्रेस आणि दहशतवाद यांचे नाते जवळचे आहे. काँग्रेसनेच जम्मू-काश्मीरमध्ये अब्दुल्ला कुटुंबीयांचे प्रस्थ वाढविले आणि काश्मीरला त्यांच्या हाती सोपविले. अब्दुल्लांच्या तिन्ही पिढ्यांनी काश्मीरचे भारतात विलीनीकरण करण्यास सदैव विरोध केला, प्रसंगी तेथील दहशतवादाचेही समर्थन केले. त्यांच्याच राजवटीत काश्मीरमध्ये दहशतवाद फोफावला होता आणि काश्मिरी पंडितांचे हत्याकांड आणि नंतर विस्थापन घडले होते. पण, घटनेतील ‘३७०’ आणि ‘३५ ए’ ही कलमे रद्द करण्याचे धैर्य केवळ मोदी सरकारच दाखवू शकते. त्या निर्णयाने काश्मीरला एकटे पाडण्याचे सारे कट मुळापासून उद्ध्वस्त झाले. काँग्रेसला भारतविरोधी संघटनांबद्दल असलेले विशेष प्रेम हे काश्मीरमधील दहशतवादाचे कारण होते. आपण भारतीय हवाई दलाच्या अधिकार्यांची हत्या केल्याचे, यासिन मलिकने ‘बीबीसी’ला दिलेल्या मुलाखतीत उघडपणे मान्य केले होते. अशा या मलिकला भारताचे पंतप्रधान आपल्या निवासस्थानी बोलावून, त्याला बिर्याणीची मेजवानी देतात आणि पाकिस्तानातील दहशतवाद्यांशी चर्चा करण्यास सांगतात, हे काँग्रेसच्या दहशतवादप्रेमाचे प्रमाण आहे. त्यामुळे यापुढे काँग्रेसच्या हाती देशाची सत्ता जाणे, हे देशाच्या सुरक्षेला सर्वांत मोठे आव्हान ठरेल.

उलट नरेंद्र मोदी यांचे सरकार सत्तेवर आल्यावर त्यांनी, काश्मीरमधील दहशतवादाचे कंबरडे मोडले. नोटबंदीसारखा महत्त्वपूर्ण निर्णय घेऊन, काश्मीरमधील दहशतवाद्यांना पाकिस्तानकडून होणारी आर्थिक मदत संपुष्टात आणली. इतकेच नव्हे, तर भारतात दहशतवादी कारवाया केल्यावर पाकिस्तानवर लष्करी हल्लेही चढविले. तरीही पाकिस्तानची रग जिरली नाही. त्याने जेव्हा पहलगाममध्ये पर्यटकांचे हत्याकांड केले, तेव्हा पूर्ण युद्धाची शयता गृहीत धरून ‘ऑपरेशन सिंदूर’ राबविले आणि पाकिस्तानची संरक्षणसिद्धताच नष्ट केली. पाकिस्तानसह चीनलाही आपल्या लष्करी ताकदीचे पाणी पाजल्यामुळे आज चीन शांत बसला असून, भारतापुढे मैत्रीचा हात पुढे करीत आहे. देशांतर्गत नक्षलवादी-माओवादी संघटनांचा दहशतवादही जवळपास संपुष्टात आणला. दहशतवादाला क्षमा करणे मोदी सरकारच्या तत्त्वात बसत नसल्याने, आज हा यासिन मलिक तुरुंगात असून त्याला होणाऱ्या शिक्षेची प्रतीक्षा करीत आहे. हा काँग्रेस आणि भाजप सरकारमधील फरक आहे.