जयपाल सिंह मुंडा ही वनवासी समाजातील एक मोठी असामी होऊन गेली. उच्च शिक्षण घेतलेले, वनवासींचे नेते आणि हॉकी या खेळात मेजर ध्यानचंद यांच्यासमवेत भारताच्या पहिल्या ऑलिम्पिक संघाचे कप्तानपदही त्यांनी भूषविले होते आणि भारताचे ते पहिले सुवर्ण पदक होते. तेव्हा, नुकत्याच झालेल्या त्यांच्या स्मरण दिनानिमित्त दोन भागांत त्यांचा जीवनपट उलगडण्याचा हा प्रयत्न. त्यातील आजचा पहिला भाग आणि दुसरा भाग पुढील सोमवारी, दि. ४ एप्रिल रोजी प्रसिद्ध होईल.
इसवी सनाच्या साधारणतः सतराव्या शतकापासून ते स्वातंत्र्योत्तर भारतात इसवी सनाच्या विसाव्या शतकापर्यंतच्या काळात, भारताची सर्व संघराज्ये सुस्थापित होईपर्यंत अनेक आंदोलने घडून गेली. त्या सगळ्या आंदोलनात इतर भागीदार आंदोलनकर्त्यांमध्ये तितकाच मोलाचा वाटा आहे, तो म्हणजे जनजाती समाजातील योगदान देणार्यांचा, जनजाती समाजातील स्वातंत्र्य सेनानींचा, जनजाती समाजातील संसदपटूंचा! एवढेच नव्हे तर देशाभिमानी जनजाती समाजातील क्रीडापटूंचा! हिंदू समाजात, मुख्यत्वे मुस्लीम आणि इसाई समाजांविरोधात एक प्रकारची घृणा उत्पन्न होताना आपण बघितली आहेच. त्यांची कार्यपद्धती आणि अनिष्ट कार्यांमधला त्यांचा सहभाग त्याला कारणीभूत असे. ब्रिटिशांच्या काळापासून ते आपण वाचले, ऐकले, तर अनेकांनी प्रत्यक्षात बघितले, अनुभवले असेल. अशा कटू अनुभवांबरोबर काही सुखद अनुभवही तेव्हाही व आजही येत असतात. यवन आणि इसाई म्हणजे ते सगळे वाईटच, असे नसल्याचा अनुभव यात आपल्याला आढळेल. भारतभूमीच्या इतर समाजांप्रमाणेच जनजाती समाजातदेखील पंथ, धर्म, जात, राजकीय विचारसरणी आणि भौगोलिक परिस्थिती या सगळ्यात जरी भिन्नता आढळून येत असली तरी या जनजाती समाजातील सगळ्या घटकांचा मूळ उद्देश, मूळ हेतू हा फक्त एकच दिसून येतो, तो म्हणजे देशभक्ती. जनजाती समाजात फक्त हिंदूच नव्हे तर मुसलमान, शीख अशा विविध धर्मीयांबरोबरीनेच ख्रिस्त धर्मीयांचाही सहभाग आहे. ख्रिस्त धर्मीयांमध्ये कोणी बळजबरीने, कोणी कोणत्याच धर्मात स्वारस्य नसल्याने, कोणी धनाच्या आमिषापोटी, कोणी पूर्वापार घराण्यातील इतरांमुळे चालत आलेली धर्मपरंपरा म्हणून, कोणी बालपणी झालेल्या शिकवणुकीने, असे काय काय अन् काय काय कारणांनी धर्मांतरित झालेले आपल्यास आढळते. असे जरी असले तरी त्यांचा मूळ उद्देश, मूळ हेतू, मूळ गाभा, मूळ आधार एकच आढळून येतो अन् तो म्हणजे भारतापोटी असलेली आस्था, देशाची आवड, देशप्रेम!
मेजर ध्यानचंद यांचे नाव सर्वांनाच सुपरिचित आहे. ’हॉकीचे जादूगार’ या नावाने जवळपास आपण सगळेच त्यांना ओळखतो. ध्यानचंद यांना प्रखर, निस्सीम देशभक्तांच्या मालिकेत गणले जाते. मेजर ध्यानचंद यांचा समकालीन असलेल्या एका जनजाती हॉकीपटूचे आपण आज येथे स्मरण करणार आहोत. इ. स. १९२८च्या संघात भारताला हॉकीमध्ये जगज्जेतेपद मिळवून देणार्या त्या संघात मोलाच्या स्थानी जनजाती खेळाडूचा समावेश असल्याचे आपल्याला गौरवाने आढळून येते. जनजाती समाजातील क्रीडापटूंच्या हॉकी समवेतच भारतीय क्रीडाविश्वातील सहभागाची मोजणी आपण करत बसलो आणि त्यांच्याबद्दल स्वल्पसे जरी उद्धृत करत बसलो, तर ती मालिका न संपणारी अशीच असेल. तेव्हा आपण आज या लेखात फक्त एकच असा क्रीडापटू विचाराधीन घेऊ की, जो भारताच्या पहिल्या हॉकीच्या संघात झळकला होता. त्या ज्येष्ठ हॉकीपटूचे नाव आहे, जयपाल सिंह मुंडा! सर्वप्रथम भारतीय हॉकी संघाचे कर्णधारपद भूषवलेले जनजाती समाजातील जयपाल सिंह मुंडा. ऑलिम्पिक हॉकीमध्ये ध्यानचंदजींसमवेतच नामोल्लेख करण्यासारखे एक नाव की, जे आज लोकांच्या स्मरणात कदाचित येतही नसेल तरीदेखील जे नाव सतत स्मरणात ठेवायलाच हवे, असे नाव म्हणजे जयपाल सिंह मुंडा! ध्यानचंद यांनी १९५२ मध्ये ’गोल’ हे आपले आत्मचरित्र लिहिले. त्या ’गोल’मध्ये ध्यानचंद यांच्यासारख्या महान व्यक्तीने आपल्या त्यावेळच्या कर्णधारावर म्हणजेच वनवासी असलेल्या जयपाल सिंह मुंडा यांच्यावर खूप प्रशंसनीय असे लिखाण केले. त्यांनी आपले निश्चित असे मत व्यक्त करत त्यात म्हटले आहे की, “विदेशातील हवामानाचे ज्ञान व अनुभव आणि आपला उच्चतम खेळ यामुळेच जयपाल मुंडा आमचे एक चांगले कर्णधार बनले होते. परंतु, नाईलाजाने नंतर त्यांना आपला खेळ सोडावा लागला. कारण, वांशिक भेदभाव आणि सांप्रदायिक राजकारण यांचे ते बळी बनले होते.”
वनवासींचे परमपूजनीय ’धरतीके आबा’ अर्थात भगवान बिरसा मुंडा यांचा जन्म रांची जिल्ह्यातील खुंटी येथील. ९ जून १९०० रोजी बंदिवासात असताना भगवान बिरसा मुंडा यांचे निधन झाले होते. आपण आज ज्यांचे स्मरण करत आहोत, त्या जयपाल सिंह मुंडा यांचा जन्म बिरसा मुंडा यांच्या मृत्यूपश्चात तीन वर्षांनी झाला. जयपालदेखील आज ओळखल्या जाणार्या झारखंड राज्यातील रांची जिल्ह्यातील खुंटी येथील. दि. ३ जानेवारी, १९०३ रोजी टपकारा येथील एका मुंडा जमातीच्या गावी जन्मले. प्रमोद पाहन हे जन्माच्या वेळचे त्यांचे नाव. त्यांची आई राधामुनी आणि वडील अमरु पाहन. किस्टोमनी नावाची त्यांना मोठी बहीण, तर जयश्री व रघुनाथ हे त्यांना धाकटे होते. शिवाय अन्य चार बहिणी त्यांच्यापाठी होत्या. संतोष कैरो लिखित ’द लाईफ अॅण्ड टाईम्स ऑफ जयपाल सिंह मुंडा’ या एका इंग्रजी पुस्तकात जयपाल सिंह मुंडा यांच्या जयंत या मुलाने त्याच्या बिरेंद्र या भावाबरोबरच्या आपल्या आठवणी कथन केल्या आहेत. त्या पुस्तकात जयपाल सिंह मुंडा यांच्या शब्दातच त्यांचे नाव कसे पडले व जन्म कधी झाला, याचा उल्लेख केलेला आढळतो. “माझे नाव प्रमोद पहान, अमरु पहान यांचा पुत्र. जयपाल सिंह असे माझे नाव कसे बदलले, ते मला कळलेच नाही. जेव्हा माझे वडील मला रांचीच्या ‘सेंट पॉल्स शाळे’त दाखल करायला घेऊन गेले होते, तेव्हाची ३ जानेवारी, १९११ हीच माझी जन्मतारीख म्हणून तेव्हापासून ओळखली जाऊ लागली. पलाना गावची माझी आई राधामुनी. ती सांगे की, माझा जन्म हिवाळ्यातला.” अश्विनी कुमार पंकज लिखित ’मरड गोमके जयपाल सिंह मुंडा’ या पुस्तकातही उल्लेख आहे की, “आमचे कुटुंब हे आदिवासी समाजातले. आमचे पूर्वज जनजाती समाजातले नाव धारण करत असत. वंशपरंपरागत चालत आलेले आमचे पूर्वीचे आडनावही मुंडा हेच होते. त्या काळी आदिवासींना दुय्यम वागणूक मिळे. आपल्याला जर गरिबीत जगायचे नसेल, आपल्या पुढच्या पिढीतल्यांना अनेक समस्यांना सामोरे जायचे नसेल, तर ख्रिस्तीधर्मात जातानाचे आपले नाव लपवून ठेवले पाहिजे, जेणेकरुन इतर वरच्या वर्गाप्रमाणे आपण होऊ आणि एकदा का आपण उच्चशिक्षण घेत आपला ठसा समाजावर पाडण्यायोग्य झालो की, मग आपण समाजाला दाखवून देऊ शकू की, आम्ही आदिवासी जनतादेखील मागे नाहीत. आम्ही आदिवासीदेखील सर्व क्षेत्रात मोठे होऊन दाखवू शकतो. तेव्हा तसे नसते केले, तर ’ऑक्सफर्ड ब्ल्यू’चे काय? तर अन्य साध्या साध्या गोष्टींमध्येही आपल्यात धमक असूनही चमकदार कामगिरी दाखवता आली नसती. जशास तसे करणे तेव्हा गरजेचेच होते. मला मुंडा नावाचा अभिमान आहे, तसाच अभिमान आम्ही आदिवासी जमातीतील असल्याचाही.” पुढे संसदेतही त्यांनी आदिवासींबद्दल गौरवोद्गार काढत त्यांचा पुरस्कारच केलेला आहे.
सधन कुटुंबात जन्माला येणे हे माणसाच्या प्रारब्धात असायला लागते. हे असे सौभाग्य जयपाल सिंह मुंडा यांच्या नशिबातच होते. जयपाल मुंडा यांनी आपल्या बाल्यावस्थेत त्यांच्या कुटुंबीयांसमवेतच ख्रिस्ती धर्म स्वीकारला होता. मिशनरी एसपीजी मिशन, चर्च ऑफ इंग्लंड आणि घरच्या सगळ्यांनी त्यांच्यातील प्रतिभा, त्यांच्यातील नेतृत्व गुण हे सारे ओळखलेच होते. गावातल्या सुरुवातीच्या शिक्षणानंतर जयपालला रांचीमधील ‘सेंट पॉल स्कूल’मध्ये दाखल करण्यात आले होते. प्राथमिक शिक्षणाबरोबरच त्यांच्या युवावस्थेतील आरंभीच्या काळात एक असाधारण अशी क्षमता असलेल्या हॉकीपटूच्या रूपात ते चमकू लागले होते. त्यांच्या मिशनरी प्रधानाचार्यांनी त्यांना उत्तेजन देत उच्च शिक्षणासाठी इंग्लंडच्या जगप्रसिद्ध ऑक्सफर्ड विश्वविद्यालयात त्यांना प्रवेश मिळवून दिला. जो संस्कार झाल्यावरच व्यक्ती खर्या अर्थाने ख्रिस्ती होते, असा ’बाप्तिस्मा’ हा ख्रिस्ती धर्मातील अत्यंत महत्त्वाचा व आवश्यक असा दीक्षाविधीचा संस्कार इंग्लंडमध्ये १९१८ मध्येे जयपाल मुंडावर करण्यात आला. ऑक्सफर्ड मुक्कामी असतानाच क्रीडा क्षेत्रात, विशेषतः हॉकीमध्ये ते वृत्तपत्र, क्रीडा मासिके, नियतकालिके अशांमध्ये स्तंभलेखक म्हणून ते नावारुपाला आले होते. ब्रिटिश पेपर जर्नल्समध्ये त्यांनी नियमितपणे लेखन सुरू केले होते. त्याच्या लेखांमधून ते वाचकांचे आवडते बनले. वादविवाद स्पर्धेत ते विजेते ठरत. हॉकी, फुटबॉल, क्रिकेट, रग्बी अशा अनेक क्रीडा प्रकारांत आपल्या शाळा-महाविद्यालयांचे ते प्रतिनिधित्व करत. त्याच काळात त्यांच्या हॉकीमधील क्रीडा कौशल्याला नीट आकार मिळू लागला होता. येथे जयपालला प्रतिभावान हॉकी खेळाडू म्हणून स्वतःला सिद्ध करण्यासाठी बराच वेळ लागला नाही आणि लवकरच त्याला ऑक्सफर्ड विद्यापीठ हॉकी संघात समाविष्ट करण्यात आले. हॉकीच्या क्षेत्रामध्ये त्यांची जागा डिफेंडर/संरक्षण फळीतला खेळाडू म्हणून होती. ऑक्सफर्ड विश्वविद्यालयाच्या हॉकी संघाचे ते सर्वात प्रतिभावान खेळाडू होते. विद्यापीठाच्या संघाचे सदस्य म्हणून त्यांचे योगदान मोलाचे मानले जाते. हॉकीमध्ये विदेशातील नामांकित असे ’ऑक्सफर्ड ब्ल्यू’ हे पदक पटकावणारे ते पहिले आशियातील व भारतीय विद्यार्थी ठरले. विशिष्ट अशा मोहक निळ्या रंगाचे असणारे ते जॅकीट/ब्लेझर क्रीडा क्षेत्रात वैशिष्ट्यपूर्ण नैपुण्याने मोलाची कामगिरी करणार्या निवडक खेळाडूलाच दिले जाते. त्या काळात पतौडीचे नवाब इफ्तीखार अली खान यांनाही हॉकीसाठीचे ’ऑक्सफर्ड ब्ल्यू’ हे पदक मिळाले होते.
दि. ८ फेब्रुवारी, १९३० रोजी झालेल्या ‘ऑक्सफर्ड विरुद्ध विम्बल्डन’ सामन्यातील ऑक्सफर्ड महाविद्यालय संघाकडून खेळताना हॉकीच्या सामन्यात ’ऑक्सफर्ड ब्ल्यू’ प्राप्त दोघेही भारतीय खेळाडू, म्हणजेच जयपाल सिंह आणि ’द नवाब ऑफ पतौडी’ हे एकत्र खेळले होते, असा उल्लेख आहे. दरम्यान, आपल्या शैक्षणिक कार्यात चुणूक दाखवत जयपाल यांनी चांगल्या गुणांसह नैपुण्य प्राप्त करत ‘अर्थशास्त्र’ विद्याशाखेत (हॉनर्स) ऑक्सफर्डच्या ‘सेंट जॉन्स महाविद्यालया’तून पदवी परीक्षा उत्तम गुणांसह उत्तीर्ण केली. त्यानंतर त्यांनी ‘भारतीय सिव्हिल सर्व्हिस’ (आयसीएस) परीक्षा द्यायचा निर्णय घेतला. त्या काळात, ब्रिटिश सरकारने अशाच विद्यार्थ्यांसाठी ही परीक्षा निर्माण केली होती, जे नोकरशाहीचा भाग बनण्यासाठी उत्सुक होती. जयपाल सिंहांच्या आधी, या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या लोकांमध्ये श्रीमंत आणि जमीनदार वर्गातून आलेल्यांची संख्या मोठी होती. परंतु, जयपाल एक विशिष्ट अपवाद ठरले. विशेष प्रावीण्यासह त्यांनी ‘आयसीएस’ परीक्षा उत्तीर्ण केली. इंग्लंडमध्ये ‘आयसीएस प्रोबेशनर’ म्हणून प्रशिक्षण घेत असताना त्यांना ‘अॅम्स्टरडॅम’मधील उन्हाळी ‘ऑलिम्पिक’मध्ये भारताचे हॉकीसाठी प्रतिनिधित्व करण्याचे आमंत्रण मिळाले. लंडनस्थित भारतीय कार्यालयाशी संपर्क साधताना जयपाल यांनी अॅम्स्टरडॅमला जाण्यासाठी एक सुट्टी मागितली. परंतु, त्यांचा अर्ज नाकारण्यात आला, पण त्यांच्यासमोर एक भयंकर द्विधा आली. त्यांना दोनपैकी एकच पर्याय निवडावा लागला - एकतर भारताकडून खेळायला नकार देणे किंवा ‘भारतीय सिव्हिल सर्व्हिस’मधून बाहेर पडणे. पण, त्यांनी हॉकीला प्राधान्य दिले आणि नेदरलँड्ससाठी रवाना झाले. या ऑलिम्पिक स्पर्धेत भारताने पहिल्यांदा हॉकीमधले सुवर्णपदक कमाविले. (क्रमश:)
- श्रीपाद पेंडसे
(लेखक वनवासी कल्याण आश्रमाच्या पश्चिम महाराष्ट्र प्रांताचे खेलकूद आयाम प्रमुख आहेत.)