कलानिष्ठ जीवन जगणे सोप्पे नाही, आयुष्यभर कलेसाठी जीवन वेचणे हे ध्येयवेड्या व्यक्तीलाच साध्य होते. ते साध्य करणारे कलानिष्ठ आहेत सिद्धार्थ साठे. त्यांच्या कलाजीवनाचा घेतलेला मागोवा...
अनेक दिवस खूप मेहनत करून संपूर्ण पुतळा बनवला. चार दिवसांनी त्या पुतळ्याची नोंदणी केलेली संस्था तो पुतळा घेऊन जाणार होती. पुतळा बनवणार्या शिल्पकार सिद्धार्थ साठे यांना खूप दिवसांनी तशी मोकळीक मिळाली होती. सिद्धार्थ त्या पुतळ्याकडे पाहत होते आणि त्यांना वाटले की, त्या पुतळ्याच्या चेहर्यावर हवे तसे महत्त्वाचे भाव उमटलेले नव्हते. त्यांनी तत्काळ तो पुतळा नव्याने बनवायला घेतला. तो पुतळा जीवंत वाटावा, यासाठी सिद्धार्थ यांनी त्यामध्ये जणू जीवच ओतला. एक क्षणही वाया न घालवता त्यांनी दिलेल्या मुदतीमध्ये पुतळा पूर्ण केला. आता त्या पुतळ्यावरचे भाव जीवंत वाटत होते. ‘गुणवत्तेशी कोणतीही तडजोड नाही’ हे सूत्र नव्हे, तर हा मंत्र ते त्यांच्या काकांकडून प्रसिद्ध शिल्पकार भाऊ साठे यांच्याकडूनच तर शिकले होते.
भाऊ म्हणजे नामांकित शिल्पकार. ‘गेट वे ऑफ इंडिया’ येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा त्यांनीच बनवलेला. सार्वजनिक ठिकाणी महात्मा गांधींचे पुतळे आपण पाहतो. तसा पहिला पुतळा 1952 साली भाऊ यांनी दिल्ली येथे बनवला होता. 1947 साली ‘जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्स’ मधून भाऊ यांनी सुवर्णपदक मिळवलेले. त्यानंतर 50 वर्षांनंतर 1997 साली सिद्धार्थ यांनीही ‘जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्स’मधून पहिल्याच वर्षी सुवर्णपदक मिळवलेले.साठे यांच्या सहा पिढ्या कल्याणमधल्याच. कल्याणमध्ये आजही साठे कुटुंबीयांचा 150 वर्षांपूर्वीचा वाडा डौलाने उभा आहे. कल्याण शहरामध्ये ‘साठे स्टुडिओ’ सुप्रसिद्ध. ‘साठे स्टुडिओ’मध्ये भाऊ साठे हे शिल्पसंदर्भातले काम पाहत आणि त्यांचे भाऊ वामन हे स्टुडिओमधील इतर कामे पाहत.
वामन आणि सुमित्राबाईंचे सुपुत्र सिद्धार्थ. त्यांना लहानपणापासूनच शिल्पकलेची आवड. भाऊकाकांच्या शिल्पकाम बघताना सिद्धार्थ यांचे देहभान हरपे. कारण, शिल्पकला- चित्रकला त्यांच्या रक्तात तर होतीच, पण घराचा आत्माच कलेचा पुजारी होता. त्यातच साठे घराणे रा. स्व. संघ विचारधारेलावाहिलेले कुटुंब. साठेंच्या घरात लोकमान्य टिळक, गोळवलकर गुरूजी, लोकमान्य टिळक अगदी अटल बिहारी वाजपेयीही येऊन गेलेेले. वामन हेसुद्धा संघाचे स्वयंसेवक होते. कल्याणमधील कल्याण जनता सहकारी बँकेचे ते संस्थापक संचालक. त्यांची आई (म्हणजे सिद्धार्थ यांची आजी) वामन आणि भाऊ यांनी संघशाखेत दररोज जावे यासाठी प्रचंड आग्रही होती. ज्या दिवशीी मुल शाखा चुकवत त्यादिवशी आई या दोघांना जेवायला वाढत नसे. हे संघप्रेम आईनंतर दुसर्या पिढीत म्हणजे वामन यांच्या पिढीतही होते.
घरातल्या या वातावरणामुळेच की काय, वयाच्या दहाव्या वर्षापासून सिद्धार्थ संघाच्या शाखेत जाऊ लागले. याच काळात रा.स्व.संघाचे भैय्याजी जोशी यांचे बौद्धिक सिद्धार्थ यांनी ऐकले. त्याचा आशय होता, ”ज्या क्षेत्रात असाल तिथे उत्तम कार्य करा. जे काही कराल ते समाज आणि देशाच्या हितासाठीचे हवे. संस्कृती आणि संस्काराचा वारसा सांगणारे हवे.” भैय्याजींच्या विचारांचा सिद्धार्थ यांच्यावर पारच प्रभाव पडला. आपण जे काही करायचे ते उत्तम असलेच पाहिजे, हा आग्रह त्यांचा स्वभावच बनला. पुढे आपण चित्र शिल्पांमध्येच रमतो, हे सिद्धार्थ यांना कळले आणि त्यांच्या पालकांनाही समजले.
सिद्धार्थ यांची काकी नेत्रा (भाऊ काकांची पत्नी) यासुद्धा आंतरराष्ट्रीय स्तरावरील चित्रकार. त्यामुळे सिद्धार्थ यांना चित्रकलेचे बाळकडूही घरातून मिळाले होते. त्यांनी चित्रकला ‘एलिमेंटरी’ परीक्षा दिली, ‘इंटरमिडीएट’ परीक्षेसाठी त्यांनी नारायण काळेले गुरूजींकडून चित्रकलेचे प्रशिक्षण घेतले आणि ते महाराष्ट्रातून परीक्षेत पहिले आले. त्यांनतर आवश्यक प्रशिक्षण घेऊन त्यांनी ‘जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्स’मध्ये प्रवेश घेतला. त्यांना ‘जे.जे. स्कूल ऑफ आर्ट्स’मध्ये ‘फेलोशिप’ही मिळाली.पण ती त्यांनी नाकारली. कारण, त्यावेळी घरी 15 फुटांचा अश्वारूढ पुतळा बनवण्याचे काम आले होते. हे काम साधारण दीड वर्ष चालणार होते.
या कामात आपल्याला खूप काही शिकायला मिळेल, यासाठी सिद्धार्थ यांनी ‘फेलोशिप’ला नकार दिला. कलेच्या क्षेत्रात नवनवीन शिकण्यास कायमच तयार असायला हवे, असे सिद्धार्थ यांचे मत. त्यामुळे कोणतेही शिल्प बनवण्याआधी त्याची पूर्ण साग्रसंगीत माहिती घ्यायची आणि अभ्यास करायचा, त्याशिवाय शिल्प बनवायचेच नाही, हा सिद्धार्थ यांचा शिरस्ता. कारण, शिल्प बनवणे ही हस्तकला आहे. मात्र, त्यामध्ये जीवंतपणा आणणे ही खरी कला आहे आणि ती कला केवळ अभ्यास आणि सातत्याने येते, असे सिद्धार्थ मानतात. सिद्धार्थ हे सध्या ‘संस्कार भारती’ कोकण प्रांताचे चित्र आणि शिल्प विधा संयोजकआहेत. शिल्पकला आणि चित्रकलेसंदर्भात या क्षेत्रात आवड असणार्या विद्यार्थ्यांना ते मार्गदर्शन करतात. कोरोना काळात सर्वत्र नकारात्मकता आली होती. सिद्धार्थ यांनी समाजात आशा निर्माण व्हावी,जीवनाचे प्रेम कायम राहावे म्हणून अनेक उपक्रम राबवले. गायन, चित्रकला आणि निबंध स्पर्धांचे आयोजन केले.
कला माणसाला खर्या अर्थाने जगायला शिकवते आणि जगण्याचे बळ देते, हे सिद्धार्थ यांच्याकडे पाहून जाणवते. त्यांच्या कलेसाठी त्यांना अनेक राष्ट्रीय आणि राज्यस्तरावचे पुरस्कारही मिळाले आहेत. मात्र सिद्धार्थ म्हणतात, ”मी जी शिल्पं निर्माण करतो ती पूर्ण झाल्यावर मला जो आनंद मिळतो तसेच बघणार्यांना जो संतोष वाटतो, तो माझ्यासाठी सगळ्यात मोठा पुरस्कार आहे.” तसेच कलेचा उपयोग देशासाठीही व्हावा, हा त्यांचा आग्रह आहे. त्यामुळे नव्या पिढीला शिल्प आणि चित्रकलेचा सकारात्मक सांस्कृतिक वारसा देण्यासाठी तो संवर्धित करणे, हा सिद्धार्थ यांचा ध्यास आहे. अर्थात, ध्यासाशिवाय उत्तम गुणवत्ता नसते. सिद्धार्थ एक कलानिष्ठ संस्कृतिशील शिल्पकार आहेत . त्यांच्या कलासक्त ध्येयाला शुभेच्छा!