रुपयापेक्षाही लहान ऑर्किडची महाराष्ट्रातून प्रथमच नोंद; जळगावातील सातपुड्यात दर्शन

    16-Sep-2025
Total Views |
orchid species



मुंबई (विशेष प्रतिनिधी) -
जळगावातील सातपुड्याच्या पर्वत रांगांमधून वनस्पती अभ्यासकांनी जीवक अमरी या ऑर्किडच्या प्रजातीची नोंद केली आहे (orchid species). ही वनस्पती प्रथमच महाराष्ट्रात सापडली असून यामुळे राज्यातील ऑर्किडच्या यादीत अजून एका प्रजातीची भर पडली आहे. (orchid species)
 
 
महाराष्ट्रात अमरीच्या साधारण १०७ प्रजाती आढळतात. ऑर्किडला अमरी किंवा यक्षपुष्प म्हणून संबोधले जाते. ऑर्किड हे वेगवेगळ्या ठिकाणी उगवतात. अमरीचे अस्तित्व ज्या जंगलात असते, ते जंगल उत्कृष्ट दर्जाचे मानले जाते. अमरींच्या दृष्टिकोनातून हिमालय आणि पश्चिम घाट अत्यंत संवेदनशील मर्मस्थळे मानली जातात. परंतु सातपुड्यात आढळणाऱ्या यक्षपुष्पांची संख्या ही लक्षणीय आहे. जीवक अमरीच्या नोंदीमुळे हे अधोरेखित देखील झाले आहे. जळगावातील वन्यजीव संरक्षण संस्थेचे प्रसाद सोनवणे, राहुल सोनवणे आणि पुण्याच्या नॅचरल हिस्ट्री एज्यु.अॅण्ड रिसर्च इन्स्टिट्यूटेचे मयुरेश कुलकर्णी यांनी महाराष्ट्रासाठी नवीन असेलल्या जीवक आमरीची नोंद केली आहे. या प्रजातीचे वनस्पती शास्त्रीय नाव हे क्रेपिडियम मॅकिंनोनी आहे. या नोंदीसंबंधीचा शोधनिंबंध नुकताच अॅनल्स आॅफ प्लांट सायन्सेस या विज्ञान पत्रिकेत प्रसिद्ध झाला आहे. या संशोधनाने महाराष्ट्राच्या समृद्ध यक्षपुष्पांच्या यादीत अजून एका अमरीची भर पडली आहे.
 
 
यक्षपुष्पाची ही प्रजात यापूर्वी उत्तराखंड, ओडिशा, राजस्थान, मध्यप्रदेश राज्यामधून नोंदविण्यात आली आहे. ती पश्चिम घाटात आढळत नाही. ती भू अमरी म्हणजे जमिनीवर उगवणाऱ्या अमरींपैकी एक आहे. जीवक अमरी ही सातपुड्यात डोंगर उतारांवर, जंगलातील ओलसर जागी, पालापाचोळ्यात वाढणारी अत्यंत छोटेखानी, जमिनीवर पसरलेली दोन ते तीन पाने असलेली ऑर्किड प्रजाती आहे. पानांच्या बेचक्यातून सुमारे २० सेमी उंचीचा पुष्प संभार उगवतो. पुष्पसंभारात अनेक फुले असतात. या वनस्पतीचा आकार जवळपास २० सेमी असून तिचे फुल अत्यंत सूक्ष्म पाच मिमी आकाराचे असते. ही वनस्पती अत्यंत लहान असल्यामुळे जंगलातील पालापाचोळ्यात सहसा नजरेसही पडत नाही. इतर ऑर्किड प्रमाणे हिच्या फुलातील लीप (खालची वैशिष्ट्यपूर्ण पाकळी) फुलाच्या वरच्या बाजूस असते. या वनस्पतीच्या अत्यंत छोट्या आकारामुळे हीचे जंगलातील झाड - झाडोऱ्यातील अस्तित्व लक्षात येत नाही. गुरेचराई, जंगलतोड, वनांवरील अतिक्रमण यामुळे या वनस्पतीचे अस्तित्व धोक्यात आले आहे.