आकांक्षापूर्तीची पोकळी...

    04-Nov-2022   
Total Views |
 
सामान्य माणूस
 
 
 
 
काही वर्षांपूर्वी हिंदुत्वाची पोकळी निर्माण झाली होती. दोन राजकीय पक्षांनी ती भरून काढली. आता हिंदुत्वाची पोकळी नाही. आकांक्षा परिपूर्तीची पोकळी उत्पन्न झालेली आहे. या आकांक्षा सर्वसामान्य माणसाच्या आहेत.
 
 
 
महाराष्ट्राच्या राजकीय परिस्थितीवर उत्तम भाष्य कोण करू शकते? राजकीय विश्लेषक, ज्येष्ठ पत्रकार, राजकारणाचे अभ्यासक की सामान्य माणूस? या प्रश्नाचं उत्तर ‘सामान्य माणूस’ असे आहे. सामान्य माणूस म्हणजे रिक्षाचालक, भाजी-फळविक्रेता, चहाची टपरी चालविणारा, वडापावची गाडी चालविणारा, पानपट्टीचा मालक, दूध वितरण करणारा, वस्तू घेऊन येणारा डिलिव्हरी बॉय, घरकाम करणार्‍या स्त्रिया इत्यादी वर्गातील स्त्री-पुरुष येतात. यापैकी कुणालाही राजकीय सिद्धांत काय असतात, राजकीय विचारधारा कोणती असते, संविधान काय आहे, याचे विशेष ज्ञान नसते. हे ज्ञान आमच्यासारख्या वाचनसंस्कृतीतील लोकांना आणि पुस्तक पंडितांना असते. राजकीय परिस्थितीच्या विश्लेषणाचा विषय जेव्हा येतो तेव्हा वाचनसंस्कृतीतील सर्वांचे ज्ञान तेल लावायला जाते आणि या सामान्य लोकांचे ज्ञान भारी ठरते.
 
 
महाराष्ट्राच्या राजकीय परिस्थितीवर सामान्य माणूस काय म्हणतो, तो म्हणतो की, सगळेच राजकीय पक्ष सारखे आहेत. सगळेच राजकीय नेते धनसंपत्ती गोळा करण्याच्या मागे लागलेले असतात. हा मुख्यमंत्री गेला आणि तो मुख्यमंत्री आला. यामुळे आमच्या परिस्थितीत काही फरक पडत नाही. मी गेली दहा वर्षे रिक्षा चालवितो किंवा मी गेली बारा वर्षे घरकाम करते, माझ्या परिस्थितीत काहीही फरक झालेला नाही. राज्यावर कुणी का येईना मला रिक्षा चालवायची आहे, भाजी विकायची आहे, वडापावची गाडी चालवायची आहे, घरकाम करायचे आहे. माझ्या परिस्थितीत काहीही फरक पडत नाही.
 
 
 
महाराष्ट्राच्या राजकीय परिस्थितीकडे नजर टाकली असता आणि रोजच्या बातम्या वाचण्याची हिंमत केली असता आपल्याला हे दिसते की, प्रत्येक राजकीय पक्षाचे नेते दररोज एकमेकांवर काही ना काही आरोपच करीत असतात. काहीजण थोड्या सभ्य भाषेत करतात आणि काहीजणांची जीभ फार सैल सुटते. गेल्या सहा महिन्यांचे वातावरण तर बघायला नको. ‘गद्दार’, ‘घरी जा’, ‘स्वयंपाक कर’, ‘नाल्याची घाण’, ‘रेडा’, ‘कुत्रे’, ‘जहरी साप’, ‘वेश्या’, ‘डुक्कर’, ‘खोकेवाले’, ‘तिसर्‍या दर्जाच्या सिनेमात काम करणारी नटी’, ‘बायकोला साडी घेण्याची ऐपत नसलेला’, ‘माझ्या नादी लागू नका- मी तुमची वाट लावून टाकीन-ठोकून काढीन’, ‘मी मेलेल्या आईचे दूध प्यायलो नाही’ वगैरे वगैरे... अशा सर्व वाईट शब्दांचा-धमक्यांचा पाऊस पडलेला आहे, असे लक्षात येईल. इतक्या खालच्या स्तरावर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण यापूर्वी कधीही गेलेले नव्हते.
 
 
 
राजनेते आणि भाषणबहाद्दर, वृत्तपत्रात येणार्‍या बातम्यांवर समाधानी राहत नाहीत, ते व्हिडिओ काढतात आणि सोशल मीडियावर टाकतात. मी प्रतिस्पर्ध्याला कसे लोळविले आहे आणि शब्दांनी कसे गारद केले आहे, हे लोकांनी ऐकावे, अशी त्यांची इच्छा असते. प्रत्येक नटाचा एक चाहता वर्ग असतो. ‘हास्यजत्रा शो’मधील ‘पीजे’ मारणार्‍या नटाचादेखील चाहता वर्ग असतो. तो ‘लाईक्स’ आणि ’कमेंट’ देत असतो. ते वाचून नेत्याला वाटते, ‘व्वा, माझ्यासारखा मीच!’
 
 
 
राजकीय परिस्थितीचा जाणकार सामान्य माणूस, तो कोणत्या वर्गातील आहे हे वर दिले आहे. तो म्हणतो, सगळ्यांनी आपली पातळी सोडली आहे. शिमग्यात आम्हीदेखील शिव्या देतो, बोंबाबोंब करतो, पण ती एक दिवसाची असते. दुसर्‍या दिवशी आम्ही आपल्या कामाला लागतो. येथे तर राजनेत्यांचा रोजच शिमगा चालू आहे. रोजची होळी आणि त्याबरोबर पुरणपोळी हा राजनेत्यांचा खेळ चालू आहे. हा सामान्य माणूस म्हणतो की, कोणत्याही राजनेत्याचा चेहरा पाहू नये, असे वाटते. ज्याला दिवस चांगला जावा, असे वाटत असेल त्याने कोणत्याही राजनेत्याचा चेहरा बघू नये. चुकून बघितला तर दिवसभरात आपल्या तोंडातूनदेखील नको ते अपशब्द यायला लागतात, एवढा प्रभाव या लोकांनी निर्माण केला आहे.
 
 
 
या परिस्थितीचे राजकीय अर्थ सर्वच राजकीय पक्षांच्या दृष्टीने धोक्याच्या घंटा ठरणार्‍या आहेत. ही धोक्याची घंटा राजकीय पोकळीची आहे. सामान्य जनता 2019 पासून सुरू झालेल्या राजकीय खेळाला वैतागलेली आहे आणि तिला परिवर्तन हवे आहे. सामान्य जनतेला शिवराळपणा नको आहे. सामान्य जनतेला भानगड करणारे नेते कोण आहेत हे माहीत असते, त्यांच्या भानगडीत त्यांना रस नाही. कोण तुरूंगात गेला आणि कोण बाहेर आला, याच्याशी सामान्य जनतेला काही देेणेघेणे नाही. एखादा राजनेता तुरूंगात गेल्याने घरात फुटलेला चहाचा कप नवीन बनून येत नाही आणि तो बाहेर आल्याने फुटलेली बशी अखंड होत नाही.
 
 
 
सामान्य जनतेला आपल्या परिस्थितीमध्ये जाणवणारा बदल हवा आहे आणि बदलाचे विषय सर्वच्या सर्व आर्थिक विकासाचे आहेत. जो महिन्याला 20 हजार रूपये कमवितो त्याची अपेक्षा 30 हजार रुपयांची आहे. जो एका खोलीत राहतो, त्याला असे वाटते की, मला दोन खोल्यांचे घर मिळावे. ज्याला भरपूर पायपीट करावी लागते त्याला वाटते की, माझ्याकडे सायकल किंवा दुचाकी वाहन असावे. ज्यांच्या घरात शिक्षण घेणारी मुले आहेत, त्याला असे वाटते की, माझ्या मुलांना चांगले शिक्षण मिळावे, त्यासाठी लागणार्‍या खर्चाची व्यवस्था करण्याची क्षमता माझ्यात निर्माण व्हावी. सामान्य माणसाची अपेक्षा असते की, मुलगा अथवा मुलीचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांना त्यांच्या पात्रतेप्रमाणे व्यवसाय प्राप्त व्हावा. सामान्य माणसाची अपेक्षा असते की, तो ज्या परिसरात राहतो, त्या परिसरातील रस्ते खड्डेविरहीत असावेत. रस्त्यावर दिवे असावेत. पाण्याचा निचरा होईल, अशी व्यवस्था असावी. सामान्य माणसाला वाटते की, नोकरी-व्यवसायासाठी मला प्रवास करावा लागतो, माझा प्रवास सुखकर व्हावा. बससाठी मला फार वेळ थांबावे लागू नये. बसमध्ये अथवा रेल्वेमध्ये बसायला नाहीतर उभे राहयला तरी पुरेशी जागा मिळावी.
 
 
 
म्हटले तर किती सामान्य अपेक्षा आहेत या! त्या पूर्ण करण्याची जबाबदारी राज्यघटनेने राज्यकर्त्यांवर टाकलेली आहे. रोज शिव्या घालणारे राजनेते कधीतरी राज्यघटनेची मार्गदर्शक कलमे वाचतात का? त्यात हे सर्व विषय आलेले आहेत. लोककल्याणाचे विषय करायचे सोडून स्वकल्याणात जो-तो गुंतलेला आहे, म्हणून सामान्य माणूस या सर्व परिस्थितीला मनापासून वैतागलेला आहे. तो पर्यायाच्या शोधात आहे. महाराष्ट्राच्या राजकीय वातावरणात एक जबरदस्त पोकळी निर्माण झालेली आहे.
 
 
 
काही वर्षांपूर्वी हिंदुत्वाची पोकळी निर्माण झाली होती. दोन राजकीय पक्षांनी ती भरून काढली. आता हिंदुत्वाची पोकळी नाही. आकांक्षा परिपूर्तीची पोकळी उत्पन्न झालेली आहे. या आकांक्षा सर्वसामान्य माणसाच्या आहेत. शेतकरी, शेतमजूर, ग्रामीण स्त्रिया, भटके-विमुक्त, दलित वर्गात येणार्‍या विविध जाती, पारंपरिक व्यवसाय बुडालेले अनेकजण, नवीन तंत्रज्ञानामुळे बेकार होणारे लोक, असा पट अतिशय विशाल आहे. तो बदलाची आतुरतेने वाट बघत आहे. नाट्यछटाकार दिवाकर यांच्या एका नाट्यछटेचे शीर्षक ‘पंत गेले, राव चढले’ असे आहे. एकाचा मृत्यू होतो, त्याची जागा दुसरा घेतो. ही गोष्ट नोकरी-व्यवसायाच्या ठिकाणी होत असते. जो गेला त्याच्या घरी दु:खी आहे आणि ज्याला बढती मिळाली, त्याच्या घरी आनंद आहे. सुख-दु:खाचे पारडे असे समान असते. एक मुख्यमंत्री गेले, ते दु:खात आहेत. दुसरे मुख्यमंत्री आले, ते आनंदात आहेत. सुख-दु:खाचे पारडे समान!
 
 
 
 
प्रश्न आहे, तो सर्वसामान्य माणसाच्या सुख-दु:खाचा. त्याचे पारडे समान नाही. व्यथा, विवंचना, वंचना या त्रयीच्या ताब्यात तो सापडलेला आहे. त्यातून त्याला मुक्ती हवी आहे. त्याला असा राजकीय चेहरा पाहिजे, जो आपला वेळ प्रतिस्पर्ध्यांना शिव्या देण्यात, त्यांची उणीधुणी काढण्यात, घालविणारा नसेल. ज्याच्या मनात सर्वसामान्यांविषयी कळवळा असेल आणि जो ‘लाभाविन प्रिती करणारा’ असेल. निसर्गाचा नियम असा आहे की, पोकळी कधीही पोकळी राहत नाही, ती भरून काढली जाते. ती कोण भरून काढणार आहे? आपण सर्वच त्या उत्तराच्या प्रतीक्षेत आहोत.
 
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.