नाशिकचा ‘यझदी’प्रेमी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Mar-2022   
Total Views |
 
 
kunal
 
 
‘यझदी’ बाईकवरील अपार प्रेमाने आपली वेगळी ओळख त्याने निर्माण केली. बाईक चालविण्याला केवळ छंद म्हणून न जगता, त्याला आपल्या आयुष्याचा अविभाज्य घटक बनविणार्‍या कुणाल बैरागी याच्याविषयी...
 
वडील आणि आजोबा पोलीस असल्याने पोलीस वसाहतीतच कुणालचे वास्तव्य. पाचवीत ‘मुकद्दर का सिकंदर’ चित्रपटातील ‘जानेमन कहलाएगा’ या गाण्यात दोन ‘सायलेन्सर’ असलेली गाडी पाहून कुणालला गाड्यांविषयी विशेष आकर्षण निर्माण झाले. भविष्यात दोन ‘सायलेन्सर’ असलेलीच गाडी घेण्याचा निश्चय त्याने केला. गाड्यांची चित्रे गोळा करण्याचाही त्याला छंद लागला. ‘मोटोजीपी’च्या रेसिंगचे चॅनलही तो बघत. बालपणी वडिलांची गाडी पुसल्यानंतर तो त्याच गाडीचा मस्तपैकी चक्कर मारून यायचा. दहावीनंतर ‘आयटीआय’चे शिक्षण पूर्ण केले. दरम्यान, दोन ‘सायलेन्सर’ असलेल्या गाडीचाही कुणालकडून निरंतर शोध सुरूच होता. अखेर अनुप आपोतीकर या मित्राच्या मदतीने त्याने १५ हजारांत ‘यझदी’ गाडी विकत घेतली.
केएसकेडब्ल्यू महाविद्यालयातून पदवीचे शिक्षण पूर्ण करता करता तो ‘महिंद्रा’ कंपनीत रूजू झाला. हीच गाडी तो महाविद्यालय आणि कार्यालयामध्ये घेऊन जात. तेव्हा, जुनी गाडी घेऊन येतो म्हणूनही त्याला डिवचण्यात आले. यझदी गाडीचे रूपडेच त्याने पालटून टाकले. अशामध्येच एका मित्राच्या माहितीनुसार,कुणाल ‘नाशिक यझदी जावा क्लब ग्रुप’सोबत जोडला गेला. या ग्रुपमध्ये विविध क्षेत्रातील अनेक नामवंत उद्योगपती, डॉक्टर, वकील, विद्यार्थी होते. प्रवास वाढत गेला, तसा संपर्क वाढून कुणालच्या ओळखीही वाढल्या. त्यानंतर कुणाल ग्रुपसोबतच आळंदी धरण परिसरात कॅम्पिंगकरिता गेला. याठिकाणी सर्वांनी आपले बाईकप्रेमाविषयीचे आपले अनुभव कथन केले. यावेळी बाईक कशी चालवावी, हाताळावी याविषयीची माहिती त्याला मिळाली. त्याचप्रमाणे आळंदी धरण परिसरातील कॅम्पिंगदरम्यानही अनेकजणांनी आपल्या दूरवरील प्रवासाच्या आठवणी सांगितल्या. यानंतर कुणालने ग्रुपसोबत किंवा वैयक्तिक कॅम्पिंगला जाण्यास सुरुवात केली.
आळंदी धरण कॅम्पिंगचे अनुभव ऐकून, फोटो पाहून वैतरणा धरण कॅम्पिंगला तब्बल २५ हून अधिक जण ग्रुपसोबत जोडले गेले. यावेळी अंबरिश मोरे यांच्या अनुभवांनी कुणाल प्रेरित झाला. गाडीची आवड जपता जपता कुणालला कॅम्पिंग आणि पर्यटनाची आवड निर्माण झाली. रस्त्यावर गाडी चालविण्याबरोबरच यापलीकेडही एक वेगळे विश्व आहे, याचा प्रत्यय कुणालला हळूहळू येत गेला. ‘यझदी’ गाडीला हजारो किलोमीटरचा प्रवास न झेपवणारा होता, त्यामुळे कुणालने ‘केटीएम ड्युक २००’ ही बाईक घेतली. यावेळी प्रवासात त्याला ‘केटीएम’पेक्षाही अधिक दमदार बाईक्सची माहिती मिळाली. याच दरम्यान, गौरव मयुर यांनी २०० सीसीहून अधिक हाय पावरच्या गाड्यांविषयी मार्गदर्शन कुणालला केले. यानंतर कुणालने गौरव यांना आपल्या गुरूस्थानी मानले. आशियातील ग्लायडर फ्लाय करणार्‍या गाडीचे जे ‘इंजिन’ आहे, तसेच ‘इंजिन’ कुणालच्या गाडीमध्ये आहे. जे महाराष्ट्रात एकमेव आहे.
आपले लडाखला जाण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी कुणालने ‘गुरखा फोर्स’ ही चारचाकी घेतली. जगातील सर्वात उंच रस्त असलेल्या लेह, लडाख, खर्दुंग्लाचा प्रवासही कुणालने यशस्वीरित्या पूर्ण केला. यावेळी स्वतः ‘फोर्स’ कंपनीचे मालक अभय फिरोदीया यांनी कुणालला शुभेच्छा देत त्याचा गाडी चालविण्याचा अनुभव जाणून घेतला. तसेच, कुणाल घरी सुखरूप पोहोचेपर्यंत गाडीच्या मेकॅनिकल खर्चातही मदत केली. याठिकाणी जोझिला पास येथे एका बाजूला दरी आणि रात्रीची बर्फवृष्टी असतानाही त्याने मरणाला मात दिली. त्यानंतर ‘यझदी’कडे झालेले दुर्लक्ष दूर करण्यासाठी कुणालने प्रयत्न सुरू केले. ‘यझदी’ला नवीन रूप अर्थात ‘रोडकिंग’ बनविण्यासाठी जो पार्ट जिथे मिळेल, तिथे कुणाल जात होता. कुणालने दीड दिवसांमध्ये कन्याकुमारीपर्यंतचा प्रवास ‘बुलेट’वर यशस्वीरित्या पूर्ण केला आहे. यादरम्यान, त्याच्या ‘बुलेट’च्या वायब्रेशन्समुळे पॅनलचे लॉ तुटले होते, यावेळी पॅनल पायाने दाबून त्याने चित्रदुर्ग ते बेळगाव असे २५० किलोमीटरचे अंतर कापले. तसेच, कोईम्बतूर, पंजाब, राजस्थान अशा अनेक ठिकाणी कुणालने भेटी दिल्या आहे.
कुणाल सांगतो की, “केवळ फोटो काढण्यासाठी हा छंद न जोपासता मनःशांतीसाठी तो जोपासा. आयुष्य प्रवासात गेले पाहिजे. विविध प्रकारची लोकं, तेथील संस्कृती जाणून घेण्यासाठी बाईक मला मदत करतात. कामाव्यतिरिक्त जो वेळ मिळतो, त्यात मी बाईकप्रेमाचा छंद जोपासतो.” आतापर्यंत यामाहाचे सर्व जुने मॉडेल्ससह १५ गाड्या विकत घेऊन त्यांचा अनुभव घेतला असून, आतापर्यंत हजारो किलोमीटरचा प्रवास केल्याचे कुणाल सांगतो.
सध्या कुणाल ‘एचसीएल टेक्नोलॉजी’मध्ये नोकरी करत आहे. सध्या कुणालकडे ‘एक्स पल्स 200’ चौथी गाडी आहे. या गाडीवर केदारनाथला जाण्याची त्याची इच्छा आहे. सध्या ‘गुरखा’, ‘बुलेट’, ‘यझदी रोडकिंग’, ‘इम्पल्स’, ‘एक्सपल्स’, ‘रॉयल एन्फिल्ड’ या गाड्या कुणालकडे सध्या आहे. कुणालने २०० सीसीपासून ते २२०० सीसीपर्यंतच्या सगळ्या गाड्या चालवल्या मात्र ‘यझदी’सारखा आवाज, रूप, बैठक कुणातही आढळला नाही. ‘यझदी’वरील प्रेम आजही कायम असल्याचे कुणाल सांगतो.
‘ज्यादा ख्याहिशे नही बस जिंदगी का अगला लम्हा पिछले से बेहतरीन हो,’ असे म्हणणार्‍या कुणालला वडील राजू बैरागी व कुटुंबाचाही त्याला संपूर्ण पाठिंबा आहे. बाईकप्रेमाने आपली वेगळी ओळख निर्माण करणार्‍या कुणाल बैरागीला दै. ‘मुंबई तरुण भारत’तर्फे मनःपूर्वक शुभेच्छा.
 
@@AUTHORINFO_V1@@